Monday 2 August 2010

प्लस व्हॅलीमधे... धो-धो पावसात...

प्लस व्हॅलीमधे उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं की आता पावसात इथे यायचं... एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो... उन्हाळ्यातल्या प्लस व्हॅलीमधे आज एका महान कलाकाराने खूप सुंदर रंग भरले होते... धो-धो पाऊस होता... कड्यावरुन धबधबे सोडले होते... जागोजागी पाण्याचे ओढे खळाळत होते... दरीमधे धुकं अडकलं होतं... धरणीतून गवताचे कोवळे कोंब उगवले होते... जंगलातून सुभग पक्षी सुरात गात होते... सगळ्या सृष्टीत चैतन्य जाणवत होतं... तेरड्याच्या एखाद्याच फुलाला हे सगळं बघण्याची घाई झाली होती... कोवळ्या गवतातून मान वर करुन ते एकटचं हे सगळं अनुभवत होतं... आज ह्या सृष्टीचाच एक भाग होवून हे सगळं अनुभवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं...

साधारणश्या ओढ्यातूनच दरीत उतरावं लागतं... उतार तसा जरा जास्त आहे आणि जंगल एकदम दाट... मी आणि यशदीप असे आम्ही दोघेच होतो... साधारण एक तासात दरीत उतरलो... दरीतला नजारा बघून केवळ निशब्द झालो... जणू वेळ थांबलीच होती... ओढ्याकाठी बसून भान हरपून जे काही दिसतयं त्याचा आस्वाद घेतला...









कोसळत्या धबधब्याकडे टक लावून बघण्यात वेगळीच मजा असते... क्षणा-क्षणाला तो वेगळा भासतो... सगळं कसं क्षणभंगुर असल्या सारखं वाटतं... प्रत्येक क्षण वेगळा आणि त्यातली मजा वेगळी... आणि अश्या वेळी अश्या जागी असलं की प्रत्येक क्षण जगता देखील येतो...

टीपः भटकंतीचा खूप अनुभव नसेल तर शक्यतो पावसात प्लस व्हॅलीमधे उतरु नका...

Monday 5 July 2010

दाभिळ टोक ते अर्थर-सीट... एक थ्रीलींग अनुभव

चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत...

"मास्तर, ३ घिसर द्या..."
"पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..."
"कुठ पर्यंत जाते मग?"
"विहिर... त्यापुढं नाही जात..."

काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार...

"सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..."

तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले... बरच काही सुचत होतं आणि तितक्यात "ढवळ्याहून अर्थर-सीट करायचा का?" असं स्वानंद म्हणाला...




"ह्या पावसात जायचं तिथे?... दाट रान... अवघड वाट... पाऊस आणि धुक्यामुळे अजूनच अवघड होणार... ट्रेक पुर्ण होईल का?" असा विचार माझ्या डोक्यात आला...

"जाऊत रे... आता नाहीतर कधी करणार मग..." असं स्वानंद आणि यशदीप दोघं एकदमच म्हणाले... मग काय? नसरापुर फाट्याला बस सोडली आणि ट्रकनं वाई फाटा आणि मग बसनं महाबळेश्वरला पोहचलो... पोलादपुरची बस पकडली आणि आंबेनळी घाटात वाडा-कुंभरोशीच्या जरा पुढे दाभिळ-टोकाला उतरलो... पाऊस नव्हता, पण वातावरण ढगाळ होतं... समोर दूरवर मंगळगड दिसत होता...

(एकदम मागच्या रांगेत डावीकडून ३रा डाँगर म्हणजे मंगळगड (कांगोरी गड)...)


सावित्रीचं खोरं न्याहाळत सोंडेवरुन उतरायला लागलो... साधारण १.५ तासात सावित्री नदीच्या काठी पोहचलो... गार नितळ पाण्यात डूंबलो आणि समोरचा चढ चढून कंरजे गावात पोहचलो...

(सावित्री नदी...)


गावामागची खिंड पार करुन ढवळ्याला जाणार्‍या डांबरी रस्त्यावर उतरलो...

(करंजे खिंड चढताना दिसणारं सावित्रीचं खोरं...)


ह्या रस्त्याच्या कडेलाच एक मोठ्ठा धबधबा कोसळतो... सध्या त्यात पाणी कमीच होतं, पण जोराचा पाऊस झाला की हा धबधबा बघण्यासारखा असतो...



इथून साधारण अर्ध्या तासात ढवळं गाठलं...

(डोंगराच्या कुशीत वसलेलं ढवळं...)


शाळेच्या पडवीत मुक्काम मांडला... घरुन आणलेलं खाल्लं आणि लवकरच झोपी गेलो... रात्री २ वाजता जाग आली आणि असंच जरा चक्कर मारायला बाहेर पडलो तर एक अजबच नजारा अनुभवला... करोडो काजवे दरीमधे, झाडावरती चमकत होते... केवळ अप्रतिम... आणि काजवे सारखे जागा बदलत असल्यामुळे तो देखावा अजूनच मनोहर दिसत होता... थोडावेळ निसर्गाचा हा चमत्कार अनुभवला आणि परत झोपी गेलो...

पहाटे लवकर उठून सामान आवरलं आणि ७ वाजता चालायला सुरुवात केली... पुढची वाट दाट रानातून जाते आणि शेवट पर्यंत बहिरीची घुमटी किंवा आर्थर सीट दिसत नाही... एकदा जंगलात शिरलो की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला नक्की कुठे जायचय हे नीटसं कळत नाही... वाट चुकली तर आर्थर सीटला पोहचणं जवळ-जवळ अशक्यच आहे... उन्हाळ्यात एकदा मी ह्या वाटेने गेलो होतो, पण आता पावसात जरा अवघडच जाणार ह्याची खात्री होती... सोबत कोणी वाटाड्यापण घेतला नाही... ढवळ्याच्या जरा पुढं कोळ्यांचा वाडा लागतो, तो पार केला आणि जंगलात शिरलो... कोणत्याही मानव वस्तीतून जंगलात असंख्य वाटा शिरतात आणि सगळ्याच वाटा मळलेल्या असतात आणि नेमकं अश्या वेळीच चुकीची वाट पकडली जाते... आज आमचं पण असंच झालं... चुकीच्या वाटेवर वीसेक मिनीटं चालल्यावर कळालं की आपण चंद्रागडाच्या जरा जास्तच जवळ जातोय... माघारी वळलो आणि बरोबर वाट शोधून गाढव-माळला पोहचण्यात साधारण दिड तास लागला... गाढव-माळ म्हणजे कोळ्यांच्या वाड्यापासून जवळच असणारं लहानंस पठार...

(गाढव-माळ इथून दिसणारा देखावा...)


जंगल अनुभवायचं तर ते पावसात किंवा रात्री... दोन वर्षापुर्वी इथे आलो होतो तरी आता पावसात जंगल एकदमच अनोळखी वाटत होतं... पायाखाली ओल्या-पीकलेल्या पानांचा खच पडला होता... काही ठीकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाट एकदमच नाहीशी होत होती, पण जरा अंदाज घेत घेत शेवटी एका मोठ्या ओढ्यात पोहचलो... हा ओढा माझ्या चांगलाच लक्षात होता... ऑढ्याच्या उगमाकडे तोंड करुन उभे राहिलो की उजव्या हाताला चंद्रगड आणि  डाव्याहाताला अजून एक प्रचंड डोंगर आहे...

ओढा नितळ पाण्याने खळखळून वाहात होता... गार पाण्यात मस्त डुंबून घेतलं आणि ऑढ्याकाठी नाष्टा उरकला... तसं पाहिलं तर ओढ्यापर्यंत नीट वाट आहे, पण पावसामुळे जंगल माजलं होतं आणि वाट सारखी हरवत होती... आणि ओढ्याच्या पुढची वाट तर अजूनच अवघड होती आणि त्यात पाऊस आणि धुकं...

आता पुढची वाट ओढ्याच्या उजवीकडून की डावीकडून हे नीटसं आठवत नव्हतं... मग डावीकडूनच वाट शोधायला लागलो... वाळक्या कारवीच्या झुडपांमुळे काहीच अंदाज येत नव्हता आणि नविन कारवी पण कंबरभर माजली होती... वाट नसल्यामुळे सगळीकडे भटकून अंदाज घेत होतो... चढ खूपच तीव्र होता... एक ते दीड तास वाट शोधली, पण सापडलीच नाही... अजून ओढ्याच्या जवळच होतो... उजवीकडून वाट शोधावी म्हंटलतर तिथेपण दाट रान होतं आणि वाट दिसत नव्हती... मग ओढ्यातूनच वर जाऊयात असं ठरवलं आणि चढायला लागलो... `आता काय आपण वर पोहचत नाही' असं सारखं वाटत होतं... अश्या जागी योग्य वाट सापडली नाहीतर ठरलेल्या जागी पोहचणं जवळ-जवळ अशक्यच असतं... पण पुरेपुर प्रयत्न करायचेच असं ठरवून चढत होतो... "काहीही झालंतरी चालेल, पण आता माघार घ्यायची नाही" असं स्वानंद म्हणाला... वेळ पडलीच तर जंगलात रात्र काढूत, पण आता वर जायचंच...

(वाटेत ह्याच्याशी भेट झाली...)


प्रवाहाच्या विरुध्द ओढ्यातून चढताना मजा येत होती... न थाबंताच तासभर चढलो... ओढा संपला आणि उजवीकडे चढायला लागलो... अजून वाटेचा, अर्थर-सीटचा काहीच अंदाज येत नव्हता... अधून-मधून पाऊस पडतच होता... दमट वातावरणामुळे घाम पण तेवढाच निघत होता... वाटेच्या शोधात दमल्याची जाणिवच होत नव्हती... ओढा सोडून बराच वेळ चढत होतो... थोडावेळ थांबून घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा चढायला लागलो... का कोणास ठावूक पण आता आपण वाटेवर आहोत असं वाटू लागलं... भरभर थोडं अंतर पार केलं आणि एकदमच वाट सापडली असं वाटू लागलं... तेवढ्यात दाट धूकं आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला... आम्ही सरळ रेषेत चढत होतो... ही तर दरड कोसळल्यामुळे झालेली वाट होती... तरी चढून गेलो, पण पुढे तर कातळकडा होता... माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता... जपून उतरलो... पावसात दरड कोसळलेल्या वाटेवरुन उतरणं खूपच रीस्की असंत... माघार घेऊन परत वाट शोधू लागलो तर उजव्या हाताला एक पुसटशी वाट कारवीच्या रोपांमधून पळताना दिसली... मगाशी वर चढताना धूक्यामुळे आणि समोर असलेल्या वाटेमुळे ह्या वाटेकडे लक्षच नाही गेलं...

(अनमोल मोत्याची माळ...)


"काय रे! किती टक्के वाटतयं की ही बरोबर वाट आहे म्हणून?" स्वानंदने मला विचारलं... म्हणालो निदान ९० टक्केतरी वाटतयं... त्या पुसटश्या, नागमोडी आणि अतिशय अरुंद वाटेवर अर्धा तास चालल्यावर लहानसा, सोपा कातळ-टप्पा लागला आणि आम्ही योग्य वाटेवर चालतोय ह्याची १०० टक्के  खात्री पटली... "चला! आता आपण पोहचणार..." असं तिघांना पण एकदमच वाटलं... धुकं होतच, पण आता नाकासमोरच्या वाटेवर निमुटपणे चालत होतो...   अर्धातास चालल्यावर वाट डावीकडे वळली आणि फारच ट्रीकी झाली... डाव्या हाताला साधारण पाच फुटांवर खोलदरी होती आणि जागोजागी पावसामुळे माती वाहून गेली होती आणि वाट बर्‍यापैकी अवघड झाली होती... मागचे ५-७ तास स्वानंदची खूप बडबड चालू होती, पण ह्या जागी त्याचं तोंड एकदमच बंद झालं होतं... त्याला थोड्याफार मदतीची गरज पडत होती आणि तिच गत यशदीपची होती... हे थोडंस अंतर पार करायला बराच वेळ लागला, पण सगळे सुखरुपपणे बहिरीच्या घुमटीला पोहचलो...



तिथे पोहचलो तेव्हा यशदीपच्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स बघण्या सारखे होते... त्यात भिती, आनंद आणि समाधान सगळ एकदमच होतं... दुपारचे ३.३० वाजले होते... जास्त वेळ वाया घालवणं परवडण्या सारखं नव्हतं... पटपट भेळ केली, खाल्ली आणि अर्थर-सीटच्या दिशेने निघालो... बहिरीच्या घुमटीच्या इथून जोर ला देखील जाता येतं आणि ती वाट अर्थर-सीटच्या वाटेपेक्षा सोपी आहे... धुकं खूपच दाट होतं, त्यामुळे यशदीप म्हणाला "पश्या, जोरला जायचं का? अर्थर-सीटची वाट वेळेत नाही सापडली तर फार उशीर होईल..."
"खूप नाही ना दमलास... अजून वर्ट्स केस निदान ४ तास तरी चालशील ना?े" मी...
"हो..."
"मग चल... अर्थर-सीटलाच जाऊत..."

(धुकं, धुकं आणि दाट धुकं...)


परत दाट रानात पाऊल टाकलं... इथून पुढे अर्थर-सीटचा चढ प्रचंड तीव्र आहे... दमलो होतो, पण भर पावसात हा चढ चढताना मजा येत होती... तीव्र चढ संपला आणि मग जरा सपाटीवर चालायला लागलो... धुकं नसंल तर इथून अर्थर-सीट दिसतो... आता परत कारवी आणि बांबूच्या रानातून वाट काढत पुढे सरकत होतो... कधी-कधी वाट एकदम दरीच्या काठाला चिकटून जात होती... साधारण एक तासात शेवटच्या कातळ-टप्प्याजवळ पोहचलो... आधी स्वानंदला चढवला, मग यशदीपला आणि मग एक-एक करुन सगळ्या पाठपिशव्या चढवल्या... आता मात्र जाम दमलो होतो... अर्थर-सीट हाकेच्या अंतरावर होतं... मग शेवटचा थोडासा चढ संपवला आणि अर्थर-सीटवर पाय ठेवला... अहहहहा!!! काय ते समाधान? काय तो देखावा? आणि काय तो निवांतपणा?... मला ते शब्दात वर्णन करणं शक्यच नाही... पावसामुळे कोणीच पर्यटक नव्हते... दरीत दाट धुकं साठलं होतं आणि पाऊस चालूच होता... आज आम्ही अर्थर-सीटवर पोहचू असं मला खरंच वाटल नव्हतं, पण ते शक्य झालं... खूप खूप आनंद झाला होता... जग जिंकल्या सारखं वाटत होतं... अर्थर-सीट वरुन लीफ्ट मिळाली आणि वेळेत बस-स्थानकावर पोहचलो... ६.३० ची शेवटची पुण्याला जाणारी बस मिळाली... भिजलेल्या अवस्थेतच ३.३० तासांचा प्रवास करुन रात्री १०ला पुण्याला पोहचलो... बस मधे बरेच विचार डिक्यात घोळत होते... "असा वेडेपणा परत करणे नाही... देवाच्या कृपेने आज सुखरुप घरी परततोय..." हा विचार सारखा येत होता...

नोटः हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही...

Thursday 10 June 2010

उल्हास दरी...

कुणे धबधबा


कुणे धबधबा (पहिला टप्पा)


कुणे धबधबा (दुसरा टप्पा)










(चला डुंबायला... मी)


Monday 31 May 2010

मोहाची फुलं

एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...

(मोहाच झाड)


(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)


(मोहाची फुलं)




फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...

गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...

Friday 14 May 2010

सिंहगड ते राजगड... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

"अबे पश्या! साल्या, १ तास झाला बसची वाट बघतोय" स्वानंद
"येईल रे... मी नेहमी इथूनच (राजाराम पुल) सिंहगडला जाणारी बस पकडतो"
"सकाळच्या ६ पासून उभे आहोत इथे... आता ७.१५ झाले... ७ च्या आत सिंहगड चढायला सुरुवात करायचा बेत होता आपला... आत कसले आपण तोरण्यावर पोचतोय एका दिवसात... शक्यच नाही..."
"पोचणार रे... समजा ८ ला सिंहगड चढायला सुरुवात केली, तर ९ ला वरती... मग साधारण संध्याकाळी ५ ला राजगडावर आणि मग  रात्री १० पर्यंत तोरण्यावर... काळोख पडला तरी चालत राहायचं... ही बघ! बस पण आली..."

सिंहगड चढायचा, मग डोंगर रांगेवरुन विंजरहून राजगड आणि मग डोंगर रांगेवरुन तोरणा... हे सगळं एका दिवसात करायचं... असा आम्हा तिघांचा (मी, प्रसाद आणि स्वानंद) बेत होता...

सकाळी ८ वाजता सिंहगडाच्या पायथ्याला पोहचलो... जोरात भुक लागली होती... थोडा पोटोबा करुन चढायला सुरुवात करु म्हंटल तर स्वानंद म्हणे "काय मस्त वातावरण झालयं... आता खाण्यात वेळ नको घालवायला... वर खाऊत काहीतरी..."

मग उपाशी पोटीच सिंहगड चढायला सुरुवात केली... ९ वाजता देव टाक्याजवळ पोहचलो... न खाताच कल्याण दरवाज्यातुन बाहेर पडलो... वाटेत कल्याण गावतून दही-ताक विकायला गडावर येणार्‍या मावशी भेटल्या... दोन-दोन वाटी दही खाल्लं आणि डावीकडे कल्याणला उतरणारी वाट सोडून उजवी कडची वाट धरली... ढगाळ वातावरण असल्यामुळे तळातल्या गावांवर ढगांची सावली पडली होती... वारा आला की ढग हलायचे आणि उन्ह पडायचं... हा उन्ह-सावलीचा खेळ बघत आम्ही डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालत होतो... दूरवर राजगड-तोरणा दिसत होते...



वणव्यामुळे डोंगर उघडे-बोडके झाले होते आणि पायवाट अगदी स्पष्ट जाणवत होती... उन्ह जास्त नव्हतं... पटपट चालत बरचं अंतर कापलं... गुरांच्या वाटांच जाळंच होतं... सरळ डोंगररांगेच्या माथ्यावरुन जायच्या ऐवजी एका जागी डावीकडे वळलो... काय भन्नाट वाट होती!... उजवीकडे डोंगर आणि डावीकडे प्रचंड उतार... खरंतर वाट नव्हतीच... एक वीतभर जागा... भयंकर उतार आणि घसारा... तारेवरची कसरत करत पुढे सरकत होतो... मग ही वाट सोडली आणि उजव्या हाताला सरळ रेषेत वर चढून डोंगररांगेचा माथा गाठला... मागे वळून पाहिलं तर माथ्यावरुन फारच सोपी वाट दिसली... घोटभर पाण्याने घसा ओला केला आणि पुन्हा चालायला लागलो... उन्हामुळे डोंगर कोरडे पडले होते आणि त्यात वणवा, पण अश्या अवस्थेत सुध्दा सुंदर, नाजुक फुल आभाळाकडे बघून हसत होतं... सृष्टीतल्या चैतन्याची जाणीव करुन देत होतं...




आता शेवटचं टेपाड डावीकडे ठेवून घसारा असलेल्या वाटेने पलीकडे पोहचलो... तळात विंजर आणि समोर राजगड-तोरण्याची जोडी नजरेस पडली...



वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेळ लागत होता, म्हणून जास्त वेळ वाया न घालवता विंजरला उतरायला लागलो... साधारण दुपारी १२.३० ला खाली पोहचलो... आम्ही शेतावरच्या वाडीवर उतरलो होतो... विंजर गाव अजून अर्धा-पाऊण तासाच्या चालीवर होतं... वाटेत एक धनगरवाडी लागली... एका आजीनं आवाज दिला आणि जवळ बोलवून घेतलं... पाणी प्यायला दिलं...
म्हणाली "का रं फिरता येवढ्या उन्हाचं?... उन्ह लागून आजारी पडला म्हणजे?... "
आजीच्या ह्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं... आजीशी थोडावेळ गप्पा मारल्या आणि पुन्हा चालू लागलो... भर दुपारी माणसंच काय तर सारे पक्षी/प्राणी सुध्दा सावलीत आराम करतात... आणि आम्ही मस्त उन्हात शेकत चालत होतो... छान वाटत होतं... दुपारी १.३० वाजता विंजर गावात पोहचलो... नसरापुर-वेल्हे रस्ता पार करुन शेतातुनच साखरच्या दिशेने निघलो... साखरच्या आधी कानंदी नदी लागली... तोरण्याच्या मागे बांधलेल्या धरणामुळे नदीला भरपुर पाणी असतं... भर उन्हात, पाणी भरुन वाहणारी नदी दिसली तर काय करणार दुसर?... मस्तपैकी पोहलो...

(स्वानंद आणि मी)


पुन्हा चालायला सुरुवात केली... साखर, चिरमोडी आणि मग गुंजवणे... दुपारी ३.३० ला गुंजवण्यात पोहचलो... सकाळ पासून दोन वाटी दही आणि एक सफरचंद येवढच खाल्लं होतं... मग गुंजवण्यात पोहे खाल्ले आणि चोरवाटच्या दिशेने निघालो... चढत असताना आभाळ भरुन आलं... जोरात गडगडु लागलं आणि संध्याकाळच्या चंदेरी-सोनेरी उन्हात पाऊस पडला... गडावर जाणारी भिजलेली वाट चंदेरी प्रकाशात मस्त चमकत होती...



दमलेल्या शरीरात ओल्या मातीच्या सुवासाने आणि गार वार्‍याने नवा जोश भरला... थोड्याच वेळात चोर-दरवाज्यातुन गडावर प्रवेश केला तेव्हा ५.३० वाजले होते... गडावर कोणीच नव्हतं... फार निवांत एकांत होता... अजून तोरणा गाठायचा होता... स्वानंदची वाट बघत पद्मावती तलावाच्या काठी बसून राहिलो... ६ वाजता स्वानंद गडावर पोहचला... आणि म्हणाला "आता अजून एक पाऊल सुध्दा मी उचलू शकत नाही... तोरण्याला मी नाही येऊ शकणार... पण तुम्ही जाऊ शकता... मी अडवणार नाही..."
खरंतर मी आणि प्रसाद खूप दमलो नव्हतो... तोरण्या पर्यंत अजून ४-५ तास चालू शकलो असतो, पण स्वानंदला मागे टाकून जावं वाटलं नाही...  स्वानंद तयार असता तर रात्री ११ पर्यंत तोरण्यावर पोहचलो असतो...

मग तोरण्याचा बेत रद्द केला आणि सुर्यास्ताची वाट बघत बसलो... तोरण्याचा मागे सुर्य बुडू लागला आणि सारं आकाश गडद तांबूस झालं... आज फार सुंदर आणि अविस्मरणीय सुर्यास्त अनुभवला...





काळोख पडताच 'मुक्काम कुठे करायचा?' असा विचार सुरु झाला...
"मुक्काम कुठेही करुत पण सुर्योदय मात्र बालेकिल्ल्यावरुनच बघायचा" असं स्वानंद म्हणाला... मग मुक्कामच बालेकिल्ल्यावर करुया असं ठरलं... बालेकिल्ला चढताना अजून दोन भटक्यांशी ओळख झाली... मग आम्ही पाचजणांनी मिळून जे काही आणलं होतं ते खाऊन घेतलं... आणि उघड्यावरचं झोपायची तयारी केली... सोसाट्याचा वारा होता, मग झोप कसली लागणार?... नुसते ह्या कुशीवरुन त्या कुशीवर करत होतो... मग शेवटी पहाटे ४ वाजता झोपेचा नाद सोडला आणि नभांगण निरखत बसलो...

(हा पण आमच्या सोबतीला होता...)


बालेकिल्ल्यावरुन सुर्योदय अनुभवला आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बालेकिल्ला भटकलो...



(बालेकिल्ल्यावरुन कोकणाकडचा नजारा...)


(बालेकिल्ल्यावरुन दिसणारा पाली-दरवाजा...)


रवीवारी घरी जरा काम असल्यामुळे तोरण्यावर न जाता परतीचा प्रवास सुरु केला... वाटेत सुंदर पांढर्‍या-शुभ्र फुलांचा हलका गंध हवेत तरंगत होता...




गुंजवण्याहून दुपारी ११ ची बस पकडून पुण्यात पोहचलो तेव्हा पुढच्या वेळी "सिंहगड-राजगड-तोरणा" हे एकाच दिवसात करायचे असा विचार डोक्यात चालूच होता...

Thursday 8 April 2010

चांदोबाच्या जगात... राजमाचीला

सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे...

मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं... गार वाऱ्यामुळे घामेजलेलं शरीर फार सुखावलं... ठाकरवाडी मागे टाकून उतरायला सुरुवात केली... दूरवर दरीच्या पल्याड श्रीवर्धन आणि मनरंजन चांदण्या मोजण्यात दंग होते... दुपारच्या उन्हात भाजून निघालेली माती रात्रीच्या गारव्याने तृप्त आणि सुगंधीत झाली होती... मातीचा ओला सुगंध, गार वारा, एकांत आणि शितल चंद्रप्रकाश अशा मंतरलेल्या वातावरणात आम्ही भटकत होतो...



दरीच्या अगदी टोकावर थोडावेळ विसावलो... दरीचा तळ दिसत नव्हता, पण खोली मात्र जाणवत होती... वाऱ्याचा स्वर दरीत घुमत होता... डोकं, मन आणि शरीर सगळच फार हलकं झालं होतं... जणूकाही दरीतल्या वाऱ्याशी एकरुप झालं होतं... कसल्याच यंत्राचा आवाज नाही... माणसांचा गोंगाट नाही... केवळ रात्रीची शातंता होती... मधूनच एखादा रातवा, घुबड खालच्या जंगलातून साद घालत होता... भान हरपून बराच वेळ हे सगळं अनुभवलं... मग घोट-घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा वाटचाल सुरु केली... आता दाट झाडीतून पुढे सरकत होतो... झाडीत हालचाल जाणवायची, पण दृष्टीस काही पडत नव्हतं... साधारण पहाटेचे ४.३० वाजले होते... चंद्र आता जरा तांबूस-पिवळा भासत होता... पहाट होत होती मात्र काळोख वाढत होता... हळूहळू चंद्र राजमाचीच्या मागे अस्त पावला आणि सारं नभांगण नक्षत्रांनी, तारकांनी भरुन आलं... पहाटेच्या ऐवजी रात्र झाल्या सारखं भासू लागलं... आयुष्यात पहिल्यांदाच चंद्रास्त अनुभवला आणि तो देखील जंगलात, राजमाचीच्या सहवासात...

श्रीवर्धनाच्या माथ्यावरुन सुर्योदय बघायचाय म्हणून आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली आणि साधारण ६ वाजता माथ्यावर पोहचलो... गार वाऱ्यात सभोवताल न्याहाळला... सारं जग शांत झोपी गेलं होतं... थोड्याच वेळात उगवतीचं आकाश जरा तांबूस वाटू लागलं... आणि हळूहळू शिरोटा तलावातून सुर्यबिंब वर आलं... सारा आसमंत सोनेरी प्रकाशात न्हावून निघाला... आळस झटकून मांजरसुंबा, ढाक जागे झाले आणि राजमाचीला साद घालू लागले... भवतालच्या जंगलातून पक्ष्यांची चिवचिवाट सुरु झाली... साऱ्या सृष्टीत चैतन्य पसरलं...





(मांजरसुंबा डोंगर आणि मागचा ढाक)


नारायणाला वंदन करुन उधेवाडीकडे निघालो... गावात एका घरात सामान ठेवलं आणि गावामागच्या तळ्याकाठी पोहचलो... तळ्याच्या गार पाण्यात मस्त पोहलो, ताजेतवाणे झालो आणि शंकराच दर्शन घेतलं...



पुन्हा गावात आलो... मस्त जेवलो... पोट भरल्यावर गुंगी आली आणि घराच्या अंगणात आडवे झालो... जाग आली तेव्हा दुपारचा १ वाजला होता...

(ह्यानं उठवलं वेळेत...)


चहा घेतला आणि लगेचच कर्जतच्या वाटेला लागलो...

(राजमाचीहून दिसणारं तळकोकण)


भर दुपारच्या उन्हात चालायला मजा येत होती... काटेसावर फुलून गेली होती, पण तिचा कापूस मात्र सगळीकडे पसरला होता... पांगारा, टबुबीआ अजून बहरलेले होते...

(पांगारा)


(टबुबीआ)


(ओळखता नाही आलं... रेन ट्रीचं फुल आहे का हे?)


इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!...

कर्जतच्या बाजूला उतरताना वाटेत बरेच घोस्ट ट्री आहेत... रात्री चंद्राच्या प्रकाशात हे झाड चकाकत असतं म्हणून ह्याला घोस्ट ट्री म्हणतात...

(घोस्ट ट्री... मराठीत बहूतेक तरी ह्याला ‘सालदोड’ म्हणतात)


साधारण ३ तासात तळात पोहचलो... मग टमटमने कर्जतला... कर्जतहून पुण्यासाठी रेल्वे... लोणावळ्याकडे जाताना रेल्वेतून पुन्हा राजमाची आणि संपुर्ण डोंगररांग न्याहाळली... कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...