Friday 4 September 2009

मी पण पळणार...

"डॉक्टर, मला पेनकिलर नका देऊ... मला वेदना सहन करायच्या आहेत..." असं माझ्या मित्राचे बाबा डॉक्टरला सांगत होते.
७१ वर्षांचे आहेत ते. ६ महिन्यापुर्वी पळत असताना पायतपाय अडकून पडले. उठायचा प्रयत्न केला पण डावा पाय टेकवताच येईना. मग कसेबसे स्कूटर चालवत घरी पोचले. दोन दिवस वेदना अजीबात कमी झाल्या नाहीत. डॉक्टर कडे गेल्यावर कळालं की डाव्या पायाचं achilles tendon तुटलयं. डॉक्टरच्या सल्या नुसार ऑपरेशन केलं. त्यांनी ऑपरेशन नंतर पेनकिलर घेतल्या नाहीत.
म्हणाले... "पूर्वी युध्दात मावळे जखमी होत असणार... मग उपचाराच्या वेळी ते कुठे पेनकिलर घ्यायचे? बघू तरी किती सहन करु शकतो ते...".
रात्रभर खूप वेदना झाल्या. रामाचं नामस्मरण करत रात्र काढली.
ह्या ऑपरेशन नंतर पुर्ववत चालायला ६ महिने लागतात. "उगीचच पळायला गेलो आणि पडलो" असं एकदा सुद्धा ह्या ६ महिन्यात काका म्हणाले नाहीत. मागच्याच आठवड्यात ६ महिने पुर्ण झाले आणि काका पळायला पण गेले. डावा पाय जरा दुखला, पण प्रचंड आंनदी होते ते.
म्हणाले..."खूप वाट बघत होतो आजच्या दिवसाची... मस्त वाटलं पळून...".
आता परत नियमीत पळायला जातात. कधीकधीतर अनवाणीच पळतात. अधून-मधून अजिंक्यताऱ्यावर, सज्जनगडावर जातात. कोणतीही गोष्ट करताना एकदम प्रसन्न आणि उत्साही असतात. आपण एकादी गोष्ट आता करु नये किंवा करु शकत नाही असं त्यांना अजीबात वाटत नाही. अश्यावेळी... "नको रे... आता मला जमत नाही... झेपत नाही" असं म्हणणाऱ्या अनेक फक्त वयानं तरुण असणाऱ्या लोकांची आठवण होते.
----------------------------------------------------------------
अल्ट्रा रनींग (ultra running) हा एक भारी प्रकार आहे. मँरेथॉनच्या दुप्पट-तिप्पट अंतर ह्या रेस मधे पळायचं असतं. म्हणजे १०० कि.मी. किंवा त्याहून जास्तच. दोंगरदऱ्या, वाळवंट, स्नो अश्या अवघड जागी एकटं-दुकटं पळायचं असतं. प्रचंड वेदना आणि प्रचंड आनंद अनुभवायचा असतो.
Diane Van Deren ही एक अल्ट्रा रनर आहे. हिला नकाशे वाचता येत नाहीत... हिच्या organizational skills आणि memory फारच weak आहेत... रेस मधे पळताना अनेकदा चुकीची वळणं ती घेते... बऱ्याचदा तीला परतीचा रस्ता देखील आठवत नाही... तरी सुद्धा ती पळते... आणि नुसतीच पळत नाही तर मागच्याच वर्षी Yukon Arctic Ultra 300 ही रेस ती जींकली. खूपच खडतर रेस असते ही. प्रचंड थंडी, स्नो आणि एकटेपणा सहन करुन ती जींकली. ह्याच रेस च 400 mile version पुर्ण करणारी ती पहीली महिला आहे. आता ती ४९ वर्षांची आहे.
Diane Kobs हे तिचं लग्नाआधीचं नाव. ती एक प्रोफेशनल टेनीस प्लेयर होती आणि athletics ची तिला खूप आवड होती. लग्ना नंतर तिसऱ्या मुलासाठी गरोदर असताना (म्हणजे ती ३० वर्षांची असताना) तीला पहिला epileptic seizure आला आणि नंतर नेहमीच येऊ लागले. epileptic seizure च्या वेळी मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटतो आणि भयंकर अनियंत्रीत हालचाली शरीर करु लागतं. मेंदूच्या एका ठरावीक भागातूनच हे epileptic seizures येत असल्या कारणानं तीचं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन (lobectomy) मधे तीच्या मेंदूचा एक लहानसा भाग कायमचा काढून टाकला. आता तीला seizures येत नाहीत, पण लोकांचे चेहरे नीटसे लक्षात राहत नाहीत... गाडी नक्की कुठे पार्क केलीयं हे पण आठवत नाही. आपल्या कुटूंबातल्या महत्वाच्या घटना तीच्या लक्षात राहाव्यात म्हणून तीच्या नवऱ्यानं त्या घटनांचे फोटो घरभर लावून ठेवलेत.
नवरा आणि मुलं तीला सतत प्रोत्साहन देतात आणि ती तासोंतास पळत असते... वेळेचं आणि अंतराच भान तीला नसतं... पळत असताना पायाच्या आवाजावरुन 'आपण किती वेगात पळतोय' ह्याची जाणीव तीला होते... बऱ्याचदा मध्यरात्री हेडलँप आणि रनींग शुज घालून सरावासाठी ती घरा बाहेर पडते...
(Diane Van Deren चा हा फोटो मी इंटरनेट वरुन मिळवला आहे...)


खरंच काय जीद्द असेल तीची!... इतक्या लिमीटेशन्स असून सुद्धा अजीबात तक्रार न करता ती पळते...
इंटरनेटवर तीच्या बद्दल वरची माहीती वाचली होती आणि त्यातच लिहीलं होतं...
"she just runs, uninhibited by the drudgery of time and distance, undeterred by an inability to remember exactly where she is going or how to get back".
------------------------------------------------------------------
पायात बुटं घातली की नेहमीच मला पळावं वाटतं... आठवड्यातून ३-४ वेळा जातो मी पळायला... त्यामुळे तळजई टेकडीवर भटकायला मिळतं... टेकडीवर पळताना मोर, ससे आणि बरेच पक्षी नजरेस पडतात... ३५-४० मीनीटं न थांबता पळतो...
२.५ महिन्यापुर्वी वज्रगडावर भटकताना माझा पाय मुरगळला... तसाच गडावर भटकलो आणि वज्रगड उतरलो (दुसरा पर्याय नव्हता)... घरी आलो तेव्हा पाय भलताच सुजला होता... आईनं आयोडेक्स लावलं... दुसऱ्या दिवशी सुज बरीच उतरली होती आणि एका आठवड्यात सुज एकदम नाहीशी झाली... मग पळायला गेलो तर पाय परत दुखायला लागला... "डॉक्टरला एकदा दाखवून ये" असं सारखं आई सांगत होती... पण मी डॉक्टर कडे गेलो नाही (डॉक्टर कडे जायला माझी काहीच हरकत नव्हती, पण मग एक्स-रे काढा... आणि आजकाल तर रीस्क नको म्हणून डॉक्टर उगीचच MRI वगेरे काढायला लावतात... नकोतेच सुरु होतं मग...आणि "साधा पाय मुरगळला तर डॉक्टर कडे काय जायचं?" असं सुद्धा वाटत होतं)... काय ते घरी उपचार केले आणि हळु-हळू पाय दुखायचा थांबला... २.५ महिन्या नंतर कालच पहिल्यांदा अर्धा तास न थांबता पळालो... सुरुवातीची १० मीनीटं मस्त पळत होतो... मग मात्र पाय जरा दुखू लागला... तरी थांबलो नाही... आज अर्धा तास पळायचच असं मी ठरवलं होतं... पायाकडं लक्ष न देता पळत राहीलो... पळताना एका वेगळ्याच जगात गेल्याची जाणीव होते... कटकट, राग, लिमीटेशन्स असलं काहीच जाणवत नाही... मस्त समाधी लागल्या सारखं वाटतं... मग अर्धा तास झाला तरी थांबावं वाटत नव्हतं... पण पहिल्याच दिवशी अती नको म्हणून थांबलो... थांबल्यावर पाय अजीबात दुखत नव्हता... हातपाय एकदम मोकळे झाले होते... ह्रुदयाचे ठोके मस्त सुटसुटीत आणि rhythm मधे पडत होते... एकूणच जीवंत असल्या सारखं वाटलं...
स्वताच्या जीवावर हवं तीतकं हवं तीथं पळायची मजा वेगळीच... एखाद्या पाखरा सारखं स्वच्छंद उडता येतं...
"I always loved running... it was something you could do by yourself, and under your own power . You could go in any direction, fast or slow as you wanted, fighting the wind if you felt like it, seeking out new sights just on the strength of your feet and the courage of your lungs " - Jesse Owens .
आता परत नियमीत पळायचयं... खरंतर ह्या वर्षी 'पुणे मँरेथॉन' मधे हाफ-मँरेथॉन पळायची जाम इच्छा आहे... काही सीद्ध करायला नाही तर स्वतासाठीच... एक दिवस तरी प्रेक्षक न होता खरंखुरं athlete व्हायचयं... २१ कि.मी. पळताना मन, डोकं आणि शरीर ह्यांच्यातली चुरस अनुभवायची आहे... जमल्यास फिनीश-लाईनवर दोन्ही हात उंचावून आकाशाकडे बघायचयं... एक नविन अनुभव जगायचाय... Bear Grylls म्हणतो तसं जगायचा पुरेपुर प्रयत्न करायचा आहे...
"Remember that life should not be a journey to the grave with the intention of arriving safely in an attractive and well preserved body, but rather to skid in sideways, covered in scars, body thoroughly used up, totally worn out and screaming `yahoo! what a ride!'".

No comments:

Post a Comment