Tuesday, 8 September 2009

जीवधन आणि नाणेघाट...

आम्हा चौघांचा (मी, यशदीप, शिऱ्या आणि सम्या) जीवधनला जायचा बेत पक्का झाला. एका शनीवारी पुण्याहून जून्नरला पोचलो तेव्हा सकाळचे ९.३० वाजले होते. घाटघरला जाणारी बस लागली होती पण सुटायला अजून जरा वेळ होता. मग बसस्टँडच्या जवळच मिसळपाव आणि चहा उरकून बस मधे बसलो. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात चावंड किल्ल्याला फेरी घालून पुढे निघाली. आता दोन्ही बाजूला नुसते उघडे-बोडके डोंगर दिसत होते. डोंगर म्हणजे नुसता काळा कातळ आणि त्याच्या तळात थोडी झाडी. जरा वेगळ्याच जगात घुसल्या सारखं वाटू लागलं. साधारण १ तासात घाटघरला पोचलो. दुपारचं उन्ह शेकत जीवधन एखाद्या मगरी सारखा पहारा देत घाटघरच्या मागेच बसला होता.

वाट नीटशी माहीती नव्हती पण गडावर कुठून चढायचं हे माहीती होतं. त्या दिशेनं चालायला सुरुवात केली. थोडावेळ चालल्यावर पायवाट एकदमच सुकलेल्या ओढ्यात संपली. आता इथून पुढे कसं? असा प्रश्न पडला. तीथून मान वर करुन गडाकडं पाहील्यावर, गडाच्या अगदी माथ्या जवळ कातळ पोखरल्या सारखा दिसत होता. तीच वाट असणार असं ठरवून टाकलं. मग सुकलेल्या ओढ्यातूनच चढायला सुरुवात केली. मे चा महीना होता आणि दुपारचे १२ वाजले होते. उन्हामुळे दगडपण तापला होता आणि जीवधन म्हणजे नुसता अखंड दगड; सावली देणारं एकपण झाड नव्हतं. सम्याला trekking ची जास्त सवय नव्हती. भर दुपारच्या उन्हात चढताना सम्याला त्रास होऊ लागला. त्याला आता मळमळायला लागलं होतं. अजून जरा वर गेल्यावर त्यानं उलटी केली. मग पाणी प्यायला आणि तोंडावर रुमाल टाकून भर उन्हातच जरावेळ आडवा झाला. उठल्यावर सम्याच्यात तरतरी आली होती. त्याला जरा धीर दिला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात कातळात खणलेल्या पायऱ्या लागल्या.

पायऱ्या चढून वर जाऊ लागलो. माथ्याच्या जवळच्या पायऱ्या उध्वस्त झाल्या होत्या (इंग्रजांनी १८१८ मधे बरेच किल्ले उध्वस्त करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जीवधनावर पण तोफगोळे सोडले होते; त्याचे हे परिणाम). हा टप्पा, दगडात खणलेल्या खोबण्यांच्या मदतीने चढणं फारसं अवघड नव्हतं, पण जर चूक झाली आणि घसरलो तर थेट खालीच पोचणार ह्यात काहीच शंका नव्हती.

(वाट खूप अवघड आहे असं फोटोतून वाटतयं... पण चढायला वाट बऱ्यापैकी सोपी आहे...)मी हा टप्पा पार केला आणि गडाच्या माथ्यावर पोचलो. माझ्या मागोमाग शिऱ्या पण पोचला. तीथं पाठपीशवी टाकली आणि टप्पा उतरुन मी पुन्हा खाली आलो. यशदीप जरा घाबरला होता. त्याला जरा धीर देत म्हणालो की पीशवी मी घेऊन येतो, तु न घाबरता सावकाश चढ. मग थोडावेळ लावला पण यशदीप सुद्धा सुखरुप वर पोचला. नंतर सम्याने तर फारच आरामात हा टप्पा पार केला. मग पीशवी घेऊन मी पण वर पोचलो. जरा वेळ आराम केला आणि किल्ला भटकायला सुरुवात केली. वर एक धान्याचं कोठार आहे. म्हणे त्यात कधीतरी आग लागली होती तेव्हा सगळं धान्य जळून राख झालं आणि ती राख अजून त्या कोठारात आहे. कोठार बघून झाल्यावर मागच्या टेकाडावर चढलो. ही जीवधन वरची सर्वात उंचीची जागा. डोळ्यात मावणार नाही एवढा परीसर दिसतो इथून... तळात कोकण... डावीकडे ढाकोबा आणि दुर्ग किल्ला... उजवीकडे नानाचा अंगठा, भैरवगड, हरीशचंद्रगड... मागे चावंड, हडसर आणि निमगीरी.

(नानाचा अंगठा... नाणेघाट अंगठ्याला लागूनच आहे...)

कोकणातून येणाऱ्या वाऱ्याला थेट छातीवर झेलत जीवधन कित्येक युगं नाणेघाटावर पहारा देत उभा आहे. ह्या टेकाडावर उभं राहायचं आणि स्वच्छ, मोकळी हवा छातीत भरुन घ्यायची आणि आजुबाजूचा आसमंत न्याहाळायचा... मग सह्याद्री म्हणजे काय ह्याची जाणीव होते; शिवाजी आणि मावळ्यांच्या अंगात स्वातंत्र्यासाठी बादशाही विरुद्ध लढायचं साहस कुठून यायचं ह्याची जाणीव होते; महाराष्ट्राला दगडांच्या देशा कणखर देशा... असं का म्हणतात ह्याची जाणीव होते; अंगा-खांद्यात प्रचंड बळ आल्याची जाणीव होते. शाळेतल्या मुलांना जर गड-किल्ल्यांवर भटकून इतिहास शिकवला तर अनेक मावळे उभे राहतील...

मग थोडंफार खाऊन घेतलं आणि उतरायचा विचार करु लागलो. आलो तसं न उतरता दुसऱ्या वाटेनं उतरायचं ठरलं. ह्या वाटेनं उतरलो तर नाणेघाटाच्या गुहेत लवकर पोचणार होतो. उतरताना सत्तत नानाचा अंगठा डोळ्या समोर होता.

(परतीची वाट...)

ह्या वाटेवरच्या पायऱ्या सुद्धा उध्वस्त झाल्या आहेत, पण आरामात उतरता येत होतं. थोडं उतरल्यावर वाट कड्या वरुन खाली जंगलात उडी घेत होती. मग डावीकडे वळून आम्ही जीवधनचा कातळ डाव्याहाताला ठेवत आडवं जायला लागलो. थोड्याच वेळात वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याशी पोचलो. ह्याला खडाफारशी असं सुद्धा म्हणतात. ह्या सुळक्यावर चढायचं म्हणजे वानरांची चपळता अंगात असली पाहीजे. दोर लावून वानरलिंगीवर चढता येतं.

(वानरलिंगी सुळका...)

पण खाली उतरायची वाट सापडत नव्हती. मुंबईहून येणारे इथूनच कुठूनतरी गडावर चढतात हे मीहीती होतं, पण काही केल्या वाट सापडत नव्हती. वानरलिंगी आणि जीवधनच्या मधे प्रचंड उतार असलेली फारच लहान घळ आहे. ही ती वाट नाही ह्याची पुर्ण खात्री आम्हा सर्वांना होती. आता... वाट काही सापडत नाही म्हंटल्यावर, मी ह्या घळीतूनच उतरायच ठरवलं. माझा प्लान मी इतरांना सांगीतला, तर ते म्हणाले... गप ये! उगीच मस्ती नको... फारच उतार आहे आणि पुढे ही वाट कशी आहे हे पण माहीती नाही... उगीच risk घेण्यात point नाही. पण मलातर उतरायचं होतं तीथूनच, मग मी इतरांना समजवलं की... तुम्ही तीघं परत जा आणि वर चढलेल्या वाटेनेच उतरा आणि मग नाणेघाटाच्या गुहेत पोहचा... मी तो पर्यंत इथून उतरुन गुहेत पोचतो... समजा मला नाहीच जमलं तर मी पण येतोच तुमच्या माघून. जरावेळ असं नको तसं नको करत ते तीघे माघारी वळले.

त्यांना माझ्या पेक्षा जास्त चालायचं होतं त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी जरावेळ निवांत बसून खालचा परीसर न्याहाळत होतो. जरा भीती होतीच आणि शिवाय ही वाट खाली जंगलात उतरते. जंगलातून नीट वाट सापडेल की नाही अशी शंका होती. मग जास्त विचार न करता मी उतरायला लागलो. खूपच उतार होता. मी घसरतच खाली सरकत होतो. बरंच उतरलो होतो, पण आता एकदम उभा तीन माणूस उंच टप्पा उतरायचा होता (हा टपा म्हणजे दोन कातळांच्या मधली भेग...chimney). फार अवघड नव्हतं पण कसं उतरायचं कळत नव्हतं आणि त्यात एकटा. उडी मारावी म्हटलं तर खालीपण उतार आणि दगडं होती. चला... आता माघारी वळूत असा विचार हळूच आला. माघारी जायचा मोह टाळण्या साठी मी पाठपीशवी खाली टाकली तर ती गडगडत बराच खाली जाऊन थांबली. आता माघारी जायचा सवालच नव्हता. जरा शांत झालो आणि कसं उतरता येईल ह्याचा विचार करु लागलो. दोन हात दोन बाजूच्या दगडावर चिकटवले आणि शरीर जरा खाली सरकवलं आणि पाय फाकवून दोन बाजूंच्या कातळावर ठेवले. नीट grip नसल्यामुळे जास्त वेळ दोन पायांवर उभं राहणं शक्य नव्हतं. आता हात सोडून शरीर जरा खाली सरकवलं आणि पाया जवळ परत हातांनी pressure holds घेतले. पाय सोडले आणि खाली सरकून परत पायांनी आधार घेतला. आता हात सोडले तर दोन्ही पाय पण नीसटले आणि दगडावर अंग घासत खाली आपटलो. जरा खरचटलं पण जास्त लागलं नाही. आता टप्पा पार झाला होता (मी ज्या पध्दतीनं उतरलो तीला wriggling म्हणतात असं घरी आल्यावर एका पुस्तकातून कळालं), मग पाठपीशवी उचलली आणि जंगलात घुसलो. एकदम दाट जंगलात एका सुकलेल्या ओढ्यातूनच चालायला लागलो. हा ओढा कधीतरी नक्कीच जंगलातून बाहेर पडणार ह्याची खात्री असल्यामुळे जंगलातला एकांत अनुभवत चालायला लागलो. थोड्याच वेळात जंगलातून बाहेर आलो तर उजव्या हाताला नानाचा अंगठा खुणावत होता. नसलेली वाट धरुन सुखरुप उतरल्याच्या आनंदात मग आरामात नाणेघाटाकडं चालू लागलो. अर्ध्या तासाच्या आतच गुहेत पोचलो. बराच वेळ वाट पाहीली तरी तीघं अजून पोचले नव्हते. मग मीच घाटघरच्या दिशेनं चालायला लागलो. १-१.५ कि.मी. चालल्यावर तीघं येताना दिसले. मग मी कसा उतरलो हे त्यांना सांगत पुन्हा गुहेत पोचलो.

पाठपीशवीतून जेवणाचं सामान काढलं. लाकडं गोळा केली आणि चुलीवर खिचडी शीजवायला लावली. यशदीपने पापड पण आणले होते, मग ते पण भाजून घेतले. खिचडी शीजे पर्यंत काळोख पडू लागला होता. मग रम्य सुर्यास्त बघत खिचडी आणि पापडाचा आस्वाद घेत जेवण उरकलं आणि गुहेत गाड झोपी गेलो.

पहाटे सुमारे ३ वाजता खूप गोंगाट सुरु झाला आणि जाग आली. मुंबईचा एक ग्रुप रात्री कोकणातून नाणेघाट चढून आला होता आणि त्यांचा धिंगाणा चालू होता. नंतर काय झोप लागली नाही. पहाटे सुमारे ६ ला उठलो आणि नानाच्या अंगठ्यावर जाऊन बसलो. तळातलं कोकण धुक्याचं पांघरुण घेऊन झोपी गेलं होतं. धुक्याच्या आणि ढगांच्या आड सुर्य वेगळाच भासत होता.

(हा सुर्य आहे बरं का...)

बराच वेळ निवांत बसून होतो. Trek ला जाताना असंच किंवा तसंच करायचं हे ठरलेलं नसतं. त्यावेळी जे वाटेल ते करायचं. मग जीवधनच्या जंगलात भटकायचा बेत ठरला. खाली उतरुन गुहेत पोचलो आणि सामान गुंडाळून जीवधनच्या दिशेने चालायला लागलो.

(नाणेघाटची गुहा आणि काही trekkers...)

वाटेत चुल पेटवून चहा आणि maggy बनवलं. मग कड्यावर बसून कोरा चहा आणि maggy चा नाष्टा सुरु केला. आकाशात ढगांचा पकडा-पकडी चा खेळ चालू होता. त्या ढगांच्या सावल्यापण कोकणात तोच खेळ खेळत होत्या. अश्या निवांत क्षणी हे सगळं बघायला, अनुभवायला छान वाटतं. उन्ह जरा वाढल्यावर आम्ही जीवधनच्या दिशेने निघालो. जीवधन आणि त्याचा खडाफारशी मस्तच दिसत होते.

(जीवधन आणि पहारा देणारा खडाफारशी...)

जंगलात बराच वेळ भटकलो आणि मग थोडावेळ सगळे आडवे झालो. उठलो तेव्हा दुपारचे २.५ वाजले होते. मग १ तासात घाटघरला पोचलो आणि जुन्नरच्या S.T. ची वाट बघत झाडाखाली बसलो. थोडा वेळात S.T. ने जुन्नर आणि मग पुण्यात पोचलो. दोन दिवस मे महीन्याच्या उन्हात दगडांच्या प्रदेशात भटकण्याचा अनुभव मस्तच होता.

थोडा इतिहास: नाणेघाट आणि आजुबाजूचे किल्ले सातवाहन राजाने बांधलेत. कल्याण आणि जुन्नर मधे व्यापार व्हावा म्हणून नाणेघाटाचा वापर व्हायचा. नाणेघाटची गुहा साधारण 2nd - 1st cent. B.C. मधली आहे. गुहेत ब्राम्ही लीपीतला लेख आणि काही चित्रं आहेत. लेखात सातवाहनच्या राजा-राणीं चा उल्लेख आहे.

नाणेघाट जुन्नरहून २७ कि.मी. आहे. जुन्नरहून घाटघर पर्यंत बस येते. मग घाटघरहून ३ कि.मी. वर नाणेघाट आहे.
मुंबईहून येताना वैशाखरेला उतरायचं आणि मग नाणेघाट चढून वर यायचं. गुहा अगदी घाटमाथ्यावर आहे.

5 comments:

 1. छान लिहिलास
  आत्ताच जीवधन च्या ट्रेक वरून परत आलो :)

  ReplyDelete
 2. सुंदर वर्णन
  anandgodse.blogspot.com

  ReplyDelete
 3. मस्त वर्णन. मजा आली वाचताना. विशेषतः ते एकट्याने उतरणे.

  ReplyDelete