पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती.
आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा. विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे, त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी-रिकामी वाटायची.
पावसात विहीरीत पोहायची मजा भारीच असते. आम्ही पोहायचो म्हणजे नुसत्या उड्या मारायचो. मग उड्यांचे बरेच प्रकार... डुब्बा (हात-पाय पोटाच्या जवळ घेवुन)... सूर (हात, पाय आणि पोट एका सरळ रेषेत ठेवुन)... मांडी (मांडी घालुन)... कोलांटी उडी आणि अश्या बय्राच विचीत्र उड्या. कोणाच्या उडी मुळं जास्त पाणी उडतय, ह्यासाठी जाम धडपड असायची. एकमेकांना बुडवायची धडपड, विहीरीचा तळ काढायच्या पैजा, कोणाची चड्डीच ओढ तर कोणाच्या बापाच्या नावा वरुन चिडवा-चिडवी हे सगळ चालुच असायच. आम्ही तासं तास पोहायचो आणि मग दमलो की घरी जावुन जेवायचो. जेवण झाल की कोणाच्या तरी घरी जमुन गोट्या, कँरम किंवा पत्ते खेळण्यात दिवस जायचा.
पावसात बरच पाणी माडांच्या शेंड्यात साठुन राहत आणि मग पाऊस थांबला तरी ते एक एक थेंब करुन ठिपकत राहत. पाऊस थांबला की ते थेंब तोंडात झेलण्या साठी मी तोंड आ करुन माडा खाली उभा राहायचो. हा प्रकार करताना मान जाम दुखायची, मग थोडा वेळ इकड-तिकडं बघायच आणि परत आ करुन माडाच्या शेंड्या कड. गोट्या खेळायला मित्र जमुसपर्यंत माझा हा उद्योग चालु असायचा.
आमच्या घराला पडवी नव्हती. पावसाची झड लागु नये म्हणुन, आम्ही दर पावसाळ्यात अंगणात पडवी बांधायचो. पोफळीच्या लाकडाचा उतरत्या छपराचा सांगाडा आणि त्यावर झावळ्या (पोफळीच्या फांद्या) घातल्या की पडवी तयार व्हायची. मग, पावसाचं पाणी झावळ्यांच्या टोकां मधुन पडताना बघायला मजा यायची. जोराचा पाऊस पडत असताना, पडवीत उभं राहुन मी तो पाऊस बघायचो आणि ऐकायचो (सोबतीला कोंबड्या, मांजरं, कुत्री आणि गोगलगाया असायच्या).
पावसात स्लीपर घालुन गावात भटकुन घरी आल की कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडलेले असायचे (सकाळी दात घासुन झाल्यावर, ब्रश झटकल्या वर भींतीवर पाण्याचे शिंतोडे उडतात तसच..). बऱ्याचदा रस्त्यावरुन जाताना मागच्या पायातली स्लीपर चिखलात रुतुन बसायची आणि मग जर स्लीपर ओढायचा प्रयत्न केला तर... एकतर ती नीघायची आणि रस्त्यावरचा सगळा चिखल मागच्याच्या अंगा-खांद्यावर (आणि मग मागचा.... ये वाय. जेड. दिसत नाही का तुला?..असलं काही तरी ऐकवायचा)... नाहीतर स्लीपरचे मागचे दोन्ही बंध निघायचे आणि स्लीपर चिखलात रुतुन बसायची (आता एका पाया वर कसरत करत ती स्लीपर चिखलातुन काढुन तीचे मागचे दोन्ही बंध परत लावायचे म्हणजे एक वेगळच रामायण असायच). तर हा सगळा व्याप वाचावा म्हणुन आम्ही एक उपद्व्याप करायचो. पावसात रेवदंड्यातल्या दुकानात दोन बोट लांब आणि जरा जाड असं रब्बर मिळायच, ते आम्ही आणायचो. मग स्लीपरचे मागचे दोन्ही बंध काढायचे, रब्बर दोन्ही बंधात अडकवायच आणि बंध परत लावायचे. आता पायात स्लीपर घालायची आणि रब्बर टाचे वर चढवायच, झाली की मग सँडल तयार. आता पावसात पण मोकाट हींडता यायच.
पावसात बय्राचदा समुद्रावर फिरायला जायचो. पुळण भिजलेली असल्यामुळ समुद्र जरा जास्तच जवळ आल्याचा भास व्हायचा. पावसात, समुद्र जाम खवळलेला असतो, पाणी गढुळ असत, जोराचा वारा असतो, मुसळ्धार पाऊस असतो, आकाश ढगांमुळ काळकुट्ट झालेल असत आणि रोजची गर्दी नसते त्यामुळ वातावरणात थोडा एकांत, थोडी भिती आणि भरपुर रोमांच असतो. समोरचा समुद्र जरी जाम खवळलेला असला तरी आपल डोक मात्र फार शांत असत.
अश्यावेळी मधुनच एखाद कुत्र आपल्या सारखच भिजत हींडताना दिसायच. त्याच्याकड बघुन त्याला थंडी वाजतीय ह्याची जाणीव व्हायची, मग मधेच ते आपल अंग झटकुन थंडी जरा दुर सारायचा प्रयत्न करायच आणि ते बघून खरच थंडी जरा कमी झाल्या सारखं मलापण वाटुन जायच. ते कुत्र येवढ्या पावसात काही खायला भेटतय का हे शोधत हींडत असायच आणि मी काही कारण नसताना हींडत असायचो.
अश्या बय्राच आठवणी दर पावसाळ्यात जिवंत होतात आणि मग, मी दर weekend ला सह्याद्रिच्या कडे-कपाऱ्यांमधे भटकून नविन आठवणींची साठवण करत असतो.
He misalpav madhala na? Khupach bhari lihila ahes. Dolyansamor ubha rahata... mala yatala 20% jari anubhavayala milala tari mi khup sukhi hoin... :)
ReplyDeleteApratim!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteYapudhe mazyakade shabdach nahit.....
apratima!..amazing!......tumachi hi aawad cum chand agdi mananyajoga ahe ho! keep it up!. :)
ReplyDelete