Thursday, 10 September 2009

महाबळेश्वर ते कास... चालत...

माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना...

यशदीप: पश्या... तुला माहिती आहे का?...
मी: काय?
यशदीप: अरे लोकं महाबळेश्वराहून इथ पर्यंत चालत येतात...
मी: कसं काय?...
यशदीप: कास आणि महाबळेश्वर एका डोंगररांगेनं जोडलेले आहेत...आणि पूर्वी ह्या डोंगररांगेच्या माथ्यावरुन घोड्यांचा वापर करुन लोकं ये-जा करायचे...
मी: सही रे... आपण पण जायचं का मग?...
यशदीप: जाऊत की...

मग आँगस्टच्या एका वीकऐंडला पुणे - वाई - बलकवडी धरण - केट्स पाँईट - महाबळेश्वर - कास - सातारा असा बेत पक्का केला. शनीवारी लवकर उठून सगळं आवरुन वाईची बस धरली. सुमारे ९.३० ला वाईत पोचलो. मिसळपाव आणि चहा उरकून जीपनं बलकवडी धरणाच्या जरा आधी एका गावात उतरलो, तेव्हा ११.३० वाजले होते (गावाचं नाव वयगाव असावं बहुधा). हे गाव केट्स पाँईटच्या अगदी पायथ्याशीच आहे. गावतल्या एका आजीबाईनं वाटेला लावून दिल्यावर भर ऊन्हात हळू-हळू चढायला सुरुवात केली. जसजसं महाबळेश्वराकडं सरकत होतो तसतसा गारवा जाणवत होता. निम्याहून जरा पुढं गेल्यावर एका झाडाखाली जरा वेळ बसलो; तर समोर...तळात उजव्या हाताला धोम तलाव, डाव्या हाताला बलकवडी धरण, समोर कमळगड-कोळेश्वराचं पठार आणि त्याच्या मागं केंजळगड-रायरेश्वराचं पठार असा भव्य आणि विलोभनीय देखावा होता. थोडा वेळ तिथून हलावसंच वाटत नव्हतं, पण महाबळेश्वराचा गारवा वर चल म्हणून मनाला वेड लावत होता. पुन्हा चढायला सुरुवात केली. वाटेत वेगवेगळी रंगीत फुलं वाऱ्यावर स्वच्छंदपणं डुलत होती. जणूकाही प्रत्येक फुल स्वताच सौंदर्य खु्लून दिसावं म्हणून आपली मान जास्तीतजास्त वर करुन गार वाऱ्यावर झुलत होतं. हे सगळ सौंदर्य बघण्याची, अनूभवण्याची क्षमता देवानं माणसाला दिलीयं, त्याबद्दल देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच.

(वाघनखी (glory lily))


(टोपली कारवी)

आजुबाजूचं अमाप निसर्ग सौंदर्य बघता-बघता केट्स पाँईटच्या अगदी जवळ पोचलो. तर...जरा वर फारच सुंदर नारंगी रंगाच्या फुलांनी मला खुणावलं. फुलं जरा अवघड जागीच होती, पण किती सुंदर!!! अतीशय कोवळ्या नारंगी पाकळ्या आणि स्वच्छ गडद पिवळ्या रंगाचा गाभारा. असं फुल मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. कँमेरा गळ्यात अडकवला आणि दगडावर बोटं चिकटवून फुलां जवळ पोचलो आणि फोटो घेऊन टाकला.

मग जरा पुढं गेल्यावर डाव्या हाताला दगड रचून केलेल्या पायऱ्या चढून केट्स पाँईटवर पोचलो. वरती पर्यटक रंगीबेरंगी कपड्यात बागडत होते. अश्या जागी जो-तो किती आनंदी असतो. आपण इतर वेळीपण असच आनंदी का राहू शकत नाही असा प्रश्न उगीचच पडला. कदाचीत निसर्गापासुन दुर सिमेंटच्या जंगलात न राहता, असच निसर्गाच्या कुशीत राहीलो तर हा प्रश्नच पडणार नाही. प्रगतीच्या नावा खाली आपण पर्यावरणाचा ह्रास करतोय. आहे त्याचा ह्रास करुन चंद्रावर झाडं उगवण्याची स्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? आहे ते जपलं पाहीजे. केलेल्या चुकां मधुन शिकलं पाहीजे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून डोंगरांच्या, झाडांच्या सोबतीत घालवला की हे सगळ जपलं पाहीजे अशी जाणीव आपोआपच होते. कोणी वेगळ सांगण्याची गरज नाही पडत. जरा जास्तच भरकटलो......

कोणताही सीझन असुदे, महाबळेश्वरावर धुकं हे असतंच आणि आजपण होतंच. केट्स पाँईटवर गाजर घेतले आणि ते खात-खात महाबळेश्वराच्या दिशेनं चालायला लागलो. १ - १.५ तासात गावात पोचलो. थोडं कमी-जास्त करुन एका ठिकाणी राहायची सोय झाली. संध्याकाळचे ७ वाजले होते, मग जरा काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून बाहेर पडलो. गावातल्या मारुतीच दर्शन घेतलं आणि मग गावात साधं-सुधं हाँटेल शोधण्यात थोडा वेळ गेला. पोटभर वरण-भात खाल्ला आणि रुमवर येऊन झोपी गेलो. पहाटे लवकर उठून थंड पाण्यानं आंघोळी उरकल्या. दप्तरं पाठीवर अडकवली आणि मेढ्याच्या रस्त्याला लागलो. महाबळेश्वरहून कासच नक्की अंतर किती आणि रस्ता कसा आहे ह्याची नीटशी जाणीव नव्हती म्हणून जरा झपाझप चालत होतो. मस्त सकाळची वेळ...थंड हवा...हलकं धुकं...पक्ष्यांची किलबील...अनोळखी वाट आणि एकांत ह्यामुळं चालताना वेगळाच उत्साह होता. सव्वा तासात ७ - ८ कि.मी. अंतर पार करुन 'माचुतर' गावात पोचलो. गावातून जरा पुढं गेल्यावर उजव्या हाताला झाडीत काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली...

यशदीप: (जरा दचकून आणि थांबून) पश्या...थांब जरा...काहीतरी आहे झाडीत...
मी: काही नाही रे... माकडं असतील...
यशदीप: नाही रे...जरा जास्तच आवाज आला...
मी: चल रे पुढे...घाबरतो काय उगीच...

आणि तितक्यात, माझ्या पासुन फारतर ५० फुटांवरुन गव्यांचा कळप रस्ता पार करायला लागला. त्यात गव्यांची पील्लं पण होती. यशदीप जरा मागं सरकला आणि मी दचकून होतो तिथूनच बघत राहीलो...

यशदीप: अबे ये...मागं ये जरा...अंगावर येईल एखादा...
मी: नाही रे...इतक्या जवळून बघायला मिळतयं...दोन-चार मस्त फोटो काढून घेतो...
मग मी दप्तरातून कँमेरा काढला आणि फोटो घ्यायला सुरुवात केली.

जरा दचकलोच होतो त्यामुळं झूम करुन फोटो काढावा असं सुचलं नाही. फोटो काढतानाच काही गवे रस्ता पार केल्यावर थांबले आणि आमच्याकडं बघू लागले.

आता जरा घाबरलो आणि हळूच कँमेरा दप्तरात टाकून तिथंच ऊभा राहीलो. जर गवे अंगावर आले तर पळण्याच्या तयारीतच ऊभा होतो, पण तसं काही झालं नाही. गवे निवांतपणे झाडीत घुसले. मग आम्हीपण पुढं निघालो आणि ध्यानी-मनी नसताना अचानकच गवे दिसल्या बद्दल जाम खुष होतो. माचुतर पासून १.५-२ कि.मी. पुढं गेल्यावर उजव्या हाताला एक अरुंदसा रस्ता लागला. थोडा वेळ तिथं थांबल्यावर त्या रस्त्या वरुन एक टेम्पो येताना दिसला. हाच रस्ता कासला जातो असं टेम्पोवाल्यानं सांगीतल्यावर पुन्हा आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली. बराच वेळ चालल्या नंतर डाव्या हाताला बरच मोठ्ठ आणि फेमस हाँटेल लागलं (नाव आता आठवत नाही). तिथून जरा पुढं गेल्यावर डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता सुरु झाला. इथं यशदीपला रस्त्यावर लहानसा साप (शील्ड स्नेक) सरपटताना दिसला.

पुढं गेल्यावर सरळ न जाता डाव्या हाताच्या रस्त्यानं जरा खाली उतरुन धारदेवच्या देवळात पोचलो तेव्हा १०.३० वाजले होते. देवळात दोन-चार लहान मुलं खेळत होती. शंकराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मार्गी लागलो. आता उजव्या हाताला तळात सोळशी नदीच खोरं दिसत होतं. उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली होती. एक लहानशी खिंड लागली. खिंडीत जरा सावलीत बसून थोडं खाल्लं आणि गाळदेवच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. आजुबाजूची हिरवळ कमी झाली होती आणि उन्ह वाढत होतं. दुरवर डाव्या हाताला डोंगराच्या एका सोंडेवर दोन-चार घरं दिसली. जवळ पोचल्यावर एका पडलेल्या दगडी कमानीवर 'गाळदेव' लिहीलेलं दिसलं. गावात न जाता काही क्षण तिथंच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागलो. भवतालचा प्रदेश जास्तच ओसाड आणि रुक्ष जाणवत होता. धारदेव नंतर कुठेच माणसांची चाहूल सुद्धा लागली नव्हती. थोडं पुढं गेल्या वर वाटेच्या दोन्ही बाजूला पडकी घरं लागली आणि मग एक हापसा आणि नांदती घरं दिसली. हापश्याच्या गार पाण्यानं इतका वेळ उन्हात चालून-चालून दमलेलं शरीर जरा सुखावलं. कास अजून किती दुर आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती म्हणून जास्त वेळ न घालवता वाटेला लागलो. वाटेत सावली देणारं एकही झाड नव्हतं. कमरे इतक्या उंच झुडपांची मात्र गर्दी होती. मधूनच एखादा ढग सूर्याला झाकून थोडी सावली देत होता. आता उजव्या हाताला तळात कोयना आणि सोळशीच्या संगमावर वसलेलं तापोळा आणि डाव्या हाताला दूरवर मेरुलींगाचा डोंगर जाणवू लागला होता.

जरा भूक लागली होती. मग भर उन्हातच बसून खाऊन घेतलं. समोरचं टेपाड पार केल्यावर गुरं आणि गुराखी दिसला. त्यानं दूरवर अस्पष्ट दिसणाऱ्या डोंगराकडं बोट दाखवत तेच कासचं पठार असल्याच खुणावलं. सकाळ पासून पहिल्यांदाच नक्की कुठं जायचंय आणि अजून किती चालायचय हे कळालं होतं. आता पाय जरा निवांतच पुढं सरकत होते. इतका वेळ मंजील दिसत नव्हती, म्हणून ती जवळ करण्यासाठी थकवा, उन्ह, भूक ह्याचा विचार न करता बिंधास्त चालत होतो; पण आता मंजील दिसताच शरीर जरा आळसावलं होतं, नखरे करत होतं. असंच काहीतरी आयुष्यातल्या इतर ध्येयांच्या बाबतीत देखील घडत असतं, पण ते आजच्या सारखं स्पष्ट जाणवत नाही.

अर्धा तास चालल्यावर एका लाहनश्या गावातल्या शाळेच्या आवारात पोचलो. शाळा म्हणजे फक्त एकच खोली होती, मात्र वर्ग चवथी पर्यंत होते. शाळेच्या ओट्यावर थोडा वेळ विसावलो आणि पुन्हा चालायला लागलो. एक लहानशी खिंड लागली. वर दाटून आलेल्या ढगां मुळं जरा काळोख झाला होता आणि त्यात कोयना धरणाच्या पाण्याचा देखावा छान दिसत होता.

खिंड पार करुन कासच्या पठारावर पाय ठेवला आणि गर्द झाडीत विसावलेला कासचा तलाव उजव्या हाताला दिसला. मग अजून पाऊण तास पायपीट करुन कासच्या तलावा जवळ सातारा-बामणोली रस्त्याला लागलो तेव्हा दुपारचे ३.४५ वाजले होते. इथं गवतफुलं बघायला आलेल्या पर्यटकांची थोडी गर्दी होती. सुंदर, नाजुक आणि रंगीबेरंगी गवतफुलांनी संपुर्ण पठार नटलं होतं.

जाम दमलो होतो. अर्धा तास आराम केला. यशदीपचा डावा पाय जरा दुखत होता. तरी सुद्धा...

यशदीप: पश्या...बस यायला अजून दोन तास आहेत...
मी: काय करायचं मग...
यशदीप: चल...यवतेश्वरच्या दिशेनं चालायला लागूत...
मी: चल...

बऱ्याचदा थोडेफार कष्ट केले की शरीर थकतं, पण आवडीचं काम असेल तर मन अजीबात थकत नाही. मग थकलेल्या देहात सुद्धा कुठूनसं नवीन चैतन्य येतं आणि आपण पुन्हा कामाला लागतो. अर्धा तास चालल्यावर पेट्री गावच्या जवळ एका कारनं आम्हाला लीफ्ट दिली. यवतेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या बोगद्या जवळ कार मधून उतरलो. थोडा वेळ वाटलं की आता रिक्षा करुन घरी जावं, पण लगेचच...छे! रिक्षा काय...चालतच घरी पोचायच. मग सरळ रोजच्या रस्त्यानं न जाता, उजव्या हाताला चढून गेल्यावर अजिंक्यताऱ्यावर जाणारा डांबरी रस्ता लागला. ह्या रस्त्यानं उतरत चारभींती टेकडी जवळ पोचलो. चारभींती टेकडी उतरुन यशदीपच्या घरी पोचलो तेंव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. ह्या दोन दिवसात जवळ-जवळ ५५ कि.मी. चाललो होतो. मस्त गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर थकवा नाहीसा झाला. मग यशदीपच्या आईनं केलेल्या पुरणपोळ्या-तुप पोटभर खाल्ल्या आणि मागच्या दोन दिवसांच्या आठवणी स्मरत झोपी गेलो.

No comments:

Post a Comment