Monday, 17 September 2012

ह्या वर्षी मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता  शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली... मुर्ती घडवण्यासाठी योग्य माती कालवायला निदान २ तास तरी लागले...


हात जाम दमले होते, मग दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेतला आणि जेवण उरकल्यावर मुर्ती घडवायला लागलो...
 जमेल का? मागच्या वर्षी इतकीच मुर्ती छान घडेल का?  असे प्रश्न मनात न आणता मी काम सुरु केलं... आधी बैठक, मग पाय, मग पोट अश्या प्रकारे मुर्तीला आकार येऊ लागला... पोटाला नीट आकार दिल्यावरच मग चेहरा करायला घ्यावा, पण मी तसं न करता पोटाला अर्धवट आकार दिल्यावर चेहरा करायला घेतला आणि पोटावर ठेवला... मुर्ती लहान असल्यामुळे मला नंतर पोटाला हवा तसा आकार द्यायला खूपच कष्ठ करावे लागले... आता मुर्तीचे हात आणि पाय करायला घेतले... एक हात लहान, तर एक मोठा असं होत होतं... सगळे हात समान आकारचे करायला एक तास तरी लागलाच असेल... मग पावलं पायांना जोडली आणि ढोबळ मानाने मुर्तीला आकार देवून झाला, आता निवांतपणे मुर्तीच फिनीशींग करायला लागलो...


फिनीशींग करताना जाणवलं की मुर्तीची सोंड जरा पातळ झालीय, मग ती सोंड काढली आणि जरा जाड सोंड बसवली... आता मुर्ती प्रपोर्शनेट वाटत होती... मला गणपतीचे कान छान जमत असल्यामुळे मुर्तीचे कान पटकन झाले...


आता सगळ्यात अवघड काम म्हणजे डोळ्यांच काम हाती घेतलं... डोळे करताना जरा भीती वाटते, म्हणून मुर्ती नीट घडल्यावर जरा आत्मविश्वास वाढला, की मग मी डोळ्यांच काम हाती घेतलं... नुसत्या दोन भुवया करायला मला २ तास लागले... मग मातीचं जानवं पण मुर्तीवर चढवलं आणि मुर्ती वाळायला ठेवली... कधी उन्हात, तर कधी टंगस्टनचा बल्ब पेटवून मुर्ती वाळवत होतो...  अधून-मधून अजून थोडं-थोडं फिनीशींग चालूच होतं... २ दिवसांनी मुर्ती पुर्णपणे वाळल्यावर पांढरा रंग दिला... 


व्हाईट-वॉश नंतर साधारण १२ तासानंतर रंगकाम सुरु केलं... अंगाला स्लेट कलर द्यायचं ठरवलं होतं... खूप वेळ प्रयत्न करुन पण मनासारखा रंग बनत नव्हता, मग त्यातल्या त्यात जो योग्य वाटत होता तो रंग अंगाला दिला... पितांबर पिवळ्या रंगाने रंगवलं, पण अंगाच्या स्लेट कलरवर पिवळा पितांबर उठून दिसेना, मग पिवळा आणि लाल रंग मिसळून पितांबर भगव्या रंगाच केलं... 


अलंकार सोनेरी रंगवायचे होते म्हणून "गोल्डन पोस्टर कलर" आणला... हा रंग ब्रशने पसरवला तर सोनेरी वाटतच नव्हता, म्हणून लिटरली ब्रशने तो मी मुर्तीवर चिकटवला... सगळ्यात शेवटी डोळे पुर्ण केले आणि गणपती बाप्पाची मुर्ती पुर्णे झाली...


३-४ दिवसांपुर्वी जेव्हा मी मुर्ती करायला घेतली, तेव्हा मुर्ती इतकी सुरेख घडेल असं मला सुध्दा वाटलं नव्हतं...

विमुक्त

Thursday, 12 April 2012

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस तीसरा... लाडघर ते गणपतीपुळे

२३ जानेवारी २०१२

आज तशी सकाळी ६ वाजताच जाग आली होती, पण उबदार अंथरुण सोडून उठायला ७ वाजले... मग पटकन फ्रेश होवून, नाष्टा केला आणि लाडघरचा निरोप घेतला...

(दुरर्‍या दिवशीची मुक्कामाची जागा...)


(तीसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी सज्ज)
आजच्या प्रवासाची सुरुवात समुद्र किनार्‍यावरुनच झाली... लाडघर ते बुरुंडी समुद्र किनार्‍यावरुन देखील जाता येतं... खरंतर मुरुड-कर्दे ते बुरुंडी हा एकच लांबच्या लांब समुद्र किनारा आहे... सकाळच्या गार वार्‍यात सायकलवर छान वाटत होतं... समुद्र किनारी आमच्या सोबतीला फक्त सीगल पक्षी होते... अफाट समुद्र, लाटांच संगीत, ताजी आणि दमट हवा आणि कोवळं उन्ह असं छान वातवरण जुळून आलं होतं... आजच्या सफरीची सुरुवात अगदी स्वप्नवत होती... साधारण अर्धा तास आम्ही समुद्र किनारी चाललो आणि मग डांबरी रस्ता धरला... मागे वळून पाहिलं तर समुद्राचा अगदी नयनरम्य देखावा होता...काही क्षणातच आम्ही बुरुंडी गाव मागे टाकलं आणि दाभोळच्या दिशेने निघालो... लगेचच चढ लागला... कोकणातले चढ म्हणजे जरा वेगळेच... चढ एकदम स्टीप असतो, रस्ता जेमतेम ७ फुट रुंद आणि रस्त्याच्या दुतर्फा आंबा-काजूची झाडं... आणि आज तर सकाळच्या दवाने रस्ता मस्तपैकी ओला झाला होता, जणू काही सडा मारुन सजवल्या सारखा वाटत होता...तीघेही आपाआपल्या तंद्रीतच सायकल चालवत होतो... चढ संपला आणि परशुराम स्मारक लागलं... कोण्या एका बील्डरने ही सगळी जागा विकत घेतलीय आणि आता तो इथली वनराई नष्ट करुन बंगले उभारतोय... आणि त्यानेच हे स्मारक उभारलय...झाडं तोडून बोडकं केलेला माळ बघून खूपच खंत वाटली... जास्त वेळ न थांबता पुढचा प्रवास सुरु केला... थोड्याच वेळात उजव्या हाताला कोळथरेला जाणारा फाटा लागला... कोळथरेहून देखील दाभोळला जात येतं,  पण आम्ही मात्र सरळ पंचनदी गावाला जाणारी वाट सोडली नाही... थोडासा चढ आणि मग मोठ्ठा उतार संपल्यावर पंचनदी गाव आलं... उतारावर सुपारीच्या बागा बघून रेवदंड्याची आठवण झाली... लहानपणी आम्ही अशा बांगामधे पडलेल्या सुपार्‍या गोळा करायचो आणि बोरं विकणारीला द्यायचो, त्याबदल्यात ती आम्हाला एक-दोन मुठ बोरं द्यायची... रोज शाळेत जाताना सुपार्‍या गोळा करणं हा आमचा उद्योग असायचा...पंचनदी गावात एका घराच्या अंगणात रामफळं विकायला ठेवली होती... ती विकत घेतली, तर त्या आजीने आम्हाला खारीने चाखलेलं एक रामफळ असंच खायला दिलं... पुण्याहून सायकलने आलोय असं कळल्यावर त्या आजी खूप आनंदी झाल्या... घरातल्या सगळ्यांना बोलवून आमच्या बद्दल सांगीतलं आणि आमचं खूप कौतुक केलं... पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा घेवून आजींचा नोरोप घेतला... पंचनदीहून अजून १० कि.मी. चा चढ-उतार संपवून आम्ही दाभोळला पोहचलो...

(दाभोळच्या उतारावर प्रसाद)


(दाभोळ जेट्टी)


दाभोळहून फेरीने धोपवे गाठलं... धोपवे सोडलं आणि चढ लागला... दुपारच्या ११ च्या उन्हात चढावर जीव कासावीस होत होता... मान खाली टाकून एक-दोन-तीन-चार असे पेडल्स मोजत हळू-हळू चढ संपवला आणि एका झाडाखाली आडवे झालो... समोरच दिवाळं निघालेला एराँनचा प्रकल्प उभा होता...रस्त्यावर अजीबातच रहदारी नव्हती, एकंदरीतच इथला सभोवताल भकास वाटत होता... चढावर अंगातली सगळी ताकद संपली होती, मग पंचनदीमधे घेतलेली रामफळं बाहेर काढली... आंबट-गोड अशी मस्त चव होती... घोटभर पाणी प्यायलो आणि गुहाघरचा रस्ता धरला... पावूण तासात गुहाघर गाठलं...

उन्ह खूप होतं आणि जेवणाची पण वेळ झाली होती, मग इथेच जेवून थोडा आराम करायचं ठरलं... वरण-भात, पोळी-भाजी, सोलकडी आणि वाटीभर आमरस असं पोटभर जेवलो आणि आराम करण्यासाठी गुहाघरच्या समुद्रकिनारी पोहचलो... गुडघाभर पाण्यात उभं राहिल्यावर गार लाटांमुळे एकदम प्रसन्न वाटलं... पांढर्‍याशुभ्र फेसाळ लाटा उन्हात अजूनच चमकत होत्या... खोलवर समुद्र निळा-हिरवा भासत होता... भर उन्हात सुद्धा समुद्रकिनारी छान वाटत होतं...एखाद तास आराम केल्यावर पुन्हा सायकलींवर स्वार झालो... घरुन निघताना जरा कमीच पैसे सोबत घेतले होते, म्हणून मग गुहाघरला थोडे पैसे काढले आणि चिपळूण कडे जाणार्‍या चढाला लागलो... जेवणानंतर चढ नकोसा होतो अगदी, पण आजचा मुक्काम गणपतीपुळ्याला करायचा होता आणि ते अजून खूप दुर होतं, म्हणून हळू-हळू का होईना पुढे सरकत होतो... चढावर एकजण सायकल ढकलत निवांत चालत होता... हाय-हैलो झाल्यावर कळालं की तो रशीयावरुन ३ महिन्याच्या सुट्टीवर आलाय... मुंबईहून त्याने प्रवास सुरु केला होता आणि शेवट त्याला अंदमानात करायचा होता, पण अधे-मधे कुठे थांबायच हे त्याने ठरवलं नव्हतं... एकदम रमता-जोगी प्रकारचा तरुण होता... थोड्या गप्पा झाल्यावर त्याला बाय करुन आम्ही पुढे निघालो... जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला "वेळणेश्वर आणि हेदवी" अशी पाठी दिसली... चिपळूणचा रस्ता सोडला आणि उजव्या हातचा रस्ता धरला... अगदी निवांतपणे आम्ही सायकली चालवत होतो... अधून-मधून झाडांच्या सावलीत थोडावेळ आराम करायचो...वेळणेश्वरच्या जरा आधी त्या रशीयन तरुणाने आम्हाला गाठलं आणि म्हणाला,"Today, can I stick to you guys for the rest of the journey?"...

आम्ही होकार दिला आणि त्याला आमच्या टीम मधे शामील करुन घेतलं... त्याच्या सोबत अजून गप्पा झाल्यावर कळालं की, साहेबांकडे चांगला नकाशा सुद्धा नाहिये, नीट माहिती न काढताच साहेब सफरीला निघालेत आणि ते पण एका अनोळखी देशात... तरी सुद्धा तो एकदम निवांत होता...

हेदवी साधारण ५-६ कि.मी. असताना उजव्या हाताला वेळणेश्वरचा फाटा लागला... इथून वेळणेश्वर २-३ कि.मी. अंतरावर होतं... वेळणेश्वरला न जाता आम्ही हेदवीच्या वाटेने पुढे निघालो... हेदवीला गणपतीचं दर्शन घेतलं आणि फेरी पकडण्यासाठी तवसाळच्या दिशेने सायकली पळवल्या... सारखे छोटे-मोठे चढ-उतार लागतच होते... गेले २ तास समुद्र दिसलाच नव्हता आणि अचानक एका वळ्णानंतर समुद्र दिसला...

थोडावेळ समुद्राला लागूनच रस्ता होता आणि मग परत चढ सुरु झाला... चढत असताना उजव्या हाताला समुद्राचा नितांत सुंदर देखावा सतत नजरेत होता... चढ संपताच, देखावा बघण्यासाठी थांबलो...(यशदीप, मी आणि रमन वोल्ह्कोव (रशीयन तरुण))


इथून थोड्या वेळातच तवसाळ गाठलं... लिंबू सरबत प्यायलो आणि फेरीत बसलो... फेरीच्या टपावर चढून समुद्र न्याहाळत बसलो... आज खूपच चढ-उतार होते... पाय जाम दमले होते आणि गणपतीपुळे अजून निदान २० कि.मी. दूर होतं... जयगडच्या जेट्टीवर पोहचलो तेव्हा सुर्य कलत आला होता... जेट्टी नंतरचा चढ संपल्यावर उजवीकडे जयगडला न जाता डावीकडची गणपतीपुळ्याची वाट धरली... आजचा सुर्यास्तपण सायकल वरुनच अनुभवला...

सुर्य मावळातच भरभर कळोख पसरु लागला आणि आमच्या सायकलीपण जोरात पळू लागल्या... साधारण एक तासात २० कि.मी. अंतर कापून आम्ही गणपतीपुळ्याला पोहचलो... आमच्या मागे-मागे येत तो रशीयन पण पोहचला... "you guys are crazy" असं म्हणत त्या रशीयन तरुणाने आजच्या सोबत केलेल्या प्रवासाच वर्णन केलं... त्याला खूप भुक लागली होती, म्हणून तो चायनीज हॉटेल शोधण्यासाठी गेला आणि "जमलं तर उद्या वाटेत भेटू" असं म्हणत आम्ही देखील मुक्कामाची जागा शोधू लागलो... एका जागी स्वस्तात मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंग शेकत आंघोळी उरकल्या आणि जेवणासाठी बाहेर पडलो... प्रसादचा डावा गुडघा खूपच दुखत होता... त्याला चालताना प्रचंड वेदना होत होत्या... आजची रात्र आराम करुन जर बरं वाटलं तर पुढे येतो नाही तर इथूनच बसने पुण्याला जातो, असा त्याचा विचार होता... मला आणि यशदीपला पण तेच योग्य वाटलं...

विमुक्त

Tuesday, 28 February 2012

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस दुसरा... श्रीवर्धन ते लाडघर

  २२ जानेवारी २०१२

रोज सकाळी ६ वाजता सायकलींग सुरु करायच असं ठरलं होतं... पण, दुसर्‍याच दिवशी सहा चे साडे-सात झाले... आज हरीहरेश्वरला न जाता डोंगरातल्या मार्गाने डायरेक्ट बागमांडलेला जावून मग पुढचा प्रवास करायचा बेत होता... कालच्या प्रवासामुळे सगळं अगं दुखत होतं... सीट तर टेकवतच नव्हतं... पहिले काही कि.मी. पाय जरा दुखत होते, पण मग दुसर्‍या दिवसाचा पहिला चढ लागला आणि पुन्हा नव्या दमाने पेडलींग सुरु केलं... जेमतेम सात फुट रुंद रस्ता होता... दोन्ही बाजूला दाट झाडी होती... चढ बर्‍यापैकी स्टीप होता... पक्ष्यांची चिवचिव चालू होती... आणि वाटेवर आम्ही तीघेच होतो... वातावरणात समुद्राचा तो विशीष्ट असा सुगंध होता... अचानक मला लहानपण आठवलं... रेवदंड्यामधे सायकलवर भटकलेले दिवस आठवले... समुद्र आठवला... मुळचा मी कोकणातलाच असल्यामुळे सारा सभोवताल खुपच ओळखीचा वाटत होता... ह्या सगळ्या आठवणीत चढ कधी संपला हे कळालच नाही... पोटात काहीच नव्हतं आणि चांगलीच भुक लागली होती, मग ब्रेक घेतला आणि  चिक्क्यांवर ताव मारला...


घाट माथ्यावरुन दुरवर समुद्र आणि बागमांडले जेट्टी दिसत होती... उतारावर सायकली सुसाट पळायला लागल्या आणि काही क्षणात जेट्टीवर पोहचलो... बागमांडले ते वेशवी हा प्रवास बोटीने करायचा होता... सायकली बोटीवर चढवल्या आणि पायर्‍या चढून बोटीच्या बाल्कनीत प्रवेश केला... बघतो तर काय! वडा-पाव आणि चहा ची सोय होती इथे... प्रत्येकी ३ वडा-पाव आणि २ चहा झाले आणि तोपर्यंत आम्ही वेशवीला पोचलो देखील... 


पुन्हा सायकलवर स्वार झालो आणि केळशीची दिशा धरली... मी सर्वात पुढे होतो... रस्त्यावर कुत्र्याची चार पिल्लं एका मागे एक अशी ओळीत पळत होती... मी त्यांच्या पुढे गेलो तर ती पिल्लं माझ्या मागे पळू लागली... मग थोडा वेळ थांबलो, त्यांच्याशी खेळलो आणि पुन्हा सायकलींग... 


परत चढ सुरु झाला... रस्त्याच्या दुतर्फा काजू आणि आंब्याला मोहर लागला होता... चढ जरा कमी झाला की आम्ही ५-१० मिनीटांचा तरी ब्रेक घ्यायचो... थोडं पाणी आणि एखाद चिक्की खावून पुन्हा सुटायचो... 


जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला केळशीचा फाटा लागला... इथून पुढे सगळाच उतार होता... उतार संपल्यावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हातार्‍या जोडप्याला विचारलं की "केळशी अजून किती दूर आहे?..." तर आजी म्हणाली "माहीती नाही तर येता कशाला"...  असं उत्तर आजीबाईं कडून अजीबातच अपेक्षीत नव्हतं... कदाचीत आजी आणि आज्याच वाजलं असावं, म्हणून आजी तापलेली असावी... आम्ही तीघे एक-मेकां कडे बघून हसलो आणि गप्प मुकाट्याने पुढे निघालो... 


काही वेळातच केळशी लागलं... इथेच एका घरगुती खानावळीत दुपारच जेवण उरकलं... बांगडा फ्राय, कोळंबी सुक्का आणि सौंदाडे रस्सा असा मेनु होता...अवघड असलं तरी, आज गुहाघर गाठायचा विचार होता... म्हणून मग जास्त वेळ आराम न कराता अंजर्लेचा रस्ता धरला... केळशी बाहेर लगेचच खाडी वरचा पुल क्रॉस केला आणि आडे गावात पोहचलो... लहानसच गाव आहे... इथलं भार्गवराम मंदिर प्रसीद्ध आहे... गावा बाहेर पडलो आणि रस्ता अगदी समुद्राला लागुनच होता... दुपारची वेळ होती... समुद्र शांत होता आणि समुद्र किनारी कोणीच नव्हतं... सायकली रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली लावल्या आणि पुळणीत पाय ठेवला... केळशीच्या समुद्र किनारी आम्ही गेलो नसल्यामुळे, आमच्यासाठी हा ट्रिप मधला पहिला समुद्र किनारा होता... समुद्र मस्त चमकत होता... वार्‍यामूळे दुपारची वेळ असली तरी किनार्‍यावर छान वाटत होतं... लहानपणी अशा बर्‍याच दुपार मी रेवदंड्याच्या समुद्र किनारी घालवल्या होत्या... कधी पोहत तर कधी समुद्र किनारी असलेल्या किल्ल्यात उनाडक्या करत... त्याची आठवण झाली... दुपारची वेळ खरच खुप निवांत असते... छान जेवण झालेलं असतं, लगेचच काहीही काम नसल्यामुळे डोक्याला अजीबातच त्रास नसतो... आणि अशा वेळी समुद्र किनारी असावं, जो काही निवांतपणा अनुभवायला मिळतो, त्याला तोड नाही...(सेल्फ-टायमर लावून तीघांनी एकदम उडी मारुन फोटो काढायचा प्रयत्न असा हुकला आणि एक खुपच छान आठवण देवून गेला...)


(महीना चुकुन एक च्या ऐवजी दोन झालाय...)


पाय निघत नव्हते, पण अजून बरच अंतर कापायच होतं आणि पुढे पण अजून बरेच समुद्र किनारे अनुभवायचे असल्यामुळे पुढची वाट धरली... एखाद कि.मी. अंतर कापलं असेल आणि लगेच 'कड्यावरचा गणपती, अंजर्ले' अशी पाठी लागली... जावं की नाही असा विचार चालु होता, पण मग मागच्या वेळी दुचाकीवर आलो होतो तेव्हा सुद्धा देवळात गेलो नव्हतो... 'ह्यावेळी तरी दर्शन घेवू' असं ठरवलं... मुख्य रस्ता सोडला आणि डावी कडे डोंगरावर जाणारी अतीशय स्टीप वाट धरली... जरा वर गेल्यावर मागच्या समुद्राचा खुपच सुंदर, डोळ्यात मावणार नाही असा नजार दिसतो... साधारण १ कि.मी. चढ संपवून देवळात पोहचलो... बाप्पाची मुर्ती सुंदर आहे... दर्शन झाल्यावर देवळाबाहेरच्या दुकानात मस्त गार कोकम-सोडा प्यायलो, केळी घेतली आणि हर्णेची वाट धरली... अंजर्ले खाडीपुल क्रॉस केल्यावर चढ लागला... थोडं चढल्यावर सरळ न जाता उजवीकडे समुद्र किनार्‍याहून पाजपांढरी मार्गे हर्ण्याला जाणार्‍या रस्त्याला लागलो... इथून अंजर्ल्याच्या किनार्‍याचा वेड लावणारा नजारा दिसतो... तासोंतास वारा पीत हा नजारा बघत बसावसं वाटतं... इथून संध्याकाळचा सुर्यास्त तर केवळ अप्रतीम दिसेल... 
खाडी आणि समुद्राचा संगम बघत थोडावेळ थांबलो... पलीकडच्या तीरावर बॉक्स-टाईप क्रिकेटची स्पर्धा चालू होती... त्याच्या काँमेन्ट्रीचा आवाज कानावर पडत होता... कोकणात अशा स्पर्धा प्रत्येक गावात चालू असतात... मजा असते, कोकणात असताना मी पण अशा स्पर्धांमधे खेळलोय...

धुळ उडवत येणार्‍या हर्णे-केळशी बसमुळे आम्ही भानावर आलो आणि पाजपांढरी गावात जाणार्‍या उताराला लागलो... प्रामुक्यानं कोळ्यांची वस्ती असलेलं पाजपांढरी गाव अगदी समुद्र किनार्‍यावरच वसलं आहे... गावात खुपच हालचाल चालू होती... घारातली मंडळी जेवणं उरकुन घराबहेरच्या ओठ्यावर बसुन गप्पा मारत होती... लहान मुलं रस्त्यावर खेळत होती... सायकलींवर आम्हाला बघताच मुलं हात पुढे करुन 'टाळी... टाळी...' करुन ओरडायची... त्यांना टाळ्या देत गावातून बाहेर पडलो... समुद्रात थोडं पाण्यात सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला... दुपारच उन्ह समुद्रात चमकत होतं त्यामुळे समोरचा देखावा कृष्ण-धवल चित्रा प्रमाणं भासत होता...अजुन थोडे पेडल्स नंतर हर्णे गावात पोहचलो... हे गाव जवळ्पास असलेल्या किल्ल्यांमुळे बरंच नावाजलेलं आहे...सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला असे हे चारही किल्ले हर्णे गावातच आहेत... तसं छोटं पण गजबजलेलं गाव आहे... गावा बाहेर पडतच होतो की इतक्यात प्रसादच्या सायकलंच मागच चाक सपाट झालं... काय झालं हे बघितल्यावर कळालं की मागचा टायर फुटलाय आणि त्यामुळे ट्युब पण फाटलीय.. . ताम्हीणी घाटातल्या टॉर्चरमुळे टायरची वाट लागली होतीच, शेवटी टायर आज आडवा झालाच... माघारी वळलो आणि सायकल दुरुस्तीच दुकान शोधलं... त्यानं सुचवलेल्या एका दुकानात नविन टायर-ट्युब घ्यायला गेलो, तर कळालं की मालक दुकान उघडं ठेवून दापोलीला गेलेत आणि ते परत आल्या शिवाय काहीही मिळणार नाही... मग सायकल दुरुस्तीच्या दुकान मालकानं टेंपररी पंक्चर आणि गेटर काढून दिलं... दापोलीत जावून नविन टायर-ट्युब टाकायच ठरवलं... गावातच होतो म्हणून निभावलं नाहीतर चांगल्याच उचापत्या कराव्या लागल्या असत्या... 'दापोली पर्यंत नीट जावू दे रे देवा...' अशी प्रार्थना केली आणि पुन्हा सायकलींग सुरु केलं... समुद्र किनारा सोडला आणि दापोलीचा चढ लागला... खालचे गीयर टाकले आणि थोडं-थोडं सायकल पुढे सरकु लागली... चढ आला की तीघेही एका लयीत सायकल चालवायचो... थोडं पुढे-मागे, पण एक-मेकांच्या नजरेतच असायचो...चढावर सायकल चालवायची म्हणजे फिजीकल पेक्षा मेन्टल एफर्स्ट जास्त लागतात... अजुन किती चढायचयं हे न बघता, निमुटपणे एक-एक पेडल मारत रहायचं... चढ आहे म्हंटल्यावर दम हा लागणारच... 'खुप चढ आहे, आता होत नाही' असं म्हंटलं की संपल... त्याउलट 'अजून एकच पेडल' असा विचार केला की हळू-हळू का होईना, पण माथ्यापर्यंत न थांबता पोहचतो... सुर्यास्तानंतरच्या अंधुक उजेडात दापोली गाठलं... सुदैवानं हर्णे ते दापोली रस्ता एकदम चांगल्या कंडीशन मधे होता, म्हणून प्रसादची सायकल पण त्रास न देता पोहचली... सायकलच दुकान शोधलं आणि टायर-ट्युब बदलून घेतले..

काळोख पडला होता... दापोलीतच मुक्काम करता आला असता, पण नाही, निदान लाडघर पर्यंत तरी जावू असं ठरलं... लाडघरच्या रस्त्याला लागलो आणि एकदम सगळीकडे सामसुम जाणवायला लागली... अरुंद रस्ता आणि रहदारी पण नव्हती... लाडघर अजून ७ कि.मी दूर होतं... साधारण एखाद कि.मी. अंतर कापल्यावर रस्ता अजूनच अरुंद झाला, आधीच काळोख आणि त्यात झाडी त्यामुळे काहीच दिसत नव्हतं... आता काळोखात न धडपडता जाणं शक्यच नव्हतं आणि आमच्या कडे एकच विजेरी होती... मग एक युक्ती केली... यशदीपच्या हेलमेटला मागे एक एलईडी आहे आणि तो ब्लिंक मोड मधे ठेवता येतो; तो सेट केला आणि जवळ असलेली विजेरी घेवून तो सगळ्यात पुढे झाला... मी आणि प्रसाद त्या एलईडीच्या रेफरन्सने यशदीपला फॉलो करत होतो... तरी देखील एकदम चढ किंवा उतार आला की चांगलीच लागत होती... बर्‍याचदा अनपेक्षीतपणे खड्ड्यातुन गेल्यामुळे जोरात हादरे बसत होते... किर्र् काळोखात दूरवर एखाद्या घराचे दिवे दिसले की जरा हुश्श् व्हायचं आणि मग परत आमची आंधळी कोशींबीर सुरु व्हायची... अजून किती पुढे जायचय हे सुद्धा कळत नव्हतं... लाडघर मागे ठाकून पुढे नको जायला म्हणून आता जो कोणी रस्त्यावर दिसेल त्याला लाडघर बद्दल विचारायचं ठरवलं... साधारण अर्धा तास असेच पुढे गेल्यावर एका जागी दोन आजीबाई दिसल्या; त्यांनी मग आम्हाला हा रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने आत जायला सांगीतले... धडपडलो तर लागलं असतंच, पण सायकल सुद्धा खराब व्हायची शक्याता होती... 
उगाच पंक्चर वगेरे झाली तर नसता व्याप व्हायचा म्हणून मग शेवटी आंधळी कोशींबीरचा खेळ थांबवला आणि चालायला लागलो... थोडावेळ चालल्यावर, माघुन येणारी एक दुचाकी हळू झाली आणि 'कोण तुम्ही? कुठून आलात? कुठे चाललात?' असे अनेक प्रश्न झाले... आम्ही पुण्याहून सायकलवर आलोय हे कळल्यावर तो थांबलाच...आम्ही मुक्कामाची जागा शोधतोय हे कळाल्यावर तो आम्हाला त्याच्या घरगुती हॉटेलात घेवून गेला आणि आमच्या मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंघोळी उरकल्या आणि समुद्र किनारी एक चक्कर मारुन आलो... गार वारा, लाटांचा आवाज आणि चंद्र प्रकाशात चमकणारा समुद्र बघून,काळोखात केलेल्या सायकलींगच चीज झाल्या सारखं वाटलं... जोरात भुक लागली होती आणि ताटं पण सजली होती... फ्राय केलेला मांद, कोळंबी सुक्का आणि मांदेली रस्सा असा मेनु होता... नारळा-सुपारीच्या वाडीत माडाखाली बसुन मस्त पैक्की मनसोक्त जेवलो... थोड्या गप्पा झाल्या... गुहाघरच्या ऐवजी लाडघरला मुक्काम करावा लागला, पण एकंदरीत आजचा दिवस खुप आठवणी देवून गेला... अंथरुणात आडवे झालो तेव्हा आजच्या प्रवासाबद्दल समाधान आणि उद्याच्या प्रवासाबद्दल उत्सुक्ता होती...

आजचा प्रवासः श्रीवर्धन - बागमांडले - वेशवी - केळशी - आडे - अंजर्ले - पाजपांढरी - हर्णे - दापोली - लाडघर.
आज कापलेलं अंतरः निदान ७० कि.मी.

विमुक्त
नोटः वेळ मिळेल तसं लिहीतोय आणि त्यात माझा लिखाणाचा स्पीड पण कमी आहे, त्यामुळे पुढचा लेख टाकण्यास उशीर होवू शकतो.

Friday, 24 February 2012

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन

जानेवारीतला ३ रा आठवडा उजेडला आणि अजून फक्त ५ दिवसांनी ट्रीप सुरु होणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता... पण, नेमकं कधी नाही तर ह्याच आठवड्यात ऑफिसमधे भरपुर कामं आलं... कामाच्या गडबडीत ट्रीपसाठी खुपशी तयारी नाही करता आली, पण एका अर्थी ते बरच झालं कारण... "आपण ट्रेकला कसं खुप प्लान न करता जातो, अगदी तसंच ट्रीपला जावूया... सगंळच जरा फ्लेक्झीबल ठेवूया... मग जास्त मजा येते..." असं यशदीपच म्हणनं होतं...
 
२० जान ला ऑफिसहून घरी यायला रात्रीचे साडेसात होवून गेले... सोबत खूप सामान वाहायच नाही असं आधीच ठरलं होतं, म्हणून एक जोडी टी-शर्ट - हाफ चड्डी आणि एक टॉवेल पाठपिशवीत भरले आणि "ऑल सेट आणि  रेडी टू हीट द रोड..." असं म्हणत ट्रीपची तयारी संपवली...
 
ठरल्या प्रमाणे पहाटे पावूणे-सहाला घराबाहेरच्या गणपती मंदिरा जवळ आम्ही तीघेजण आणि आमच्या घरची माणसं जमा झालो... गणपती-बाप्पाचा आशिर्वाद घेतला... घरच्यां कडून थोडं कौतुक, थोड्या सुचना आणि भरपूर शुभेच्छा घेवून बरोबर सहा वाजता ट्रीपचा श्रीगणेशा केला... तसा अजून काळोखच होता... रस्त्यावर खूपच कमी वाहनं होती... पहाटेच्या गारव्यात चांदणी-चौकाचा चढ चढू लागलो... छोटा असला तरी चांगलाच स्टीप आहे हा चढ... पेडलवर उभा राहीलो, मान खाली टाकली आणि हळू-हळू पेडल मारत पीरंगुटच्या रस्त्याला लागलो... गेले कित्येक दिवस ट्रीप बद्दल डे-ड्रिमींग चालू होतं... "सकाळ-दुपार-संध्याकाळ नुसती सायकल चालवायची... सायकलवर गोवा गाठायचं... गोव्याला पोचल्यावर काय भारी वाटेल..." असे बरेच विचार डोक्यामधे सारखे चालू असायचे आणि आज एकदाची ट्रीप सुरु झाली होती... भलत्याच आनंदात आणि उल्हासात एक-एक पेडल आम्हाला गोव्याच्या जवळ ढकलत होतं... मानस सरोवरचा चढ संपवला आणि काळोखातच पीरंगुट ओलांडून पौडच्या रस्त्याला लागलो... थंडी चांगलीच बोचत होती... हात तर खुपच गारठले होते... नारायणाच दर्शन झालं तेव्हा आम्ही पौड मागे टाकून मुळशीच्या दिशेने सुटलो होतो...

 
शनीवारचा दिवस आणि सकाळची वेळ असल्यामुळे, रस्त्यावर शाळेला चाललेल्या मुलांची किलबिल चालू होती... सायकलवर आम्हाला बघून काहीजण छानस हसत होते, काहीजण थोडावेळ सायकलच्या मागे धावत... 'डबल-सीट घे ना' म्हणत होते तर काहींना अजिबातच इंटरेस्ट नव्हता... त्यांना टाटा करत आम्ही पुढे निघालो... कोवळ्या उन्हात न्हालेला सभोवताल लोभसवाणा वाटत होता... गारठलेल्या हातांना उन्हामुळे जरा उब मिळत होती... कधी गप्पा मारत तर कधी एकमेकांना फॉलो करत मुळशी धरणाच्या भींतीजवळ पोहचलो... डावी कडे वळलो आणि चढ सुरु झाला... चढ तर होताच आणि त्यात रस्त्याचे बारा वाजलेले, त्यामुळे चढताना चांगलीच दमछाक होत होती... सगळ्यात पुढे यशदीप, मग मी आणि एकदम माघे प्रसाद असे आम्ही चढत होतो... चढावर यशदीप फॉर्मात असतो, त्यामुळे एका शार्प यू-टर्न नंतर तो दिसेनासा झाला... प्रसाद तर अगदीच हळू पुढे सरकत होता... मी सीट वरुन उठलो, शरीराचा तोल जरा पुढे टाकला आणि एका लयीत पेडलींग सुरु ठेवलं... त्या शार्प यू-टर्न नंतर तर चढ अजूनच वाढला... पाठीवरच्या पाठपीशवीमुळे चढताना अजूनच कस लागत होता... छातीची धडधड वाढत होती आणि पेडलींगचा स्पीड कमी होत होता... पण न उतरता तो चढ पार करुन हॉटेल Paradise cafe जवळ पोहचलो... चढावर सायकल चालवायला खरंच एक्स्ट्रीम एफर्स्ट लागतात... संपुर्ण शरीर एका लयीत काम करावं लागतं... आणि चढ सर केल्याच फिलींग तर भन्नाटच असतं... ही तर सुरुवातच होती, असे बरेच चढ पुढच्या सहा दिवसात चढायचे होते...

तीघांना पण भुक लागली होती, पण गर्दी असल्यामुळे 'इथं नको, जरा पुढे खाऊ...' असं करत-करत आम्ही पळसे गाव माघे टाकलं... आता तर हॉटेल्स पण नव्हती... मग एक छोटा ब्रेक घेतला आणि मुळशी काठी बसून सोबत आणलेल्या केळ्यांचा नाष्टा उरकला...


ह्या हंगामात पळसाला बहर येतो... हा संपुर्ण परीसर पळसांनी फुललेला असतो... आकाशाच्या निळ्या पार्श्वभुमीवर लाल-केशरी रंगानी बहरलेला पळस तर खासच दिसतो...


इथून पुढे ताम्हीणी पर्यंतचा रस्ता मुळशीच्या पाण्याला चिकटूनच जातो... वर्दळ अगदीच कमी होती... पळस, पाणी, जंगल आणि डोंगर ह्यांचे नजारे बघत निवांतपणे आम्ही पुढे सरकत होतो...

 

(यशदीप आणि प्रसाद )

(मी )

 डोंगरवाडीचा स्टॉप आला आणि आम्हीपण ब्रेक घेतला... इथून खुपदा मी खालच्या दरीत उतरलोय...एकदा तर दरीत मुक्कामपण केलाय... पण इथून पुढचा रस्त्यावरचा प्रवास तर फार कमी वेळा केलाय... 

 (यशदीप आणि मी)

पुन्हा पेडलींग सुरु झालं आणि आम्ही माणगावच्या दिशेने पुढे सरकु लागलो... रोड खरंच खुप बाद होता... सारख्या, नेता लोक आणि गव्हर्मेंटला शिव्या घालतच होतो... खड्डा लागला कि एक शिवी, असं पार विळे फाट्याला पोहचे पर्यंत चालू होतं... माझ्या सायकलची तर सारखीच चैन (chain) पडत होती... एखादा मोठ्ठा घाट चढताना, 'हा घाट कधी संपेल?' असं जितक्या प्रखरतेने वाटत असतं... त्यापेक्षा कितीतरी पटीने हा ताम्हीणी घाट उतरताना मला तसं वाटत होतं... रस्त्यावरच्या खड्यांमुळे बसणारे हादरे सोसल्यामुले मनगटं आता दुखायला लागली होती... भर दुपारी साडे-बारा वाजता घाटाच्या पायथ्याशी विळे फाट्याला पोहचलो... आता तर भुकेने पुरते व्याकुळ झालो होतो, तरी माणगावलाच जेवण करु असं ठरवून पुढचा प्रवास सुरु केला... अर्ध्या तासात निजामपुर गाठलं... यशदीप आधीच पोचला होता आणि एका रसवाल्याशी गप्पा मारत आमची वाट पाहत होता... प्रत्येकी दोन ग्लास रस प्यायलो आणि माणगावचा रस्ता धरला... वाटेत काही दुचाकीवाले स्लो होवून आमच्याशी गप्पा मारत... 'कुठुन आलात? कुठे चाललात?' असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असायचे... उत्तरं मिळाली की प्रोत्साहन देवून पुढे निघून जायचे...

दुपारी दीड वाजता माणगावला पोहचलो... जेवणासाठी हॉटेलची शोधा-शोध सुरु केली आणि एका खानावळीत जेवणासाठी थांबलो... जेवता-जेवता बाहेर लावलेल्या सायकलवर पण लक्ष होतं... काही उत्साही आणि काही उपद्रवी मुलं आमच्या सायकलींशी खेळत होते... जेवण संपवल आणि गावा बाहेर एका झाडाच्या सावलीत विश्रांती साठी थांबलो... अजून बराच पल्ला गाठायचा होता म्हणून फक्त १०-१५ मिनीटं आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु केला... आधी म्हसळा आणि मग हरीहरेश्वर असा प्लान होता... 

इथून पुढे आता घाट वगेरे लागणार नाहीत असा आमचा समज होता... पण माणगाव सोडलं आणि अर्धा-तासाच्या आत घाट लागला... दुपारच डोक्यावर आलेलं उन्ह, उघडा-बोडका घाट, एक इंच सुद्धा सावली नाही, नुकतच जेवण झालेलं आणि दमलेलं शरीर... अश्या अवस्थेत तो घाट चढताना प्रत्येक पेडलवर स्व:ताशीच झगडत होतो... घामाच्या धारा डोळ्यात गेल्यामुळे डोळे चुरचुरत होते... एका हाताने घाम पुसत पेडलींग चालूच होतं... कोणाच्या नावाने बोंब मारायला पण चान्स नव्हता, स्वःतालाच शिव्या घालत होतो... 'अरे, कोणी सांगीतलं होतं?... इतक्या उन्हात झाडाखाली निवांत झोप काढायची सोडून, असं हे हा-हू करत सायकल चालवायची कसली हौस?...' अश्या अनेक  प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची डोक्यात मारामारी चालू होती... पण कसाबसा तो घाट सर केला आणि मघाशी चालू असलेल्या मारामारीत उत्तरांचीच जीत झाली हे कन्फर्म झालं...

घाट संपला आणि साई नावाच गाव लागलं... अजून थोडा चढ-उतार आणि मग एक मोठ्ठा घाट उतरुन म्हसळा गावात पोहचलो... थोडी चौकशी केल्यावर कळलं की दिवेआगारला सरळ सपाट रस्ता आहे आणि श्रीवर्धन-हरीहरेश्वरला अजून एक घाट चढावा लागेल... खरंतर अंगात अजिबात त्राण नव्हते, पण ठरलेल्या जागीच मुक्काम करु म्हणून घाटाचा रस्ता धरला... वाटलं होतं की हा तरी छोटा असेल, पण नाही इथे सुद्धा बराच चढ होता... आता सुर्य पण कलायला लागला होता... ट्रीपच्या पहिल्याच दिवशी काळोखात सायकल चालवायची वेळ येते कि काय असं वाटू लागलं... पण परत एक-एक पेडल वर कॉन्संट्रेट करुन स्वःताशीच झगडायला सुरुवात केली... मान खाली घालूनच प्रवास चालू होता... असंच जरा मान वर केली आणि समोर खूपच सुंदर नजारा होता... 


दिवसभर आमची साथ देवून आता नारायण आपल्या घरी निघाला होता... आमचा प्रवास मात्र चालूच होता... चढ संपला आणि आम्ही जोरात सुटलो... उतारावर काही चार-चाकी वाहनांना मागे टाकून संध्याकाळी साडे-सहा वाजता श्रीवर्धनला पोहचलो... आता हरीहरेस्वर केवळ १५ कि.मी. होतं, पण काही केल्या प्रसाद पुढे यायला तयार होईना म्हंटल्यावर, श्रीवर्धनलाच मुक्काम करायच ठरवलं... घरगुती राहण्याची सोय झाली... तीघेजण मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन रेडी झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडलो... जवळच एका हॉटेलात जेवण केलं आणि रुम वर येवून आडवे झालो... 'पहिला दिवस संपला... खूपच दमलो राव आपण, पण ठीक आहे १६५ कि.मी. अंतर आपण एका दिवसात कापलं... बरेच घाट चढलो... ट्रीपची सुरुवात मस्तच झाली... उद्या पासून समुद्र किनारीपण सायकल चालवायला मिळणार... ' असे अनेक विचार करत शांतपणे झोपी गेलो...