Tuesday, 8 September 2009

सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...

मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...).

तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं. पानशेतच्या जवळ एका डोंगरावर नीळकंठेश्वराचं मंदिर पाहण्या सारखं आहे, असं ऐंकून होतो. मग रविवारी सायकलवर एकटच नीळकंठेश्वरला जायचा प्लान ठरवून टाकला. नीळकंठेश्वरा बद्दल पुरेशी महीती नव्हती, पण भटकायचं तर होतंच आणि एकटाच होतो; मग नीळकंठेश्वरला न पोचता भलतीकडेच कुठेही पोचलो तरी चालण्या सारखं होतं.

रविवारी सकाळी सगळं आवरल्यावर पाण्याची बाटली आणि १-२ बिस्कीटाचे पुडे दप्तरात टाकले आणि दप्तर पाठीवर अडकवून सायकल वर सुटलो. नेहमीच्या टपरीवर एक उपीट आणि चहा घेतला आणि सिंहगड-रोडला लागलो. सकाळची वेळ असल्यामुळं नेहमीची गर्दी नव्हती. बारीक पावसामुळं रस्ता मस्त ओला झाला होता. जरा निवांतपणे रमत-गमतच खडकवासला धरणा जवळ पोचलो. मग धरणाच्या काठानं जात डोणजे फाटा गाठला. फाट्यावर पानशेतला जाणारा उजव्या हाताचा रस्ता धरला. मी पहील्यांदाच ह्या रस्त्यावरुन चाल्लो होतो. आता रस्त्यावर क्वचीतच कोणी दिसत होतं. डाव्या हाताला सिंहगड धुक्यातून अधून-मधून डोकावत होता. हिरव्यागार झाडीतून चढ, उतार आणि वळणं घेत मी पुढं सरकत होतो. कसलीच घाई नव्हती, उगीचच बडबड करणारं कोणी नव्हतं आणि जरा थांब आराम करुयात अस म्हणणारं पण कोणी नव्हतं. एकटं फिरण्याचा हा फायदा असतो.

डोणजे फाट्याहून १०-१२ km पुढं आल्यावर उजव्या हाताला एक घर आणि दुकान लागलं. तीथं पाणी प्यायलो आणि नीळकंठेश्वरा बद्दल चौकशी करुन पुढच्या वाटेला लागलो. अधून-मधून पाऊस पडत होता आणि डोक्यावर घोंगडी घेऊन गावकरी रस्त्याच्या कडेनं शेतात चाल्ले होते. आता रस्ता मुठा नदीला समांतर जात होता. नदीचं पात्र गढूळ पाण्यानं तुडूंब भरुन वाहत होतं आणि नदीचे किनारे मस्त हिरवेगार होते. पानशेत फक्त ५-६ km च उरलं होतं. नदीच्या दुसऱ्या बाजूला नीळकंठेश्वराचा डोंगर दिसत होता, पण नदी कशी ओलांडायची हे कळत नव्हतं. तितक्यात एक गावकरी शेतातून येताना दिसला....

मी: राम-राम काका...
गावकरी: राम-राम... ह्या पावसात सायकलवर कुणी कडं निघालात...
मी: मला नीळकंठेश्वरला जायचयं तर नदी ओलांडून त्या बाजूला जाता येतं का?
गावकरी: हो... तर काय...जाता येतं की...
मी: पण कुठून?
गावकरी: मागं फिरा आणि मागच्या गावात पोचा... तिथून होडीनं दुसऱ्या बाजूला जाता येतं... तुमची सायकल पण जाईल होडीतून... पुण्याहून आलात का?
मी: हो.. जातो मग मागच्या गावात...
गावकरी: जपून जारं बाबा...
मी: हो.. येतो मग...

वळलो आणि लगेचच गावात पोचलो. नदी रस्त्यापासून बऱ्यापैकी आत होती आणि तिथं पोचायला नीट वाट नव्हती. मस्त लाल चिखल तुडवत सायकल खेचत मी चालायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर सायकल चिखलातून हलेच ना, मग सायकल उचलून खांद्यावर घेतली आणि होडी जवळ पोचलो. दोनजण होडीत बसले होते, मी पण सायकल सकट होडीत बसलो. होडी एका काठा वरुन दुसऱ्या काठा वर न्ह्यायची idea भारी होती. एक मजबुत दोर ह्या काठा पासून त्या काठा पर्यंत बांधला होता. मी होडीत बसल्यावर होडीच्या मालकानं दोराच्या मदतीनं होडी ओढत-ओढत दुसऱ्या काठावर पोचवली.

(होडी आणि होडीचा मालक )

त्याला ३ रुपये देऊन मी सायकल घेऊन खाली उतरलो. परत चिखलातून वाट काढत जरा कच्च्या पण बऱ्या रस्त्यावर पोचलो. थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला नीळकंठेश्वरावर जाणारी वाट लागली. चढ बराच होता. मग पायडलवर उभं राहून सायकल चढवायला सुरुवात केली आणि दगडातून वाट काढत एका लहानश्या गावात पोचलो. सायलक गावातच लावली आणि पायी चढायला सुरुवात केली.

पायवाटेच्या दोन्ही बाजूला मस्त घाणेरी फुलली होती. मला घाणेरीची फुलं जाम आवडतात. इंद्रधनुष्याला लाजवतील इतकी रंगीत ही फुलं असतात. घाणेरीच्या हिरव्यागार झुडपावर रंगी-बेरंगी बारीक-बारीक फुलांचा गुच्छ बघूनतर वेडच लागतं. इतक्या सुंदर फुलाचं नाव 'घाणेरी' ठेवावं असं कोणाला सुचलं असेल ते देव जाणो.

तळात हिरवीगार शेतं वाऱ्यावर मस्त डुलत होती. काय तो हिरवा रंग! एक वेगळंच चैतन्य आणि वेगळाच जीवंतपणा असतो ह्या पावसातल्या हिरव्या रंगाला. किती निरागस भाव असतात ह्या हिरव्या रंगाचे. मन अगदी भरुन येतं आणि आपल्या नकळतच देवाचे (निसर्गाचे) आभार मानायला लागतं.

हे सगळं अनूभवत अर्ध्या तासात मी नीळकंठेश्वराच्या देवळात पोचलो. देऊळ बऱ्यापैकी जुनं आणि फारच मोठ्ठं आहे. नीळकंठेश्वराचं दर्शन घेऊन मी देवळाच्या मागच्या बाजूला आलो. देवळाच्या परीसरात बरेच पौराणीक देखावे उभे केले आहेत. सगळ्या मूर्त्या सिमेंटच्या असल्यामुळं पावसापाण्याचा काही त्रास नाही. देवळाच्या परीसरातले हे भव्य देखावे बघून गणपतीतल्या देखाव्यांची आठवण होते.

(अल्हाददायक वातावरणामुळं हा इंद्र दरबार खरंच स्वर्गलोकी भरल्या सारखं वाटत होतं...)

(कोसळणारा पाऊस...जोराचा वारा...विजांचा कडकडाट आणि धुकं...ह्यामुळं समुद्रमंथनाचा हा देखावा जिवंत झाला होता...)

मस्त पाऊस कोसळत होता. त्यातच जोराचा वारा आणि धुक्यामुळं वातावरण एकदम भारावून गेलं होतं. ह्या कोसळणाऱ्या पावसात डोंगराच्या कड्यावर बसून मी तळ न्याहाळत होतो. वरुन पानशेत आणि वरसगाव धरणं आणि त्यांना वेगळं करणारी दोंगररांग मस्त दिसत होती.

(पानशेत आणि वरसगाव धरण)

पावसात भिजतच पूर्ण डोंगर भटकून घेतला. इतक्या वेळ भटकून झाल्यावर करण्या सारखं काही नव्हतं. मग जरा भूक लागल्याची जाणीव झाली. मग जवळ होतं ते खाऊन घेतलं आणि डोंगर उतरायला सुरुवात केली. रोजच्या सवयी प्रमाणं गडगडतच डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. गावात जरा चौकशी केल्यावर कळलं की परत पानशेतला न जाता डाव्या हाताचा रस्ता धरला तर वार्ज्यातून पुण्याला पोचता येतं. आलेल्या वाटेनं परत न जाता नविन वाट बघायला मिळणार म्हणून जाम खुष होतो. मग गावातून सायकल घेतली आणि उतारावर सुसाट सुटलो. हा रस्ता फार कमी वापरातला आणि अरुंद होता.

(माझी सायकल)

रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतात पेरणीची कामं चालु होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. मी एकटाच निवांत चाल्लो होतो. बघावं तिथं ओला हीरवा रंग आणि भिजलेल्या मातीचा काळा रंग मनाला वेड लावत होता. चिमण्या, बुलबूल, सुर्यपक्षी, वटवट्या, मैना, सुभग अश्या बऱ्याच पक्ष्यांचा चिवचीवाट ऐकत मी पुढं सरकत होतो. पेरणीच्या हंगामातली गाणी गुणगुणत शेतकऱ्यांची कामं चालू होती. एकदा वाट विचारुन घ्यावी म्हणून मी एका काकूंशी बोलायला लागलो....

मी: ही वाट वार्ज्याला जाते ना?
काकू: वार्ज्याला????... नाय...
मी: मग?...
काकू: ह्या वाटंनं तुम्ही पीरंगुटला पोचणार....
मी: पीरंगुटला?...हरकत नाही... (पीरंगुटहून चांदणी चौक आणि मग कोथरुड गाठायचं असा विचार डोक्यात सुरु झाला...)...किती वेळ लागेल पीरंगुटला पोचायला?..
काकू: सायकल वर दोन तास तरी लागत्याल... मोठ्ठा घाट हाये... सायकल ढकलतच न्ह्यावी लागंल...काय झालं तर मदतपण नाय मिळणार...माझं ऐका...माघारी जावा अन् डाव्या हाताला वळा...म्हंजी वार्ज्याच्या वाटंला लागाल....
मी: (च्याआयला...घाटात काय झालं म्हणजे पंच्याईत... त्यात परत संध्याकाळ व्हायची वेळ झाली होती... वार्ज्याच्या वाटेनं गेलेलच बरं...)...बरं...वार्ज्याच्या वाटेनंच जातो...

मग वळून ५-६ km मागं आल्यावर डाव्या हाताला वार्ज्याची वाट लागली. थोडं पुढं गेल्यावर NDA चा परीसर लागला आणि मग खडकवासला धरण. सायकल रस्त्याच्या कडेला लावून मी धरणाच्या काठावर जावून थोडा वेळ बसलो. धरणाच्या पलीकडच्या काठावर प्रचंड गर्दी जाणवत होती, मात्र ह्या काठाला मी एकटाच होतो. अश्या एकांतात एखाद्या पाणवठ्याकाठी मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं... असेच एकांत काठ आयुष्यात पुढेपण येतील अश्या आशेने सायकलवर वार्ज्याच्या दिशेनं निघालो. मग एक ट्रक झपकन् सायकलला घासून गेला...मग हाँर्नचे आवाज...दुचाकींची गर्दी...लोकांची आरडाओरड... ह्यामुळं शहरात पोचल्याची जाणीव झाली.

घरी पोचल्यावर मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली आणि उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला...

2 comments:

  1. Pashya, jinkalayas tu!!!!

    Ekta firanyat kharach khup majja asate, visheshatah nisargat!!! Man manel tikade jaa.. Nadichya kathavar palyadacha dongar baghat basa.. Hypnotize karanara panyacha awaj!!! Pan nirjan thikani kadhi kadhi khup bhiti pan watate. Pan hech kshan aayushyat sarvaat mahatwache asatat.

    Tuzyamule mala hya fulana ghaneri mhanatat ani ghanerichi mhanaje hi phule asa kalala :)

    Hodi madhun cycle sakat jayala khup bhari watala asel na?

    mala wachunach khup bhari watala..

    ReplyDelete
  2. Would loveee to visit all the places that you have written about..

    ReplyDelete