Friday, 25 September 2009

विमुक्त

                विमुक्त

मी माझ्याच जगात मग्न आहे...
चाकोरीचे वस्त्र फेडलेला, मी नग्न आहे...

ठरलेल्या चौकटी बाहेर जगण्याची ओढ आहे...
स्वताला पारखण्याची मला खोड आहे...

उन्हात, पावसात, थंडीत भटकण्याचा छंद आहे...
संपूर्ण ऋतुचक्र मनसोक्त जगण्यात, मी धुंद आहे...

माझ्या अंतरीची मला साद आहे...
आयुष्य माझे, खुळा नाद आहे...

शहाण्यांच्या जगात, मी खुळा अलिप्त आहे...
बंधनांना निर्बंध घातलेला, मी विमुक्त आहे...

Tuesday, 22 September 2009

उरणचे काही गणपती...

आमच्या घरचा गणपती

आमच्या घरचा गणपती

सार्वजनीक गणपती (माझा आवडता)

खूपच सुंदर मुर्ती आहे (एकदम जीवंत)

सार्वजनीक गणपती

सार्वजनीक गणपती

सार्वजनीक गणपती

सार्वजनीक गणपती

सार्वजनीक गणपती

Saturday, 12 September 2009

चित्रकला

पावसातली एक वाट...

असंच काहीतरी...


फुलपाखरु...

Friday, 11 September 2009

धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला... (Thanale to telbaila)

"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.
असं अचानकच अजित आणि सरांसोबत मी भटकायला निघालो. ठाणाळ्याहून वाघजाई घाटानं चढून तेलबैलाला पोचायचा बेत होता.
गर्दी नसल्यामुळे बल्लाळेश्वराचं दर्शन निवांत झालं. सकाळी पुण्याहून उपाशी पोटीच निघालो होतो, मग देवळा जवळच एका हॉटेल मधे खाऊन घेतलं. हॉटेल मधे चौकशी केल्यावर कळालं, की डायरेक्ट ठाणाळ्याला बस जात नाही. "पालीहून नाडसूरला जा आणि तिथून २-३ कि.मी. चालून ठाणाळ्याला पोहचा" असं हॉटेलवाल्याने सुचवलं. भर पावसात भिजतच आम्ही बस-स्टँडच्या दिशेने चालायला लागलो. सरसगडाच्या पायथ्याशीच पाली वसलंय, त्यामुळे बस-स्टँडला जाताना पावसात ओलाचिंब भिजलेला हिरवागार सरसगड लक्ष वेधून घेत होता. नाडसूरला जाणारी बस दुपारी १.१५ ला सुटेल अशी माहिती बस-स्टँडवर मिळाली. इतक्या उशीरा ठाणाळ्याला पोचलो तर ठरल्या प्रमाणे काहीच होणार नव्हतं, म्हणून टमटम ठरवली आणि ठाणाळ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. पाऊस चांगलाच कोसळत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, पावसामुळे सुखावलेली भाताची रोपं वाऱ्यावर डुलत होती. समोर दूरवर तेलबैलाच्या भिंती धुक्यामुळे अस्पष्ट दिसत होत्या आणि डोंगरावरुन असंख्य धबधबे तळकोकणात उडी घेत होते. दुपारी १२ च्या सुमारास आम्ही ठाणाळ्याला पोचलो तेव्हा पावसाचा जोर जरा कमी झाला होता. "ठाणाळे लेणी बघायची आहेत, तर वाट जरा दाखवा" असं गावात विचारल्यावर ५-६ बायका एकदम अंगावरच आल्या...
"एवढ्या पावसात कसली लेणी बघताय?" पहिली म्हणाली.
"गेले दोन दिवस खूप पाऊस पडतोय... ओढ्याला मरणाचं पाणी आहे... ओढा पार नाही करता येणार... घरी जा परत..." दुसरी.
अजून काही विचारलं तर ह्या काय आपल्याला पुढे जाऊ देणार नाहीत, हे आम्ही ओळखलं आणि गुपचूप गावाच्या मागे जाणारी वाट धरली. नसतं धाडस करायचं नाही असं सरांनी मला आधीच बजावलं होतं.
गावाच्या मागे पोचल्यावर पाण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या दूरवर एवढा आवाज येतोय म्हणजे ओढ्याला भरपूर पाणी असणार ह्यात काही शंका नव्हती. थोड्याच वेळात ओढ्याच्या काठावर पोचलो... ओढा कसला?... नदीच ती!... केवढं ते पाणी आणि केवढा तो पाण्याचा जोर?... आवाजानं तर अजूनच धडकी भरत होती...
(फोटो मधे ओढ्याचा निम्माच भाग दिसतोय...)


गावातल्या बायका म्हणाल्या ते खरं होतं, ओढा पार करणं अवघड होतं. पाण्याचा जोर आणि खोली कमी असेल अशी जागा शोधण्यासाठी ओढ्याच्या काठाने चालायला सुरुवात केली. दाट झाडीतून वाकून गुरांच्या वाटेवरुन पुढे सरकत होतो. वाटेवर सुद्धा भरपूर पाणी वाहत होतं आणि त्यात असंख्य खेकडे धडपडत होते. बरंच पुढे गेलो, पण मोक्याची जागा काही सापडेना... कुठे पाण्याचा जोरच जास्त होता तर कुठे खोली. अजून जरा पुढे जाऊन बघावं म्हंटल तर अजीबातच वाट नव्हती आणि पुढून ओढ्याच्या पात्रात उतरणं फारच अवघड होतं कारण दरीची खोली वाढली होती. अर्धा तास चालल्यावर मागे फिरलो आणि परत मोक्याची जागा शोधायला लागलो. एका जागी ओढ्याचं पात्र जरा पसरट होतं, अंदाजे ५० फुट... इथूनच जमेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही ओढ्यात उतरलो... कमरे पर्यंत पाणी होतं, पण जोर खूप जास्त नव्हता आणि अधे-मधे धरायला झाडं किंवा खडक होतेच... नीट तोल सावरत आडवं पुढे सरकता येत होतं... विरळाच रोमांच अनुभवत पलीकडच्या काठावर पोचलो...
वा! जमलं शेवटी... वाटलं होतं त्यापेक्षा सोपं निघालं... सगळे एकदम खूष होते... इतकावेळ ओढा पार करायच्या नादात आजुबाजूच्या निसर्ग सौंदर्याकडे लक्षच गेलं नाही... सारा सभोवताल धुक्यात बुडाला होता... सगळ कसं पावसात ओलचिंब भिजलं होतं... सारा परिसर स्वच्छ आणि नितळ झाला होता...
आता ओढा पार केला होता, पण पुढची वाट सापडत नव्हती... लेणी कुठे आहेत ह्याचा थोडा अंदाज होता, मग त्या दिशेने चालायला लागलो... बरेच लहान-मोठे ओढे पार करत पुढे सरकत होतो...

अजून जरा पुढे गेल्या वर पुन्हा ओढा लागला... जरा वरच्या बाजूला पाहिलं तर दाट जंगलात, झाडीमधून धबधबा पडत होता... झाडांचे शेंडे हलक्या धुक्यात लपले होते... मधूनच एखादा बगळा धबधब्यावरुन उडत होता... केवढा भव्य देखावा तो!... किंगकाँग सिनेमातल्या देखाव्यांची आठवण झाली... गर्द हिरवीगार झाडी, पांढरं-शुभ्र पाणी, पोपटी गवताचा गालिचा, हलकं धुकं आणि एकांत... अगदी अवाक् होऊन बराच वेळ सभोवतालचा परिसर न्याहाळत राहिलो...

का कोणास ठाऊक, पण आम्ही हा ओढा पार न करता, होतो त्या काठानेच वर चढायला लागलो... जंगल अजूनच दाट झालं... जमीनीवर पिकल्या पानांचा थर साचला होता... लेण्यांचा काहीच पत्ता नव्हता... जरा धुकं कमी झाल्यावर जाणवलं, की समोरच्या टेकाडावर चढलो तर जरा अंदाज येईल... वर पोचलो... तरी लेण्यांचा काही अंदाज येईना, पण तेलबैलाचं पठार आणि आमच्या मधे खोल दरी आहे आणि इथून वाट नाही हे स्पष्ट झालं... तेलबैलाच्या पठारावरुन डोंगराची एक रांग दूरवर डाव्या हाताला उतरत होती... त्या रांगेवरुनच तेलबैलाला पोचायच असं आम्ही ठरवलं... दुपारचे २.३० वाजले होते, वाट सापडत नव्हती आणि भरपूर चढायचं होतं, म्हणून लेण्यांचा नाद सोडला आणि तेलबैलाच्या पठारावरुन जंगलात उतरणाऱ्या धारेच्या दिशेने चालायला लागलो... अर्धा तास चालल्यावर जेवणासाठी थांबलो... ब्रेड-श्रीखंड खाल्लं... अजून वाट सापडली नव्हतीच, त्यामूळे कदाचीत आजची रात्र इथे जंगलातच घालवावी लागेल अशी लक्षणं दिसू लागली... त्यासाठी तिघांची मनापासून तयारी होती... पावसाचा जोर परत वाढला होता... थोड्याच वेळात धडपडत धारेच्या पायथ्याशी पोचलो आणि चढायला सुरुवात केली... अर्धा तास चढल्यावर लहानसं पठार लागलं... ह्या पठारावरुन कोकणाकडे पाहिलं तर... जणू आभाळच धरणीला टेकलं होतं...पठारावरुन पुसटशी वाट वर जात होती... संपूर्ण दिवसात पहिल्यांदाच जरा नीट वाटेवर चालायला सुरुवात केली... आता, आज तेलबैलाला पोचणार ह्याची खात्री होती, पण पोचायला उशीर होणार होता आणि इतक्या उशीरा तेलबैलाहून लोणावळ्याला जायला काही वाहन मिळण्याची शक्यता नव्हती... शक्यतो सरांना आजच घरी पोचायचं होतं... पठाराच्या टोकावरुन मोबाईला रेंज मिळाली, मग सरांनी त्यांच्या एका मित्राला पुण्याहून कार घेऊन सालतर खिंडीत बोलावलं... त्याला खिंडीत पोचायला संध्याकाळचे ७.३० वाजणार होते; तोपर्यंत आम्ही सुद्धा खिंडीत पोचणार होतो...
आता जरा निंवातच चढत होतो... पक्ष्यांचा चिवचीवाट आणि गवतफुलं आता लक्ष वेधून घेत होते... होला (little brown dove), हळद्या (Golden oriole), मोर, वटवट्या (Prenia) असे बरेच पक्षी स्वच्छंदपणे बागडत होते... हिरव्यागार गवताच्या गालिचावर रंगीबेरंगी गवतफुलं जास्तच मनमोहक दिसत होती...


(गौरीचे हात...)

आता धारेवरुन दुसऱ्या बाजूचा डोंगर सुद्धा नजरेस पडत होता... असंख्य जलधारा डोंगरावरुन खालच्या जंगलात विलिन होत होत्या...

ह्या वाटेवर फारशी ये-जा नसल्यामुळे वाट मळलेली नव्हती... आणि पावसात गवत वाढल्यामुळे अधून-मधून वाट नाहीशी व्हायची... जसजसे वर सरकत होतो, तसतसा चढ जास्तच तीव्र होत चालला होता... डोंगराच्या माथ्याच्या अगदी जवळ थोडीशी सपाटी लागली, मग थोडावेळ तीथे विसावलो...
(अगदी मागचा डोंगर म्हणजे सुधागड)

इथून जे काही दिसत होतं, त्याचं वर्णन करणं शक्यच नाही... केवळ स्वर्गीय अनुभव... निसर्गाचं हे रुप बघूनच कोणा एकाला स्वर्गाची कल्पना सुचली असावी...
(धुक्यातून मान वर काढून डोकावणारा सरसगड)

थोडावेळ आराम करुन शेवटचा टप्पा चढून तेलबैला पठारावर पोचलो... तेलबैला आपली दोन शिंग वर करुन धुक्यामधे बसला होता...

पठाराच्या टोकावर जाऊन खालची दरी न्याहळत बसलो...
(आज दिवसभर खालच्या जंगलात आम्ही भटकत होतो...)

आज दिवस भरात जे काही पाहिलं, अनुभवलं ते एक स्वप्नच वाटत होतं... थोडा अभिमान, खूप आनंद आणि प्रचंड समाधान होतं... एकदम सुरुवातीला जो ओढा आम्ही पार केला होता, त्याचा आवाज इथपर्यंत येत होता... संध्याकाळचे ६.१५ वाजले होते... वेळेत खिंडीत पोचायचं असल्यामुळे तेलबैला गावाच्या दिशेने चालायला लागलो... एक आजोबा गुरं हाकत गावाकडं निघाले होते... त्यांच्या सोबत गप्पा मारत गावात पोचलो... इतक्या पावसात कोणी वाटाड्या सोबत न घेता ठाणाळ्यातून वर आलो, हे ऐकल्यावर आजोबा थक्कच झाले...
म्हणाले... "जिगर केलीत तुम्ही..."
त्यांनी मस्त गरम चहा पाजला... गावातल्या लोकांची माया वेगळीच असते... किती जिव्हाळ्यानं वागतात आणि क्षणात आपलसं करुन घेतात... त्यांचा निरोप घेऊन गावातून बाहेर पडलो तेव्हा अंधारलं होतं... एकदमच आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळू लागला... काळाकुट्ट अंधार, जोराचा पाऊस ह्यामुळे दोन हातांवरच सुद्धा दिसत नव्हतं... अंदाज घेत चाचपडत चालत होतो... काळोखाला ठीगळं पाडत अनेक काजवे चमकत होते... सुमारे ८ वाजता खिंडीत पोचलो, पण कार काय आली नव्हती... तो वाटेत असेल; इथे त्याची वाट बघत बसण्या पेक्षा लोणावळ्याच्या दिशेने आम्ही चालायला लागलो... वेगळेच मंतरलेले क्षण अनुभवत रात्री ९ वाजता सालतर गावात पोचलो... थोड्याच वेळात सरांचा मित्र सुद्धा तिथे पोचला... इतक्या उशीरा ह्या रस्त्याला काळं कुत्र सुद्धा फिरकत नाही आणि अंबवणेच्या पुढचा सगळा रस्ता जरा कच्चाच आहे... शनीवारचं ऑफिस संपल्यावर, सरांचा मित्र एकटाच अशावेळी इथे आला होता आणि तेपण एकदम आवडीने... गाडीत बसलो आणि लोणावळ्याच्या रस्त्याला लागलो... भरपुर धुकं असल्यामुळे फारच सावकाश चाललो होतो... रात्री ११.३० वाजता पुण्यात घरी पोचलो... अंघोळ आणि जेवण आटपून झोपायला १ वाजला...
दुपारी १२ पासून रात्री ९ पर्यंत अगदी मोकाट भटकलो... दिवसभर मुसळधार पावसात मनसोक्त भिजलो... आज एका दिवसात अख्खा पावसाळा जगलो...

Thursday, 10 September 2009

महाबळेश्वर ते कास... चालत...

माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना...

यशदीप: पश्या... तुला माहिती आहे का?...
मी: काय?
यशदीप: अरे लोकं महाबळेश्वराहून इथ पर्यंत चालत येतात...
मी: कसं काय?...
यशदीप: कास आणि महाबळेश्वर एका डोंगररांगेनं जोडलेले आहेत...आणि पूर्वी ह्या डोंगररांगेच्या माथ्यावरुन घोड्यांचा वापर करुन लोकं ये-जा करायचे...
मी: सही रे... आपण पण जायचं का मग?...
यशदीप: जाऊत की...

मग आँगस्टच्या एका वीकऐंडला पुणे - वाई - बलकवडी धरण - केट्स पाँईट - महाबळेश्वर - कास - सातारा असा बेत पक्का केला. शनीवारी लवकर उठून सगळं आवरुन वाईची बस धरली. सुमारे ९.३० ला वाईत पोचलो. मिसळपाव आणि चहा उरकून जीपनं बलकवडी धरणाच्या जरा आधी एका गावात उतरलो, तेव्हा ११.३० वाजले होते (गावाचं नाव वयगाव असावं बहुधा). हे गाव केट्स पाँईटच्या अगदी पायथ्याशीच आहे. गावतल्या एका आजीबाईनं वाटेला लावून दिल्यावर भर ऊन्हात हळू-हळू चढायला सुरुवात केली. जसजसं महाबळेश्वराकडं सरकत होतो तसतसा गारवा जाणवत होता. निम्याहून जरा पुढं गेल्यावर एका झाडाखाली जरा वेळ बसलो; तर समोर...तळात उजव्या हाताला धोम तलाव, डाव्या हाताला बलकवडी धरण, समोर कमळगड-कोळेश्वराचं पठार आणि त्याच्या मागं केंजळगड-रायरेश्वराचं पठार असा भव्य आणि विलोभनीय देखावा होता. थोडा वेळ तिथून हलावसंच वाटत नव्हतं, पण महाबळेश्वराचा गारवा वर चल म्हणून मनाला वेड लावत होता. पुन्हा चढायला सुरुवात केली. वाटेत वेगवेगळी रंगीत फुलं वाऱ्यावर स्वच्छंदपणं डुलत होती. जणूकाही प्रत्येक फुल स्वताच सौंदर्य खु्लून दिसावं म्हणून आपली मान जास्तीतजास्त वर करुन गार वाऱ्यावर झुलत होतं. हे सगळ सौंदर्य बघण्याची, अनूभवण्याची क्षमता देवानं माणसाला दिलीयं, त्याबद्दल देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच.

(वाघनखी (glory lily))


(टोपली कारवी)

आजुबाजूचं अमाप निसर्ग सौंदर्य बघता-बघता केट्स पाँईटच्या अगदी जवळ पोचलो. तर...जरा वर फारच सुंदर नारंगी रंगाच्या फुलांनी मला खुणावलं. फुलं जरा अवघड जागीच होती, पण किती सुंदर!!! अतीशय कोवळ्या नारंगी पाकळ्या आणि स्वच्छ गडद पिवळ्या रंगाचा गाभारा. असं फुल मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. कँमेरा गळ्यात अडकवला आणि दगडावर बोटं चिकटवून फुलां जवळ पोचलो आणि फोटो घेऊन टाकला.

मग जरा पुढं गेल्यावर डाव्या हाताला दगड रचून केलेल्या पायऱ्या चढून केट्स पाँईटवर पोचलो. वरती पर्यटक रंगीबेरंगी कपड्यात बागडत होते. अश्या जागी जो-तो किती आनंदी असतो. आपण इतर वेळीपण असच आनंदी का राहू शकत नाही असा प्रश्न उगीचच पडला. कदाचीत निसर्गापासुन दुर सिमेंटच्या जंगलात न राहता, असच निसर्गाच्या कुशीत राहीलो तर हा प्रश्नच पडणार नाही. प्रगतीच्या नावा खाली आपण पर्यावरणाचा ह्रास करतोय. आहे त्याचा ह्रास करुन चंद्रावर झाडं उगवण्याची स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? आहे ते जपलं पाहीजे. केलेल्या चुकां मधुन शिकलं पाहीजे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून डोंगरांच्या, झाडांच्या सोबतीत घालवला की हे सगळ जपलं पाहीजे अशी जाणीव आपोआपच होते. कोणी वेगळ सांगण्याची गरज नाही पडत. जरा जास्तच भरकटलो......

कोणताही सीझन असुदे, महाबळेश्वरावर धुकं हे असतंच आणि आजपण होतंच. केट्स पाँईटवर गाजर घेतले आणि ते खात-खात महाबळेश्वराच्या दिशेनं चालायला लागलो. १ - १.५ तासात गावात पोचलो. थोडं कमी-जास्त करुन एका ठिकाणी राहायची सोय झाली. संध्याकाळचे ७ वाजले होते, मग जरा काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. गावातल्या मारुतीच दर्शन घेतलं आणि मग गावात साधं-सुधं हाँटेल शोधण्यात थोडा वेळ गेला. पोटभर वरण-भात खाल्ला आणि रुमवर येऊन झोपी गेलो. पहाटे लवकर उठून थंड पाण्यानं आंघोळी उरकल्या. दप्तरं पाठीवर अडकवली आणि मेढ्याच्या रस्त्याला लागलो. महाबळेश्वरहून कासच नक्की अंतर किती आणि रस्ता कसा आहे ह्याची नीटशी जाणीव नव्हती म्हणून जरा झपाझप चालत होतो. मस्त सकाळची वेळ...थंड हवा...हलकं धुकं...पक्ष्यांची किलबील...अनोळखी वाट आणि एकांत ह्यामुळं चालताना वेगळाच उत्साह होता. सव्वा तासात ७ - ८ कि.मी. अंतर पार करुन 'माचुतर' गावात पोचलो. गावातून जरा पुढं गेल्यावर उजव्या हाताला झाडीत काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली...

यशदीप: (जरा दचकून आणि थांबून) पश्या...थांब जरा...काहीतरी आहे झाडीत...
मी: काही नाही रे... माकडं असतील...
यशदीप: नाही रे...जरा जास्तच आवाज आला...
मी: चल रे पुढे...घाबरतो काय उगीच...

आणि तितक्यात, माझ्या पासुन फारतर ५० फुटांवरुन गव्यांचा कळप रस्ता पार करायला लागला. त्यात गव्यांची पील्लं पण होती. यशदीप जरा मागं सरकला आणि मी दचकून होतो तिथूनच बघत राहीलो...

यशदीप: अबे ये...मागं ये जरा...अंगावर येईल एखादा...
मी: नाही रे...इतक्या जवळून बघायला मिळतयं...दोन-चार मस्त फोटो काढून घेतो...
मग मी दप्तरातून कँमेरा काढला आणि फोटो घ्यायला सुरुवात केली.

जरा दचकलोच होतो त्यामुळं झूम करुन फोटो काढावा असं सुचलं नाही. फोटो काढतानाच काही गवे रस्ता पार केल्यावर थांबले आणि आमच्याकडं बघू लागले.

आता जरा घाबरलो आणि हळूच कँमेरा दप्तरात टाकून तिथंच ऊभा राहीलो. जर गवे अंगावर आले तर पळण्याच्या तयारीतच ऊभा होतो, पण तसं काही झालं नाही. गवे निवांतपणे झाडीत घुसले. मग आम्हीपण पुढं निघालो आणि ध्यानी-मनी नसताना अचानकच गवे दिसल्या बद्दल जाम खुष होतो. माचुतर पासून १.५-२ कि.मी. पुढं गेल्यावर उजव्या हाताला एक अरुंदसा रस्ता लागला. थोडा वेळ तिथं थांबल्यावर त्या रस्त्या वरुन एक टेम्पो येताना दिसला. हाच रस्ता कासला जातो असं टेम्पोवाल्यानं सांगीतल्यावर पुन्हा आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली. बराच वेळ चालल्या नंतर डाव्या हाताला बरच मोठ्ठ आणि फेमस हाँटेल लागलं (नाव आता आठवत नाही). तिथून जरा पुढं गेल्यावर डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता सुरु झाला. इथं यशदीपला रस्त्यावर लहानसा साप (शील्ड स्नेक) सरपटताना दिसला.

पुढं गेल्यावर सरळ न जाता डाव्या हाताच्या रस्त्यानं जरा खाली उतरुन धारदेवच्या देवळात पोचलो तेव्हा १०.३० वाजले होते. देवळात दोन-चार लहान मुलं खेळत होती. शंकराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मार्गी लागलो. आता उजव्या हाताला तळात सोळशी नदीच खोरं दिसत होतं. उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती. एक लहानशी खिंड लागली. खिंडीत जरा सावलीत बसून थोडं खाल्लं आणि गाळदेवच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. आजुबाजूची हिरवळ कमी झाली होती आणि उन्ह वाढत होतं. दुरवर डाव्या हाताला डोंगराच्या एका सोंडेवर दोन-चार घरं दिसली. जवळ पोचल्यावर एका पडलेल्या दगडी कमानीवर 'गाळदेव' लिहीलेलं दिसलं. गावात न जाता काही क्षण तिथंच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागलो. भवतालचा प्रदेश जास्तच ओसाड आणि रुक्ष जाणवत होता. धारदेव नंतर कुठेच माणसांची चाहूल सुद्धा लागली नव्हती. थोडं पुढं गेल्या वर वाटेच्या दोन्ही बाजूला पडकी घरं लागली आणि मग एक हापसा आणि नांदती घरं दिसली. हापश्याच्या गार पाण्यानं इतका वेळ उन्हात चालून-चालून दमलेलं शरीर जरा सुखावलं. कास अजून किती दुर आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती म्हणून जास्त वेळ न घालवता वाटेला लागलो. वाटेत सावली देणारं एकही झाड नव्हतं. कमरे इतक्या उंच झुडपांची मात्र गर्दी होती. मधूनच एखादा ढग सूर्याला झाकून थोडी सावली देत होता. आता उजव्या हाताला तळात कोयना आणि सोळशीच्या संगमावर वसलेलं तापोळा आणि डाव्या हाताला दूरवर मेरुलींगाचा डोंगर जाणवू लागला होता.

जरा भूक लागली होती. मग भर उन्हातच बसून खाऊन घेतलं. समोरचं टेपाड पार केल्यावर गुरं आणि गुराखी दिसला. त्यानं दूरवर अस्पष्ट दिसणाऱ्या डोंगराकडं बोट दाखवत तेच कासचं पठार असल्याच खुणावलं. सकाळ पासून पहिल्यांदाच नक्की कुठं जायचंय आणि अजून किती चालायचय हे कळालं होतं. आता पाय जरा निवांतच पुढं सरकत होते. इतका वेळ मंजील दिसत नव्हती, म्हणून ती जवळ करण्यासाठी थकवा, उन्ह, भूक ह्याचा विचार न करता बिंधास्त चालत होतो; पण आता मंजील दिसताच शरीर जरा आळसावलं होतं, नखरे करत होतं. असंच काहीतरी आयुष्यातल्या इतर ध्येयांच्या बाबतीत देखील घडत असतं, पण ते आजच्या सारखं स्पष्ट जाणवत नाही.

अर्धा तास चालल्यावर एका लाहनश्या गावातल्या शाळेच्या आवारात पोचलो. शाळा म्हणजे फक्त एकच खोली होती, मात्र वर्ग चवथी पर्यंत होते. शाळेच्या ओट्यावर थोडा वेळ विसावलो आणि पुन्हा चालायला लागलो. एक लहानशी खिंड लागली. वर दाटून आलेल्या ढगां मुळं जरा काळोख झाला होता आणि त्यात कोयना धरणाच्या पाण्याचा देखावा छान दिसत होता.

खिंड पार करुन कासच्या पठारावर पाय ठेवला आणि गर्द झाडीत विसावलेला कासचा तलाव उजव्या हाताला दिसला. मग अजून पाऊण तास पायपीट करुन कासच्या तलावा जवळ सातारा-बामणोली रस्त्याला लागलो तेव्हा दुपारचे ३.४५ वाजले होते. इथं गवतफुलं बघायला आलेल्या पर्यटकांची थोडी गर्दी होती. सुंदर, नाजुक आणि रंगीबेरंगी गवतफुलांनी संपुर्ण पठार नटलं होतं.

जाम दमलो होतो. अर्धा तास आराम केला. यशदीपचा डावा पाय जरा दुखत होता. तरी सुद्धा...

यशदीप: पश्या...बस यायला अजून दोन तास आहेत...
मी: काय करायचं मग...
यशदीप: चल...यवतेश्वरच्या दिशेनं चालायला लागूत...
मी: चल...

बऱ्याचदा थोडेफार कष्ट केले की शरीर थकतं, पण आवडीचं काम असेल तर मन अजीबात थकत नाही. मग थकलेल्या देहात सुद्धा कुठूनसं नवीन चैतन्य येतं आणि आपण पुन्हा कामाला लागतो. अर्धा तास चालल्यावर पेट्री गावच्या जवळ एका कारनं आम्हाला लीफ्ट दिली. यवतेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या बोगद्या जवळ कार मधून उतरलो. थोडा वेळ वाटलं की आता रिक्षा करुन घरी जावं, पण लगेचच...छे! रिक्षा काय...चालतच घरी पोचायच. मग सरळ रोजच्या रस्त्यानं न जाता, उजव्या हाताला चढून गेल्यावर अजिंक्यताऱ्यावर जाणारा डांबरी रस्ता लागला. ह्या रस्त्यानं उतरत चारभींती टेकडी जवळ पोचलो. चारभींती टेकडी उतरुन यशदीपच्या घरी पोचलो तेंव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. ह्या दोन दिवसात जवळ-जवळ ५५ कि.मी. चाललो होतो. मस्त गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर थकवा नाहीसा झाला. मग यशदीपच्या आईनं केलेल्या पुरणपोळ्या-तुप पोटभर खाल्ल्या आणि मागच्या दोन दिवसांच्या आठवणी स्मरत झोपी गेलो.

Tuesday, 8 September 2009

सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...

मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...).

तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं. पानशेतच्या जवळ एका डोंगरावर नीळकंठेश्वराचं मंदिर पाहण्या सारखं आहे, असं ऐंकून होतो. मग रविवारी सायकलवर एकटच नीळकंठेश्वरला जायचा प्लान ठरवून टाकला. नीळकंठेश्वरा बद्दल पुरेशी महीती नव्हती, पण भटकायचं तर होतंच आणि एकटाच होतो; मग नीळकंठेश्वरला न पोचता भलतीकडेच कुठेही पोचलो तरी चालण्या सारखं होतं.

रविवारी सकाळी सगळं आवरल्यावर पाण्याची बाटली आणि १-२ बिस्कीटाचे पुडे दप्तरात टाकले आणि दप्तर पाठीवर अडकवून सायकल वर सुटलो. नेहमीच्या टपरीवर एक उपीट आणि चहा घेतला आणि सिंहगड-रोडला लागलो. सकाळची वेळ असल्यामुळं नेहमीची गर्दी नव्हती. बारीक पावसामुळं रस्ता मस्त ओला झाला होता. जरा निवांतपणे रमत-गमतच खडकवासला धरणा जवळ पोचलो. मग धरणाच्या काठानं जात डोणजे फाटा गाठला. फाट्यावर पानशेतला जाणारा उजव्या हाताचा रस्ता धरला. मी पहील्यांदाच ह्या रस्त्यावरुन चाल्लो होतो. आता रस्त्यावर क्वचीतच कोणी दिसत होतं. डाव्या हाताला सिंहगड धुक्यातून अधून-मधून डोकावत होता. हिरव्यागार झाडीतून चढ, उतार आणि वळणं घेत मी पुढं सरकत होतो. कसलीच घाई नव्हती, उगीचच बडबड करणारं कोणी नव्हतं आणि जरा थांब आराम करुयात अस म्हणणारं पण कोणी नव्हतं. एकटं फिरण्याचा हा फायदा असतो.

डोणजे फाट्याहून १०-१२ km पुढं आल्यावर उजव्या हाताला एक घर आणि दुकान लागलं. तीथं पाणी प्यायलो आणि नीळकंठेश्वरा बद्दल चौकशी करुन पुढच्या वाटेला लागलो. अधून-मधून पाऊस पडत होता आणि डोक्यावर घोंगडी घेऊन गावकरी रस्त्याच्या कडेनं शेतात चाल्ले होते. आता रस्ता मुठा नदीला समांतर जात होता. नदीचं पात्र गढूळ पाण्यानं तुडूंब भरुन वाहत होतं आणि नदीचे किनारे मस्त हिरवेगार होते. पानशेत फक्त ५-६ km च उरलं होतं. नदीच्या दुसऱ्या बाजूला नीळकंठेश्वराचा डोंगर दिसत होता, पण नदी कशी ओलांडायची हे कळत नव्हतं. तितक्यात एक गावकरी शेतातून येताना दिसला....

मी: राम-राम काका...
गावकरी: राम-राम... ह्या पावसात सायकलवर कुणी कडं निघालात...
मी: मला नीळकंठेश्वरला जायचयं तर नदी ओलांडून त्या बाजूला जाता येतं का?
गावकरी: हो... तर काय...जाता येतं की...
मी: पण कुठून?
गावकरी: मागं फिरा आणि मागच्या गावात पोचा... तिथून होडीनं दुसऱ्या बाजूला जाता येतं... तुमची सायकल पण जाईल होडीतून... पुण्याहून आलात का?
मी: हो.. जातो मग मागच्या गावात...
गावकरी: जपून जारं बाबा...
मी: हो.. येतो मग...

वळलो आणि लगेचच गावात पोचलो. नदी रस्त्यापासून बऱ्यापैकी आत होती आणि तिथं पोचायला नीट वाट नव्हती. मस्त लाल चिखल तुडवत सायकल खेचत मी चालायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर सायकल चिखलातून हलेच ना, मग सायकल उचलून खांद्यावर घेतली आणि होडी जवळ पोचलो. दोनजण होडीत बसले होते, मी पण सायकल सकट होडीत बसलो. होडी एका काठा वरुन दुसऱ्या काठा वर न्ह्यायची idea भारी होती. एक मजबुत दोर ह्या काठा पासून त्या काठा पर्यंत बांधला होता. मी होडीत बसल्यावर होडीच्या मालकानं दोराच्या मदतीनं होडी ओढत-ओढत दुसऱ्या काठावर पोचवली.

(होडी आणि होडीचा मालक )

त्याला ३ रुपये देऊन मी सायकल घेऊन खाली उतरलो. परत चिखलातून वाट काढत जरा कच्च्या पण बऱ्या रस्त्यावर पोचलो. थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला नीळकंठेश्वरावर जाणारी वाट लागली. चढ बराच होता. मग पायडलवर उभं राहून सायकल चढवायला सुरुवात केली आणि दगडातून वाट काढत एका लहानश्या गावात पोचलो. सायलक गावातच लावली आणि पायी चढायला सुरुवात केली.

पायवाटेच्या दोन्ही बाजूला मस्त घाणेरी फुलली होती. मला घाणेरीची फुलं जाम आवडतात. इंद्रधनुष्याला लाजवतील इतकी रंगीत ही फुलं असतात. घाणेरीच्या हिरव्यागार झुडपावर रंगी-बेरंगी बारीक-बारीक फुलांचा गुच्छ बघूनतर वेडच लागतं. इतक्या सुंदर फुलाचं नाव 'घाणेरी' ठेवावं असं कोणाला सुचलं असेल ते देव जाणो.

तळात हिरवीगार शेतं वाऱ्यावर मस्त डुलत होती. काय तो हिरवा रंग! एक वेगळंच चैतन्य आणि वेगळाच जीवंतपणा असतो ह्या पावसातल्या हिरव्या रंगाला. किती निरागस भाव असतात ह्या हिरव्या रंगाचे. मन अगदी भरुन येतं आणि आपल्या नकळतच देवाचे (निसर्गाचे) आभार मानायला लागतं.

हे सगळं अनूभवत अर्ध्या तासात मी नीळकंठेश्वराच्या देवळात पोचलो. देऊळ बऱ्यापैकी जुनं आणि फारच मोठ्ठं आहे. नीळकंठेश्वराचं दर्शन घेऊन मी देवळाच्या मागच्या बाजूला आलो. देवळाच्या परीसरात बरेच पौराणीक देखावे उभे केले आहेत. सगळ्या मूर्त्या सिमेंटच्या असल्यामुळं पावसापाण्याचा काही त्रास नाही. देवळाच्या परीसरातले हे भव्य देखावे बघून गणपतीतल्या देखाव्यांची आठवण होते.

(अल्हाददायक वातावरणामुळं हा इंद्र दरबार खरंच स्वर्गलोकी भरल्या सारखं वाटत होतं...)

(कोसळणारा पाऊस...जोराचा वारा...विजांचा कडकडाट आणि धुकं...ह्यामुळं समुद्रमंथनाचा हा देखावा जिवंत झाला होता...)

मस्त पाऊस कोसळत होता. त्यातच जोराचा वारा आणि धुक्यामुळं वातावरण एकदम भारावून गेलं होतं. ह्या कोसळणाऱ्या पावसात डोंगराच्या कड्यावर बसून मी तळ न्याहाळत होतो. वरुन पानशेत आणि वरसगाव धरणं आणि त्यांना वेगळं करणारी दोंगररांग मस्त दिसत होती.

(पानशेत आणि वरसगाव धरण)

पावसात भिजतच पूर्ण डोंगर भटकून घेतला. इतक्या वेळ भटकून झाल्यावर करण्या सारखं काही नव्हतं. मग जरा भूक लागल्याची जाणीव झाली. मग जवळ होतं ते खाऊन घेतलं आणि डोंगर उतरायला सुरुवात केली. रोजच्या सवयी प्रमाणं गडगडतच डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. गावात जरा चौकशी केल्यावर कळलं की परत पानशेतला न जाता डाव्या हाताचा रस्ता धरला तर वार्ज्यातून पुण्याला पोचता येतं. आलेल्या वाटेनं परत न जाता नविन वाट बघायला मिळणार म्हणून जाम खुष होतो. मग गावातून सायकल घेतली आणि उतारावर सुसाट सुटलो. हा रस्ता फार कमी वापरातला आणि अरुंद होता.

(माझी सायकल)

रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतात पेरणीची कामं चालु होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. मी एकटाच निवांत चाल्लो होतो. बघावं तिथं ओला हीरवा रंग आणि भिजलेल्या मातीचा काळा रंग मनाला वेड लावत होता. चिमण्या, बुलबूल, सुर्यपक्षी, वटवट्या, मैना, सुभग अश्या बऱ्याच पक्ष्यांचा चिवचीवाट ऐकत मी पुढं सरकत होतो. पेरणीच्या हंगामातली गाणी गुणगुणत शेतकऱ्यांची कामं चालू होती. एकदा वाट विचारुन घ्यावी म्हणून मी एका काकूंशी बोलायला लागलो....

मी: ही वाट वार्ज्याला जाते ना?
काकू: वार्ज्याला????... नाय...
मी: मग?...
काकू: ह्या वाटंनं तुम्ही पीरंगुटला पोचणार....
मी: पीरंगुटला?...हरकत नाही... (पीरंगुटहून चांदणी चौक आणि मग कोथरुड गाठायचं असा विचार डोक्यात सुरु झाला...)...किती वेळ लागेल पीरंगुटला पोचायला?..
काकू: सायकल वर दोन तास तरी लागत्याल... मोठ्ठा घाट हाये... सायकल ढकलतच न्ह्यावी लागंल...काय झालं तर मदतपण नाय मिळणार...माझं ऐका...माघारी जावा अन् डाव्या हाताला वळा...म्हंजी वार्ज्याच्या वाटंला लागाल....
मी: (च्याआयला...घाटात काय झालं म्हणजे पंच्याईत... त्यात परत संध्याकाळ व्हायची वेळ झाली होती... वार्ज्याच्या वाटेनं गेलेलच बरं...)...बरं...वार्ज्याच्या वाटेनंच जातो...

मग वळून ५-६ km मागं आल्यावर डाव्या हाताला वार्ज्याची वाट लागली. थोडं पुढं गेल्यावर NDA चा परीसर लागला आणि मग खडकवासला धरण. सायकल रस्त्याच्या कडेला लावून मी धरणाच्या काठावर जावून थोडा वेळ बसलो. धरणाच्या पलीकडच्या काठावर प्रचंड गर्दी जाणवत होती, मात्र ह्या काठाला मी एकटाच होतो. अश्या एकांतात एखाद्या पाणवठ्याकाठी मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं... असेच एकांत काठ आयुष्यात पुढेपण येतील अश्या आशेने सायकलवर वार्ज्याच्या दिशेनं निघालो. मग एक ट्रक झपकन् सायकलला घासून गेला...मग हाँर्नचे आवाज...दुचाकींची गर्दी...लोकांची आरडाओरड... ह्यामुळं शहरात पोचल्याची जाणीव झाली.

घरी पोचल्यावर मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली आणि उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला...

Rafa....the best...

मी रेखाटलेलं sketch


थोडा contrast वाढवल्यावर...

कर्नाळा - जैत रे जैत

गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं.

एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.

मी टम-टम वाल्या काकां सोबत गप्पा मारायला लागलो.....

मी: गेलाय का कधी कर्नाळ्याला?
काका: हां...तर....
मी: त्या सुळक्या वर चढतात का लोकं?...
काका: हां... तो काय वरती झेंडा.... पण दोर लावून चढतात... मी नाय कधी चढलो....
मी: दोर न लावता नाही का चढता येत....
काका: आता... चढायचच असेल तर काय.... पण कशाला विषाची परीक्षा घ्यायची?....
मी: खरं आहे... (पण मी एक तरी try मारणार....)

बोलता-बोलता कर्नाळ्याला पोचलो आणि प्रत्येकी २० रुपयाच तिकीट काढून अभयारण्यात घुसलो. पक्ष्यांचा चिवचीवाट आणि दाट झाडी, यामुळं निवांत वाटलं. आत घुसल्या-घुसल्या लगेचच वाटेच्या दोन्ही बाजूला bird trails सुरु होतात. आम्ही bird trails वर न जाता सरळ जाऊन डाव्या हाताला कर्नाळा किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेला लागलो. पायवाट मस्त मळलेली असल्यामुळं वाट चुकायची भीती अजिबात नव्हती. पावसाळा संपून एक महीना झाला तरी ओढ्यांमधे पाणी होतं. वर चढताना सारखं, जैत रे जैत मधलं "वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...." हे गाणं डोक्यात वाजत होतं. अर्धा तास चढून गेल्यावर डाव्या हाताला प्रबळगड आणि कलावंतीणीचा सुळका दीसू लागला, त्याच्या मागे माथेरानचा दोंगर पण जाणवत होता. "लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला...हा ठाकर गडी तिथं कधी नाय गेला....".हे गाणं गुणगुणत आम्ही पुढे सरकत होतो आणि एकदमच लिंगोबाच दर्शन झालं.

"ह्या दोंगरान आपलं बोट कश्यापाई उचील्लं?..." असा प्रश्न मलापण पडला (जैत रे जैत मधल्या नाग्या सारखाच). मग जैत रे जैत मधले dialogues आणि scenes आठवत किल्यात प्रवेश केला. आत घुसल्यावर समोरच किल्लेदाराचा वाडा आणि त्याच्या मागं आभाळात घुसलेला टेंबा दिसला. टेंबा न्याहाळतच त्याच्या पायथ्याशी पोचलो. टेंब्याच्या पोटात बरीच पाण्याची टाकी आहेत, एका टाक्या जवळ बसून, आणलेलं थोडफार खाऊन घेतलं. मग.........

मी: मला जमेल का रे टेंब्यावर चढायला?
यशदीप: तू चढशील आरामात...
मी: चला...जरा जमतय का ते बघू....
प्रसाद: उगी हीरोगीरी नको करु.... आपटशील तोंडावर...
मी: थोडं चढतो...मग बघूत...

सुळक्याच्या पोटात असलेल्या एका झाडाच्या मदतीनं मी पहिला टप्पा पार केला. मग दगडात कोरलेल्या खोबण्यांच्या मदतीनं थोडं चढलो. आता ३-४ माणूस उंच rock-patch होता आणि थोडा overhang पण होता. overhang पर्यंतचा भाग आरामात चढलो, पण आता उजव्या पायाला काहीच grip मिळत नव्हती. उजवा हात खोबणीत मस्त चिकटला होता आणि डावा पाय पण खोबणीत होता. आता डाव्या हातानं push hold घेऊन सरपटच तो overhang चढलो (उतरताना वाट लागणार ह्याची जाणीव झाली...).

(मी चढताना दिसतोय ह्या फोटोत)

डाव्या बाजूनं जरा वर गेलो आणि मग चारजण बसतील एवढी जागा होती, तीथं थोडावेळ बसलो. आता ६ फुट उंच पायरी सारखा टप्पा पार करायचा होता... दोन्ही हात पायरीच्या वर ठेवले, पायानं जोरात push केलं आणि हातावर शरीर balance करत पायरीच्या वर पोचलो. आता पुढची वाट तशी सोपी होती. पण प्रचंड exposure आणि बऱ्यापैकी scree होती. जरा जपुन हा ट्प्पा पार केला आणि सुळक्याच्या डोक्यावर पाय ठेवला. कसला खुष होतो मी... पहील्यांदा कोणतातरी सुळका चढलो होतो...आणि ते पण एकटा... रोप चा वापर न करता.....अजून काय पाहीजे?....लय भारी. वरुन आजूबाजूचा केवढा परीसर दिसत होता!एखाद्या घारीनं उडत खालचा परीसर न्याहाळावा....तसच क्षणभर मला वाटून गेलं....

थोडा वेळ बसुन उतरायला सुरुवात केली. नजर एकदम प्रचंड खोल दरीतच उतरत होती. जराजरी चुक झाली की एकदम पाताळातच पोचणार होतो. solid concentration नं exposure आणि scree असलेला टप्पा उतरलो. मग ६ फुट उंच पायरी आरामात उतरलो आणि झाडा-झुडपांच्या मदतीनं बराचसा भाग उतरुन overhang च्या ट्प्प्याच्या वर पोचलो. इतक्या वेळ टेंब्याकडं पाठ करुन निवांत उतरत होतो, पण आता मला टेंब्याकडं तोंड करुन उतरावं लागणार होतं. वळलो, पण पाय कुठे ठेवायचे हेच दिसत नव्हतं आणि blindly उतरावं म्हंटल तर फक्त एकाच हाताला grip होती. थोडा वेळ प्रयत्न करुन पाहीले पण खाली काही उतरता येईना, मग परत जरा वर जावून बसलो.
खालून...

यशदीप: काय रे.... जमतयं ना?..
मी: अरे... एका हाताला grip नाही रे...
यशदीप: वर चढताना कसा गेलास मग?....
मी: चढतानाच जाणवलं होतं की उतरताना लागणार आहे ते... पण चढायचच होतं.... आता जरा बोंब आहे...थांब जरा...
प्रसाद: नडलं ना आता... म्हणत होतो....
मी: थांब रे.... grip सापडते का बघतो.....

मग मी बसलो होतो तीथलं आसपासच गवत उपटून, दगडात एखादी खोबण सापडते का ते शोधायला सुरुवात केली. luckily हाताला एक खोबण लागली.
आता दोन्ही हातांना मस्त grip होती...मग दोन्ही हातांनी लोंबकाळत, पायांनी चाचपडत, पाय ठेवायला कुठं खाच सापडते का ते शोधू लागलो. डावा पाय ठेवायला खाच सापडली; पण उजवा पाय अजून हवेतच होता. उजव्या पायाला काही आधार मिळाल्या शिवाय मी खाली सरकू शकणार नव्हतो. जाम टरकली होती आता माझी. भर दुपारची वेळ, घसा कोरडा पडला होता, सर्वांगाला घाम फुटला होता आणि आता बराच वेळ लोंबकळल्या मुळं हात एकदम निर्जीव झाले होते. मग परत वर गेलो आणि थोडा वेळ शांत बसलो.
खालून...

प्रसाद: मी जरा वर येऊन guide करु का?
मी: नको रे.... जमेल मला.... (आणि मदत घेऊन काय खाली उतरायचं...)

हातात परत जरा जीव आल्या सारखं वाटल्यावर, मी पुन्हा लोंबकळत उजव्या पाया साठी खाच शोधू लागलो. पण काही केल्या उजवा पाय ठेवायला काहीच सापडत नव्हतं. जास्त वेळ लोंबकाळण्याच्या स्थितीत नसल्या मुळं, मी डावा हात सोडला (डाव्या हात उजव्या हाता पेक्षा वर होता) आणि अंग जरा खाली सरकवलं तर उजवा पाय मस्तपैकी एका खोबणीत अडकला. आता दोन्ही पायांवर वजन टाकल्या मुळं हातांना जरा आराम मिळाला. डावा हात overhang च्या खालच्या फटीत अडकवून, उरलेला टप्पा उतरलो. हुशशशश्य्.....जरा जिवात जीव आला... मग, थोडा वेळ बसता येईल अश्या जागी पोचलो आणि ओरडून.....

मी: आता झालं.... उतरतो आता आरामात.... (भन्नाट आनंद झाला होता.... फार अंगावर आलं होतं नसतं धाडस...)

मग उरलेला टप्पा निवांतपणे उतरुन, टेंब्यावरुन झाडावर ऊडी घेतली आणि शेवटी खाली पोचलो. लगेचच पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि पोटभर पाणी प्यायलो. जाम थकलो होतो, पण तेवढाच खुष होतो. मनातल्या मनात देवाचे फार आभार मानले.

यशदीप: पश्या... नको करत जावू असलं काही... अवघड वाटलं तर नाही चढायचं... अश्या जागी, अश्या वेळी काही झालं तर काय करणार होतो आम्ही दोघं?....
मी: हो... नाही करणार परत असं...

माझं डोकं एकदम हलकं झालं होतं. कसलेच विचार येत नव्हते. खूप खूप स्वतंत्र असल्या सारखं वाटत होतं. मग त्याच आनंदात संपूर्ण किल्ला भटकलो.
पण अजून सुद्धा असलं काही आव्हान समोर आलं तर मला अजिबात control होत नाही...आणि मग...वनी आनंद...भूवनी आनंद...आनंदी आनंद वनभूवनी....