भाल्या आपल्याच तंद्रीत बिडी ओढत बांधावरुन घराकडं चालला होता. वेळेची आणि आजुबाजूला काय चाल्लयं ह्याची त्याला अजीबात जाणीव नव्हती. तितक्यात मागून आवाज आला... "अरे ये भाल्या! थांब जरा... मी पण येतो". मग दोघे सोबतच चालू लागले...
"बिडी दे रे" सोबतचा म्हणाला...
भाल्यानं त्याला बिडी दिली...
सोबतचा "झकास... ३० नबंर!!!... हीच ओढतो मी रोज..."
इकडच्या्-तिकडच्या गप्पा मारत दोघे चालत होते...
तितक्यात..."बिडी दे रे" सोबतचा परत म्हणाला...
ती पण संपली... परत सोबतच्यानं बिडी मागीतली... भाल्या मात्र अजून पहिलीच बिडी ओढत होता... त्याला बिडी दिली आणि भाल्या जरा दचकलाच... रात्रीचे १२ वाजून गेलेत आणि आजुबाजूला किर्रर् काळोख असल्याची पहिल्यांदाच भाल्याला जाणीव झाली... त्यात आज आमोश्या... मग भाल्यानं झपाझप चालायला सुरुवात केली... सोबतचा एका मागोमाग एक अश्या सारख्या बिड्या मागत होता... आपल्या सोबत नक्की कोण चालतयं हे सुद्धा भाल्या माहिती नव्हतं... तुक्यादा असेल असा इतकावेळ त्याचा समज होता... पण आता तू कोण? हे विचारायचं धाडस भाल्याला होईना... बांध खाजणातून कोळीवाड्याकडं जात होता... बांधाच्या एका बाजूला पडका किल्ला आणि दुसऱ्या बाजूला खाडी होती... नुसती स्मशान शांतता पसरली होती... मधूनच खेकड्यांच्या हालचालीमुळं पाण्याचा आवाज होत होता... निवट्यानं खाडीच्या पाण्यात उडी घेतली की बुडूक असा आवाज होत होता... खरंतर हे आवाज भाल्यासाठी रोजचेच होते, पण आज त्याला आवाजामुळं दचकायला होत होतं... हळूच भाल्यानं खाली पाहीलं तर काळोखात सोबतच्याचे पायच दिसले नाहीत... फक्त स्वताच्याच चपलांचा आवाज भाल्याला ऐकू येत होता... आता भाल्याला भितीनं घाम फुटला होता... खाजणातून कोल्हे-कूई चा आवाज ऐकू येत होता... खूप वेळ झाला तरी गाव जवळ येत नव्हतं... भीतीनं भाल्या कापत होता... सोबतचा अजूनपण बिड्या मागतच होता... शेवटची बिडी उरली होती... बिड्या संपल्यावर काय होणार? ह्या भीतीने भाल्यानं पळायला सुरुवात केली... बरंच पळल्यावर दमल्यामुळं भाल्या थांबला... तोच त्याला खांद्यावर कोणाचातरी हात जाणवला आणि आवाज आला...
"कीती पळशील?... आज आमोशेची रात्र... आणि माझ्याच हद्दीत आहेस..."
जीवाच्या आकांतनं भाल्या अजूनच जोरात पळत सुटला... गावाच्या वेशीच्या आत गेल्यावर भाल्यानं मागं पाहीलं तर तो वेशी जवळच थांबला होता... भाल्या पळतच घरात घुसला...
"काय रं... काय झालं?... इतका कश्यापाई घाबरला हाईस्?" भाल्याच्या आईनं विचारलं...
भीतीनं भाल्याची बोबडीच वळली होती... धापा टाकतच घडल्या प्रकारा बाबत भाल्यानं आईला सांगीतलं...
आईनं काही ते मनावर घेतलं नाही... उलट ती म्हणाली "आरं पण... रोजच येतूस की बांधावरनं ह्या वक्ताला... पोटात काय न्हाय तुझ्या... जा... सकाळचं बोंबलाच कालवण अन् सुकट हाय... जरा जेवून घ्ये... म्या बसते तुझ्या संग".
जेवण झाल्यावर माय-लेक झोपी गेले... भाल्याला झोप लागत नव्हती... सकाळ व्हायची वाट बघत तो पडून होता... पहाटे कुठेतरी भाल्याचा डोळा लागला...
भालचंद्र गणपत परदेशी म्हणजे भाल्या... कोळी गडी, लंगोटीत भजीची पुडी अन् वडतयं बिडी... अशी त्याची तह्रा... बिडीचं भयंकर वेड... दारु पाई बापाला जाऊन ११ वर्ष झाली... तेव्हा पासून माय-लेक दोघंच नांदतायत... भाल्याच वय ३३, पण अजून लग्नाचा पत्ता नाही... जरा आळशी माणूस, पण आपलं नशीबच शेण खातयं असं भाल्याच म्हणनं... आई खंबीर म्हणून चाल्लंय सगळं... दिवसभर होडी घेऊन डोलीला जातो... पण म्हावरा काय लागत न्हाय... हातात पैसे टीकतच नाहीत... म्हणून कमवेल ते आईच्या हाती टेकवतो... पण रोज न चुकता बिडी साठी आई कडून पैसे घेतो...
जरा उशीराच उठून तोंड घाशीत भाल्या पडवीत येऊन बसला... रात्रीच्या प्रकारानं डोकं भणभणलं होतं...
लोकं हसतील... कोणाला सांगाव की नाही असा विचार चालू होता... 'जाऊदे... नको सांगायला कोणाला' असं म्हणून भाल्या घरात शिरला... आईनं विचारल्यावर भाल्यानं तो विषय टाळला...
दुपारचं जेवण उरकून भाल्या जरा पडला होता... तोच..."भाल्या!... अरं ये भाल्या!... येतो का पकटीवर" ह्या आवाजानं भाल्याला जाग आली... बाहेर येऊन बघतोतर तुक्यादा होता...
तुक्यादा म्हणजे भाल्याचा चुलत काका... गावचा पाटील... दोघं पकटीवर जायला निघाले... बांधावरुन जाताना परत रात्रीचं सगळं भाल्याला आठवू लागलं... सांगू की नको... सांगू की नको असं करत करत शेवटी भाल्यानं काल रात्री जे काही घडलं ते तुक्यादाला सांगीतलं... इतकी वर्ष झाली पण तुक्यादानं असलं कधी ऐकलं नव्हतं... असलं काही घडूच शकत नाही असं तुक्यादाचं म्हणनं नव्हतं... पण भाल्या अजून घाबरु नये म्हणून तुक्यादानं विषय बदलला... पकटीवर पोचल्यावर दोघंजण आपआपल्या कामाला लागले... सगळं काम आटपून संध्याकाळच्या आतच भाल्या आज घरी आला आणि लवकर झोपी गेला... तुक्यादाला काम उरकून निघायला रात्र झाली... तुक्यादा एकटाच बांधावरुन येत होता... सकाळी भाल्यानं सागीतलेली गोष्ट तुक्यादाला आठवली... त्याच विचारात बांधावरच्या वडाच्या झाडाजवळ पोचला... काळोखात वडावर दोन डोळे चमकत होते... काहीतरी हेरतायत असं वाटत होतं... आता तुक्यादाला जरा भिती वाटू लागली आणि तितक्यात फडफड करत ते घुबड किल्ल्याकडं उडालं... फडफड संपल्यावर परत रात्रीच्या शांततेनं तुक्यादाला वेढलं... एकटा असल्यामुळे तुक्यादाचं डोकं सुन्न झालं होतं आणि तेवढ्यात आवाज आला...
"तुक्यादा!... थांब जरा... एक बिडी दे...े"
तुक्यादाच्या अंगावर काटा आला... थोडावेळ तुक्यादा तिथंच घट्ट झाला... काळोखात वडाखाली कोणीतरी बसल्याचं जाणवत होतं, पण इतक्या रात्री वडाखाली कोण बसलंय?... हातातलं तिथच टाकून तुक्यादानं जो पळ काढला तो थेट घरी पोचे पर्यंत एकदापण मागे वळून पाहिलं नाही... तुक्यादा जरा भेदरलाच होता... घरी हे सांगताच त्याच्या बायकोनं दोन आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुक्यादाला करुन दिली...
दोन आठवड्यापूर्वी पक्या एकटाच संध्याकाळी चिंबोऱ्या पकडायला खाडीत गेला होता... दोन दिवस आलाच नाही परत... म्हणून गावकऱ्यांनी शोधाशोध केली तर पक्याचं प्रेत खाजणात सापडलं... पक्याला पुढंमागं कोणीच नव्हतं... एकटाच असायचा... गावात कोणाशीच पटायच नाही त्याचं... सारखी कोणा ना कोणाशी भांडणं चालूच असायची... बिडीचं खूप व्यसन होतं त्याला... पक्या कसा मेला हे कोणालाच माहीती नव्हतं... कोणीतरी त्याला ठार केल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती... आणि बांध ह्याच खाजणातून जात होता...
हे आठवल्यावर तुक्यादा उडालाच... तसाच भाल्याच्या घरी पोचला आणि सगळं सांगीतलं... आता भाल्याच्या आईचा पण विश्वास बसला... म्हणजे पक्याचं भूत?... पण कोणीतरी माणूसच हे सगळं करण्याची शक्यता होतीच... पण कोण करणार असं?... कोणाचा जीव वर आलाय एवढा?... असलाच तर तो रमेशच असला पाहीजे... पण दारु पीऊन नसत्या खोड्या काढतो म्हणून रमेशला तर ८ महीन्यांपूर्वीच बदडून गावातून हकलून दिलं होतं... आयुष्यात परत कोणाची खोडी काढू शकणार नाही अशी त्याची हालत गावकऱ्यांनी केली होती... तेंव्हा पासून तो कोणाच्या नजरेस सुद्धा पडला नव्हता... हा प्रकार भुताचाच!!! पक्याच तो... नाहीतरी नेहमीच अख्या गावावर खार खाऊन असायचा तो...
बांधावर पक्याचं भूत आहे अशी बातमी दुसऱ्या दिवशी गावभर पसरली... बांधावरुन ये-जा नको म्हणून काही दिवस पकटीवरच्या झोपडीत राहूनच डोलीला जायचा निर्णय भाल्यानं घेतला...
बिडीवाल्या पक्याच्या भुतानं अख्या गावाला हैराण करुन सोडलं होतं... भीती पोटी लोकांनी संध्याकाळी डोलीला जायचं बंद केलं... पक्यानं त्रास देऊ नये म्हणून येणारं जाणारं बांधावरच्या वडाखाली बिडीची पाकीटं पक्यासाठी ठेऊ लागले... पण महीना उलटला तरी रोज कोणाला ना कोणाला असाच अनुभव येत होता...आता मात्र काहीतरी उपाय केलाच पाहीजे असं गावकऱ्यांनी ठरवलं...
तीतक्यात आजच रमेश बांधावर दिसला होता अशी बातमी आली... इतके दिवस रमेश कोणाला दिसलाच नाही आणि आता नेमका कसा बांधावर?... आणि गावात न येता बांधावर काय करतोय?... नाहीतरी रमेशवर संशय होताच... काय तो सोक्ष-मोक्ष लावायचाच म्हणून आज रात्री ५-६ जणं एकत्र बांधावर जाऊत असं तुक्यादानं ठरवलं... ठरल्या प्रमाणे रात्री तुक्यादा, भाल्या आणि अजून ४ जण बांधावर पोचले... कसलीच चाहूल नव्हती... वडाखाली कोणीतरी आडवं पडलेलं दिसलं... जवळ जाऊन बघतोय तर रमेशच होता... तुक्यादानं त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण काही हालचाल झाली नाही... प्रेतंच ते... हलणार कसं? प्रेताचे डोळे जरा जास्तच लाल रक्ताळलेले होते... रमेशच्या शरीरावर कुठंच काही इजा नव्हती... मग हा मेला कसा?... दुसरं कोण असणार?... पक्याचंच् भूत... इतके दिवस पक्यानं कोणाला मारलं नव्हतं, पण आता तर रमेशचा मुडदाच पाडला... गावकरी जास्तच घाबरले... दिवसा सुद्धा बांधावरुन जायला लोकं घाबरु लागले... कोणा मांत्रीका शिवाय आता पर्याय नव्हता... मग तुक्यादानं शेजारच्या गावाहून एक मांत्रीक बोलावला... पक्या जीवंत होता तेव्हा त्याच्या वापरातली एखादी वस्तू लागणार आणि येत्या आमोशेला एक बोकड द्यावा लागेल असं मांत्रीकानं सांगीतलं... आमोश्या दोन दिवसावरच होती... तोपर्यंत पक्याच्या खोलीतून पक्याचा शर्ट तुक्यादानं मिळवला... मग आमोशेच्या रात्री मांत्रीक आणि गावकरी बांधावरच्या वडाखाली पोचले... सगळं मांडून मंत्र पुट्पुटायला सुरुवात झाली... मांत्रीकानं आगीत कवटी ठेवली... आगीमुळं कवटी लालबुंद झाली होती... कवटीवर हळद-कुंकू टाकून मांत्रीक मंत्र पुटपुटत होता... आमोशेच्या काळोखात आगीच्या प्रकाशात वड न्हाऊन निघाला होता... आजुबाजूच्या वातावरणात गुढता जाणवत होती... मधूनच एखादा गावकरी दचकून इकडं-तिकडं बघत होता... बरोबर १२ वाजता मांत्रीकानं पक्याचा शर्ट आगीत टाकला आणि बोकडाची आहूती दिली... पुढचा सगळा प्रकार संपवून गावकरी जवळ जवळ पहाटेच परत आले...त्यानंतर पुढचे २-३ रात्र पक्या परत कोणाला दिसला नाही... मांत्रीकानं आपलं काम केलं होतं...
मागच्या महिन्यात भाल्याच्या डोलीला भरपूर म्हावरा लागला...पापलेट, सुरमाई, रावस, हलवा, बांगडा...
लागणारच ना!... बरेचजण डोलीला जात नव्हते आणि भाल्या पकटीवरच असल्यामुळं रोजच जात होता... पक्याचं प्रकरण नीस्तरल्यामुळं बऱ्याच दिवसांनी भाल्या घरी आला होता... नंतर एक आठवडा तो पकटीवर गेलाच नाही... एका दुपारी जेवण उरकून पडवीत बिडी फुकत बसला होता...
"काय रं... बिडीकरता पैशे मागत नाहीस आजकाल..." आई
आई कडं बघत भाल्या हलकेच हसला... जरा वेगळंच हसू होतं ते... खरंतर... बरेच दिवस पुरतील इतक्या बिड्या मागच्या एक-दीड महीन्यात भाल्याकडं जमल्या होत्या... आणि ज्या दिवशी रमेशचं प्रेत सापडलं त्याच दिवशी शेजारच्या गावात दारुच्या विषबाधेमुळं आणखी ५ जण मेले होते...
KHUP SAHI AAHE!
ReplyDeletecool story. keep it up! khup divasat interesting kahi vachala navta. maja aali.
sahi
ReplyDeletegoshti ashakyaa lihitos tu.....!!! ek number... lihit raha....
ReplyDeleteAWESUM....
ReplyDelete