Wednesday 14 October 2009

कामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही.
मग कसं जायचं?
विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची... मग भातराशी आणि शेवटी मळवली... असा बेत पक्का केला.



रवीवारी सकाळी ७.३० ला मी आणि माझा भाऊ प्रसाद कामशेतला पोहचलो. जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडला आणि समोरच्या डोंगररांगेवर चढायला सुरुवात केली. सरळ रेषेत चढून डोंगररांगेचा माथा गाठायचा आणि मग पायवाट शोधायची, असा विचार होता.

धुकं हळुहळू विरळ होत होतं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाची उब जाणवत होती. सारं रान दवाने ओलचींब भिजलं होतं. एखाद्या झुडपातून वेडाराघू (green bee-eater) हवेत झेप घ्यायचा, चोचीत काहीतरी पकडुन पुन्हा झाडीत नाहीसा व्हायचा. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांमधला मध खाण्यात दंग होती.

(White Lady)


(रान भेंडी)


(कारवी)


(गणेशवेल)






झुडपातून वाट काढत थोड्याच वेळात डोंगररांगेच्या माथ्यावर पोहचलो.  सकाळच्या गार हवेत जरावेळ विसावलो. समोर दूरवर भातराशीचा डोंगर दिसत होता.



पुसटश्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली. ही वाट रोजच्या वापरातली नव्हती, आणि पावसात बरच गवत माजल्यामुळे थोड्याच वेळात पायवाट नाहीशी झाली. बराच वेळ झाडा-झुडपात भटकल्यावर गुरांच्या वाटेला लागलो.



थोडं पुढे गेल्यावर लहानश्या पठारावर पोहचलो. पठारावर गुरांचा कळप चरत होता, गुरांना चाहूल लागू न देता झाडीतून आम्ही पुढे सरकलो.



पुणे-मुंबई मेगाहायवे वरुन मुंबई कडे जाताना कामशेत बोगद्याच्या उजव्या बाजूला डोंगरावर एक टॉवर दिसतो, आम्ही चालत असलेल्या डोंगररांगेवरच हा टॉवर आहे.  टॉवर असलेल्या टेपाडाला डावी कडून वळसा घालून बोगद्यावरच्या खिंडीत असलेल्या वाघोबाच्या देवळात पोहचलो. दर्शन घेऊन पुन्हा चालायला लागलो. गवत तुडवत एका टेपाडावर आलो. इथून समोरच्या डोंगराच्या पोटात कोरलेली बेडसे लेणी दिसली. जरा हुश्श् झालं, कामशेतहून ३ तास चालल्यानंतर पहिल्यांदाच लेणी दिसली.

(फोटोच्या मध्यभागी लेणी दिसत आहेत)


लेण्याचा डोंगर आणि आमच्या मधे लहानशी दरी होती. लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी अजीबात वाट नव्हती आणि उतार पण खूप जास्त होता. जरा मागे जाऊन योग्य वाट शोधावी असा विचार थोडावेळ डोक्यात आला, पण अशावेळी मी डोक्याचं अजीबात ऐकत नाही आणि मनाला लगामपण लावत नाही. मग काय?... उतारावरच्या रानात आम्ही दोघांनी उडी घेतली. झपाटल्या सारखे रान तुडवत उतरायला लागलो. पाठपीशवी, शर्ट सारखे काट्यात अडकत होते... अंग काट्यांनी ओरबाडुन निघालं... पण न थाबंता थेट लेण्याच्या जवळ पोहचलो आणि ओढ्यात आडवे झालो. ओढ्याच्या गार पाण्यानं सारा थकवा दूर केला. मग थोडं चढल्यावर लेण्यात प्रवेश केला.

इतके श्रम केल्यावर असं सुंदर शील्प बघण्यातली मजा वेगळीच; टमटमने इथे आलो असतो तर हे सुख नसतं मिळालं.
२००० वर्षांपूर्वी काही लोकांनी निर्माण केलेली कलाकृती आपण आज प्रत्यक्ष बघतोय, ह्यावर थोडावेळ विश्वासच बसत नव्हता. एखाद्या निर्जीव कातळातून असं सुंदर, चिरंतन शील्प कोरणाऱ्या लोंकाच्या प्रतीभे समोर नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरत नाही.  हे सौंदर्य शब्दामधे मी वर्णनच करु शकत नाही.

























भारावून बराच वेळ लेणी बघीतली. तोपर्यंत लेण्यांची देखरेख करणारे सदुकाका आले. त्यांच्या सोबत घरुन आणलेलं खाऊन घेतलं.
मी विचारलं,"लेणी बघण्यासाठी थोडं तीकीट का ठेवत नाही? भाजे आणि कार्ल्याला तर आहे"
"कोणी येतच नाही इथे, मग तीकीट ठेऊन काय फायदा?"
खरंतर ही लेणी फार सुंदर आहेत, पण भाजे आणि कार्ल्याच्या मानानं जरा आडवाटेला असल्यामुळे फारसं कुणी येत नाही.
अतीशय थोडकं मानधन सदुकाकाला दिलं आणि लेण्याच्या वर चढून भातराशीच्या दिशेने चालायला लागलो.  एका दगडावर प्रसादला साप दिसला. फारच निवांत होता, जवळ गेलोतरी त्याने पळायची घाई नाही केली.

(Gunther's racer)


वाट सापडत नव्हती, पण साधारण कल्पना असल्यामुळे  गवतातुन  वाट काढत चालत होतो.  थोड्याच वेळात डोंगराच्या कड्यावर पोचलो आणि तळ न्याहाळू लागलो. पवनेच्या दोन काठावर तिकोना आणि तुंग, पवनेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसले होते.



आता उजव्या हाताला वळलो आणि पुन्हा जंगलात घुसलो.  मला ओल्या रानाचा वास खूप आवडतो. कोवळ्या गवताचा, फुलांचा, झाडांवरच्या फळांचा, कुजणाऱ्या पानांचा मिळून वेगळाच सुगंध तयार होतो. हा सुगंध आला की फार प्रसन्न वाटतं मला.

जंगलातून बाहेर पडलो तेव्हा उजव्या हाताला भातराशीचा डोंगर होता आणि समोर लोहगड आणि विसापूर.



अजूनपण वाट सापडत नव्हती. सकाळ पासून चालून-चालून प्रसाद जरा कंटाळला होता.
म्हणाला,"तुला वाट माहिती नव्हती तर कश्याला आणलसं इथे?"
मी म्हणालो,"अरे, वाट तर मला कधीच माहिती नसते...  तु कंटाळू  नकोस... मस्त चालत रहा... "

थोडावेळ धडपडल्यावर जरा मळलेल्या वाटेला लागलो. सुमारे अर्धा तास चालल्यावर एक धनगरपाडा लागला. धनगरपाड्याचं नाव मालेगाव.  गावातली लहान मुलं टायर सोबत खेळत होती. मला लहानपणची आठवण झाली... तेव्हा सायकलच्या दुकानतून वापरात नसलेला टायर घेऊन गावभर आम्ही हुंदडायचो... घरी आल्यावर टायर बघीतल्यावर आई ओरडते म्हणून घरात घुसायच्या आधी पडवीच्या छतावर टायर लपवून ठेवायचो... मजा होती तेव्हा...

धनगरपाड्यातून विसापूरच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात जायला मळलेली वाट आहे.  दिवसभर भरपूर पायपीट झाली होती, म्हणून भातराशीचा डोंगर न चढता पाटणला उतरायचं ठरवून टाकलं. अर्ध्या तासात पाटण आणि मग अजून पाव तास चालल्यावर मळवलीच्या रेल्वे स्टेशनला पोहचलो. लोकल मधे बसलो आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. लोकलच्या खिडकीतून भातरशीचा डोंगर,  दिवसभर भटकत होतो ती डोंगररांग बघीतल्यावर फार समाधान वाटलं.

1 comment:

  1. छान माहिती व फोटो.

    www.ferfatka.blogspot.in

    ReplyDelete