Thursday 10 December 2009

मी पण पळालो...

पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते...
"पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या
"हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी

पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत... सराव नाही अजिबात...".
त्याला म्हणालो... "अरे, सराव नसला तर काय झालं?... इच्छा तर आहे ना!... हळूहळू पळ... अगदीच दमलास तर थोडावेळ चालायचं आणि मग परत पळायचं... करावं वाटतयं तर काहीतरी कारणं देऊन टाळू नकोस... रेस पुर्ण केल्यावर फार भारी वाटेल तुला... चल आता, नेहरु स्टेडियमला जावून नोंदणी करुन येऊत..."

मी आणि रव्याने १० कि.मी. च्या रेस मधे भाग घेतला होता (पुरुषांसाठी हाफ मँरेथॉन नव्हती म्हणून)... मँरेथॉनच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला सकाळी ७.३० च्या सुमारास सगळी मान्यवर मंडळी आली... हाय, हँलो झालं आणि पुरुषांची फुल मँरेथॉन (४२ कि.मी.) सुरु झाली... त्यानंतर थोड्याच वेळात १० कि.मी. च्या रेसला सुरुवात झाली... वातावरणात प्रचंड उत्साह होता... त्यात we will, we will rock you ह्या गाण्यामुळे अजूनच भर पडली... पब्लिकचा भरपुर धिंगाणा चालू होता... शिवाजी महाराज, भवानी माता आणि अजून बऱ्याच जणांचा जयजयकार करत पब्लिक पळत होतं...

ठरल्या प्रमाणे आम्ही सुरुवात निवांत केली... सुरुवातीला गर्दीमुळे जोरात पळणं शक्य नव्हतच... सोबत बरेच तरुण, साठी-सत्तरीतले आजोबा, स्त्रीया, लहान मुली आणि मुलं पळत होते... आवड असली की वय, शारिरीक क्षमता आणि इतर कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत ह्याचच हे प्रतीक होतं...

साधारण २ कि.मी. नंतर गर्दी जरा कमी झाली आणि पळताना मस्त ह्रीदम सेट झाला... रस्त्याच्या दोन्ही बाजूला मँरेथॉन बघायला लोक जमले होते... पळणाऱ्यां बद्दलच कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं...

पहिले वीसएक मिनीटं मी आणि रव्या सोबतच पळत होतो... मग मी जरा जोरात पळायला लागलो... थोड्याच वेळात ५ कि.मी. पुर्ण झाल्याची खुण दिसली... "५ कि.मी. झालं पण?... अजून दमलो सुध्दा नाही... सही रे!" असा मनात विचार आला... अधे-मधे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँडच्या आवाजाने उस्ताह अजूनच वाढायचा... बऱ्याचदा दम लागणं, न लागणं हे मानसीक असतं... इच्छा असली की शरिर साथ देतच...

५ कि.मी. ते ९ कि.मी. पर्यंत पेस मेन्टेन केला... नंतर जोरात पळायला लागलो... काहीजणांना मागे टाकून मंगलदास रोडवर फिनीश लाइन पार केली... वाटलं होतं त्यापेक्षा फारच सोपं गेलं... मला रेस पुर्ण करायला ५१ मिनीटं लागली... रेस पुर्ण करुन थोडं स्ट्रेचिंग करत होतो तर रव्या सुद्धा पोहचला... रव्या पण नॉनस्टॉप पळाला... अजिबात सराव न करता...

आज एक स्वप्न पुर्ण झालं...  पुणे मँरेथॉन मधे पळायचं... आता आत्मविश्वास वाढलायं... हाफ-मँरेथॉन तर आता नक्कीच पळू शकेन...

"Ask yourself :  'Can I give more?'. The answer is usually : 'Yes'."
-Paul Tergat, Kenyan professional marathoner

(रेस नंतर एक दिवस Indian express मधलं pune newsline चाळत हो्तो... त्यावर पुणे मँरेथॉनचे फोटो आले होते आणि त्यातल्या एका फोटोत मी आणि रव्या होतो... कॉपीराईटमुळे तो फोटो इथे नाही लावला...)


Saturday 28 November 2009

रेवदंडा... माझं गाव

मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं...

लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...

मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो... चौलचा मुखरी गणपती आणि रेवदंड्यातला पारनाक्यावरचा मारुती हे माझे आवडते देव...

(मुखरी गणपती)


दर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलो... फार निवांत वाटलं...
११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होता... तोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलो... दताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहे... नक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही...



ह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो...

(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)


डोंगराच्या पायथ्याशी फार मोठ्ठं गोरखचिंचेच झाड आहे... गोरखचिंचेच झाड फार काळ जगतं; ५००-६०० वर्ष तर आरामात आणि भारतात हे झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे... गोरखचिंच खायलापण छान लागते...

(मी आणि गोरखचिंच)


डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत... साधारण ८०० पायऱ्या असतील... वर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात...

(वडाचं फळ)


डोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहे... मंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतात... दरवर्षी दत्तजंयतीला ५ दिवस जत्रा भरते... खूप गर्दी असते तेव्हा...

दर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलो... पुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होती... पोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो...

लहानपणी किल्ल्यात खूप भटकायचो... किल्ल्याच्या भिंतीवर चढायचो... बुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचो... बुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचो...  खूप धमाल असायची...

पुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं... १५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला... १६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होता... नंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला... १८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला...

(रेवदंडा कोट)








(किल्ल्यात माडांची वाडी आहे...)


(रेवदंडा किल्ल्याचे अवशेष)


रेवदंडा गाव फार सुंदर आहे... शनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्या... त्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहे... पण "प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका" अशी पर्यटकांना विनंती आहे... आता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेत... त्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे...
"I am myself and what is around me, and if I do not save it, it shall not save me" अशी भावना बाळगली पहिजे...

Thursday 19 November 2009

बाळा जो-जो रे... एक रेखाटन

मस्त निवांत झोपलं आहे...

तळ्यात दगड मारल्यावर पाण्यावर जसे तरंग उठतात, अगदी तसेच विचारांचे तरंग  डोक्यात निरंतर चालू असतात... एका मुळे दुसरी तरंग आणि मग तीसरी असं चालूच असतं, पण इतक्या लहानशा जीवाला असं निवांत झोपलेलं पाहिलं की ते तरंग नाहीसे होतात; मन शांत आणि स्थीर होतं... फार फार समाधान मिळतं...

Saturday 7 November 2009

लिंगाणा...

तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं.
"गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो...
लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.

बरेचजण तोरण्यावरुन निघून घाटमाथ्यापर्यंत येतात आणि मग लिगाण्याजवळच्या शिंगापूर-नाळ किंवा बोराट्याच्या-नाळीने कोकणात उतरुन रायगड, असा ट्रेक करतात. किमान तीन दिवस तरी लागतात ह्या ट्रेकला. माझ्याजवळ एकच दिवस होता आणि लिंगाणा जवळून बघायची जाम इच्छा होती. दुचाकीवरुन हारपुड गावी पोहचायचं आणि मग चालत रायलिंग पठार गाठायचं आणि लिगाण्याचं जवळून दर्शन घ्यायचं ठरवलं.

मी, ‌ऋशी, स्वानंद आणि अजय असे चौघेजण दोन दुचाकीवर रवीवारी पहाटे सिंहगडाच्या दिशेने निघालो. डोणजे फाट्यावर उजवीकडे वळाल्यावर अंदाजे ५-६ कि.मी. पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाबे खिंडीतून वेल्ह्याला जायच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून वेल्ह्याला पोहचतो. मस्त रस्ता आहे... फारशी रहदारी नाही... रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि शेतं आहेत... अधून-मधून लहानशी वाडी लागते... जवळच्या गवताळ टेकड्यांवर गुरं चरताना दिसतात. खिंडीच्या माथ्यावरुन राजगड आणि तोरणा सोबतच दिसतात.

खिंड उतरल्यावर पाबे आणि मग वेल्हा लागतं. साधारण एक तासात आम्ही वेल्ह्याला पोहचलो. वेल्ह्यात नाष्टा उरकला आणि कानंद खिंडीच्या रस्त्याला लागलो (केळद, कुंबळे आणि मढे-घाटला हाच रस्ता जातो). हा रस्ता तोरण्याला प्रदक्षीणा घालून जात असल्यामुळे तोरण्याचं चौफेर दर्शन घडतं. कानंद खिंड ओलांडून ७-८ कि.मी. उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आम्ही उजव्या हाताला हारपुडला जाणारी वाट धरली (ह्या फाट्यापासून केळद (मढेघाट) ५-६ कि.मी आहे).

पीकलेल्या भातशेतीचा फिकट-पीवळा रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी भासत होता. पीकलेल्या भाताचा गोड सुगंध हवेत दरवळत होता. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी शेतात उभी केलेली वेगवेगळी बुजगावणी बघत वरोती गावात पोहचलो. इथून हारपुड हाकेच्या अंतरावर आहे, पण वाट मात्र जरा बिकटच आहे. आमच्या आणि दुचाकीच्या सगळ्या अवयवांची चाचणी घेत हारपुडला पोहचलो. गावातल्या शाळेच्या आवारात दुचाकी लावल्या.

पावसामुळे खराब झालेलं अंगण दुरुस्त करण्यात एक आजोबा मग्न होते. त्यांच वय किमान ८० तरी असेलच. आम्हाला बघताच आजोबांनी विचारलं...
"लिंगाण्याला चाल्लाव काय?"
भटकण्यासाठी शहरातून लोकं आपल्या गावात येतात ह्याबद्दलचा आनंद आणि कौतुक त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर जाणवत होतं. गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...

आजोबांनी दाखवलेली वाट धरली आणि मोहरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अजून ओढ्यांमधे भरपुर पाणी होतं...

(ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दिसणारे दगडगोटे...)


पावसाळा संपला होता आणि वाढत्या उन्हामुळे गवत जरा पीवळट दिसत होतं... गवताच्या पात्यांच्या मागे कसली कुसं दिसतायत? म्हणून जरा नीट नीरखून पाहीलं तर सुरवंटं होती... ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...
  
एक-दोन लहान टेकड्या चढल्यावर जंगल लागलं आणि शेवटचा चढ सुरु झाला. वाट गावकऱ्यांच्या पायाखालची असल्यामुळे मस्त मळलेली होती. चढ संपला आणि अचानकच समोर लिंगाणा आला. लिंगाण्याच्या मागचा रायगड तर अधीकच भव्य भासत होता. डाव्या हाताला लिंगाणा ठेऊन थोडावेळ चालल्यावर मोहरीला पोहचलो. लहानसं गाव आहे. पावसात धो धो पाऊस कोसळतो आणि उन्हाळ्यात पाणीच नसतं. मागच्याच वर्षी श्रमदानातून कातळ खणून एक मोठ्ठ टाकं बांधलय गावकऱ्यांनी. त्यात डोकावून पाहीलं; नितळ हिरवंगार पाणी त्यात साठलं होतं.

(मोहरी गावातलं एक घर... पाऊस, वारा आणि थंडीचा जोर कमी करण्यासाठी घराचं छत अगदी खालपर्यंत आणलयं...)


मोहरीच्या जरा खाली शिंगापूर गाव वसलयं. ह्या गावातुनच शिंगापुर-नाळीने कोकणातल्या दापोलीला (रत्नागीरीच्या जवळचं दापोली नव्हे) उतरता येतं. मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर थोडावेळ पठारावर, थोडावेळ जंगलातून चालत साधारण एक तासात रायलिंग पठारावर पोहचलो. वाटेत सह्याद्रिचं विलोभनीय रुप पहायला मिळालं...

(शिंगापूर गाव...)






पठारावर कमरेपर्यंत गवत वाढलं होतं; वाऱ्यावर डुलत होतं. गवतातून वाट काढत पठाराच्या टोकाला पोहचलो. आलेल्या वाटेकडे मागे वळून पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडुने काढलेल्या रेघे प्रमाणे गवतामधे वाट उठून दिसत होती. रायलिंग पठारावरुन लिंगाण्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी गप्पा मारता येतात.

पठाराच्या अगदी काठावर पाय दरीत सोडून लिंगाण्याकडे बघत बसलो. इतक्या जवळून लिंगाणा बघण्याचं स्वप्न पुर्ण झालं... प्रत्यक्ष त्यावर चढताना येणाऱ्या रोमांचाची थोडी अनुभुती आली... एकट्या-दुकट्याचं ते काम नाही... पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...

(लिंगाणा...)

(लिंगाणा... जवळून)


पठारावर उभं राहून स्वताभोवती एक चक्कर मारली तर चौभेर केवळ अप्रतीम नजारा दिसतो...







(तळकोकणातलं दापोली गाव...)


एका झाडाखाली बसून जेवण उरकलं आणि थोडावेळ आराम केला.
पठाराच्या टोकावरुन फेकलेला दगड लिंगाण्यापर्यंत जाईल का? अशी शंका मनात आली आणि सगळेजण आपापला प्रयत्न करु लागले. मी पण दोन-चार दगड भिरकावले, पण एकही लिंगाण्यापर्यंत गेला नाही. मग माझ्या उच्च दर्जाच्या हिंदीत अजयला म्हणालो...
"वारेके बजेसे मेरा दगड लिंगाणे तक नही पहूँचा"
हे ऐकल्यावर इतरांना हसु येणं साहजीकच होतं. काय बरळलो हे ध्यानात आल्यावर मलापण जाम हसू आलं.

कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग-पठारावरुनच सुरु होते आणि मग रायलिंग-पठार आणि लिंगाणा ह्यांच्या मधल्या अतीशय चिंचोळ्या खिंडीतून लिंगणमाचीला जाते. पठावरुन बोराट्याची नाळ नक्की कुठून सुरु होते हे बघून घेतलं, म्हणजे पुढे कधी ह्या नाळीने उतरायचं झालं तर अडचण नको.

साधारण दुपारी २ वाजता लिंगाण्याचा निरोप घेतला आणि परत फिरलो. आता पठारावर उन्हाचे चटके जाणवत होते. भरभर चालत जंगल असलेल्या टप्प्यापर्यंत पोहचलो. गार सावलीत थोडावेळ विसावल्या नंतर मोहरी गाठलं. पोटभर थंड पाणी प्यायलो आणि थेट हारपुडच्या जरा आधी एका ओढ्यात उताणे झालो. ओढ्यातल्या गार पाण्याने ताजेतवाणे होऊन हारपुड गाठलं. हारपुड - वेल्हा - नसरापुर फाटा आणि मग महामार्गाने पुणे असा परतीच प्रवास दुचाकीवर सुरु केला. वेल्हा मागे टाकून पुढे निघलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली होती. तोरण्याच्या मागे तांबडं-केशरी सुर्यबिंब बुडत होतं.



Sunday 25 October 2009

निसर्ग... रेखाटन

सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक
छानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली
म्हणून मी ती रेखाटली...

एका तळ्याकाठी...



हिमालयाच्या कुशीत...



स्वप्नातलं घर...



मी कश्याला आरश्यात पाहू...

Tuesday 20 October 2009

आजीबाई... एक रेखाटन

एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन...
NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे...



तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...

१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...

हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं... रेखाटन जरा लहान झालं, त्यामुळे शेडींग नीट नाही जमलं...

Wednesday 14 October 2009

कामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही.
मग कसं जायचं?
विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची... मग भातराशी आणि शेवटी मळवली... असा बेत पक्का केला.



रवीवारी सकाळी ७.३० ला मी आणि माझा भाऊ प्रसाद कामशेतला पोहचलो. जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडला आणि समोरच्या डोंगररांगेवर चढायला सुरुवात केली. सरळ रेषेत चढून डोंगररांगेचा माथा गाठायचा आणि मग पायवाट शोधायची, असा विचार होता.

धुकं हळुहळू विरळ होत होतं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाची उब जाणवत होती. सारं रान दवाने ओलचींब भिजलं होतं. एखाद्या झुडपातून वेडाराघू (green bee-eater) हवेत झेप घ्यायचा, चोचीत काहीतरी पकडुन पुन्हा झाडीत नाहीसा व्हायचा. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांमधला मध खाण्यात दंग होती.

(White Lady)


(रान भेंडी)


(कारवी)


(गणेशवेल)






झुडपातून वाट काढत थोड्याच वेळात डोंगररांगेच्या माथ्यावर पोहचलो.  सकाळच्या गार हवेत जरावेळ विसावलो. समोर दूरवर भातराशीचा डोंगर दिसत होता.



पुसटश्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली. ही वाट रोजच्या वापरातली नव्हती, आणि पावसात बरच गवत माजल्यामुळे थोड्याच वेळात पायवाट नाहीशी झाली. बराच वेळ झाडा-झुडपात भटकल्यावर गुरांच्या वाटेला लागलो.



थोडं पुढे गेल्यावर लहानश्या पठारावर पोहचलो. पठारावर गुरांचा कळप चरत होता, गुरांना चाहूल लागू न देता झाडीतून आम्ही पुढे सरकलो.



पुणे-मुंबई मेगाहायवे वरुन मुंबई कडे जाताना कामशेत बोगद्याच्या उजव्या बाजूला डोंगरावर एक टॉवर दिसतो, आम्ही चालत असलेल्या डोंगररांगेवरच हा टॉवर आहे.  टॉवर असलेल्या टेपाडाला डावी कडून वळसा घालून बोगद्यावरच्या खिंडीत असलेल्या वाघोबाच्या देवळात पोहचलो. दर्शन घेऊन पुन्हा चालायला लागलो. गवत तुडवत एका टेपाडावर आलो. इथून समोरच्या डोंगराच्या पोटात कोरलेली बेडसे लेणी दिसली. जरा हुश्श् झालं, कामशेतहून ३ तास चालल्यानंतर पहिल्यांदाच लेणी दिसली.

(फोटोच्या मध्यभागी लेणी दिसत आहेत)


लेण्याचा डोंगर आणि आमच्या मधे लहानशी दरी होती. लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी अजीबात वाट नव्हती आणि उतार पण खूप जास्त होता. जरा मागे जाऊन योग्य वाट शोधावी असा विचार थोडावेळ डोक्यात आला, पण अशावेळी मी डोक्याचं अजीबात ऐकत नाही आणि मनाला लगामपण लावत नाही. मग काय?... उतारावरच्या रानात आम्ही दोघांनी उडी घेतली. झपाटल्या सारखे रान तुडवत उतरायला लागलो. पाठपीशवी, शर्ट सारखे काट्यात अडकत होते... अंग काट्यांनी ओरबाडुन निघालं... पण न थाबंता थेट लेण्याच्या जवळ पोहचलो आणि ओढ्यात आडवे झालो. ओढ्याच्या गार पाण्यानं सारा थकवा दूर केला. मग थोडं चढल्यावर लेण्यात प्रवेश केला.

इतके श्रम केल्यावर असं सुंदर शील्प बघण्यातली मजा वेगळीच; टमटमने इथे आलो असतो तर हे सुख नसतं मिळालं.
२००० वर्षांपूर्वी काही लोकांनी निर्माण केलेली कलाकृती आपण आज प्रत्यक्ष बघतोय, ह्यावर थोडावेळ विश्वासच बसत नव्हता. एखाद्या निर्जीव कातळातून असं सुंदर, चिरंतन शील्प कोरणाऱ्या लोंकाच्या प्रतीभे समोर नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरत नाही.  हे सौंदर्य शब्दामधे मी वर्णनच करु शकत नाही.

























भारावून बराच वेळ लेणी बघीतली. तोपर्यंत लेण्यांची देखरेख करणारे सदुकाका आले. त्यांच्या सोबत घरुन आणलेलं खाऊन घेतलं.
मी विचारलं,"लेणी बघण्यासाठी थोडं तीकीट का ठेवत नाही? भाजे आणि कार्ल्याला तर आहे"
"कोणी येतच नाही इथे, मग तीकीट ठेऊन काय फायदा?"
खरंतर ही लेणी फार सुंदर आहेत, पण भाजे आणि कार्ल्याच्या मानानं जरा आडवाटेला असल्यामुळे फारसं कुणी येत नाही.
अतीशय थोडकं मानधन सदुकाकाला दिलं आणि लेण्याच्या वर चढून भातराशीच्या दिशेने चालायला लागलो.  एका दगडावर प्रसादला साप दिसला. फारच निवांत होता, जवळ गेलोतरी त्याने पळायची घाई नाही केली.

(Gunther's racer)


वाट सापडत नव्हती, पण साधारण कल्पना असल्यामुळे  गवतातुन  वाट काढत चालत होतो.  थोड्याच वेळात डोंगराच्या कड्यावर पोचलो आणि तळ न्याहाळू लागलो. पवनेच्या दोन काठावर तिकोना आणि तुंग, पवनेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसले होते.



आता उजव्या हाताला वळलो आणि पुन्हा जंगलात घुसलो.  मला ओल्या रानाचा वास खूप आवडतो. कोवळ्या गवताचा, फुलांचा, झाडांवरच्या फळांचा, कुजणाऱ्या पानांचा मिळून वेगळाच सुगंध तयार होतो. हा सुगंध आला की फार प्रसन्न वाटतं मला.

जंगलातून बाहेर पडलो तेव्हा उजव्या हाताला भातराशीचा डोंगर होता आणि समोर लोहगड आणि विसापूर.



अजूनपण वाट सापडत नव्हती. सकाळ पासून चालून-चालून प्रसाद जरा कंटाळला होता.
म्हणाला,"तुला वाट माहिती नव्हती तर कश्याला आणलसं इथे?"
मी म्हणालो,"अरे, वाट तर मला कधीच माहिती नसते...  तु कंटाळू  नकोस... मस्त चालत रहा... "

थोडावेळ धडपडल्यावर जरा मळलेल्या वाटेला लागलो. सुमारे अर्धा तास चालल्यावर एक धनगरपाडा लागला. धनगरपाड्याचं नाव मालेगाव.  गावातली लहान मुलं टायर सोबत खेळत होती. मला लहानपणची आठवण झाली... तेव्हा सायकलच्या दुकानतून वापरात नसलेला टायर घेऊन गावभर आम्ही हुंदडायचो... घरी आल्यावर टायर बघीतल्यावर आई ओरडते म्हणून घरात घुसायच्या आधी पडवीच्या छतावर टायर लपवून ठेवायचो... मजा होती तेव्हा...

धनगरपाड्यातून विसापूरच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात जायला मळलेली वाट आहे.  दिवसभर भरपूर पायपीट झाली होती, म्हणून भातराशीचा डोंगर न चढता पाटणला उतरायचं ठरवून टाकलं. अर्ध्या तासात पाटण आणि मग अजून पाव तास चालल्यावर मळवलीच्या रेल्वे स्टेशनला पोहचलो. लोकल मधे बसलो आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. लोकलच्या खिडकीतून भातरशीचा डोंगर,  दिवसभर भटकत होतो ती डोंगररांग बघीतल्यावर फार समाधान वाटलं.