Tuesday, 2 February 2010

कोकणातली भटकंती...

सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता...  


पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो... पहाटेच्या कोवळ्या उन्हात सोनेरी समुद्र पाहिला...  
(आंबेनळी घाट) (मधु-मकरंद गड... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (वेळणेश्वरचा समुद्र-किनारा) (म्हावरा) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्ता नंतर... वेळणेश्वर) (सुर्योदय... वेळणेश्वर) (वेळणेश्वर मंदिर) दुसऱ्या दिवशी वेळणेश्वर - गुहाघर - धोपावे - दाभोळ - दापोली - हर्णे - केळशी - वेशवी - कोलमांडले - हरिहरेश्वर असा प्रवास केला... धोपावे ते दाभोळ आणि वेशवी ते कोलमांडले हा प्रवास बोटीने करावा लागतो... दुचाकी/चारचाकी आरामात बोटीत मावतात... आजची संध्याकाळ केळशीच्या समुद्र-किनाऱ्यावर घालवली... सुर्यास्ता नंतर उरलेला प्रवास करुन हरिहरेश्वरला पोहचलो...  
(आंजर्ले समुद्र-किनारा)  
(केळशी समुद्र-किनारा)  


तिसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हरिहरेश्वरच्या समुद्र-किनाऱ्यावर भटकलो...  
(शंख... हरिहरेश्वर)
 
(चामू... हरिहरेश्वर) (खेकडा... हरिहरेश्वर) (हरिहरेश्वर समुद्र-किनारा) हरिहरेश्वरला दुपारचं जेवण उरकुन परतीचा प्रवास सुरु केला... हरिहरेश्वर - म्हसळा - माणगाव - निजामपूर - विळे - ताम्हिणी घाट - मुळशी - पुणे असा प्रवास केला... मुळशीच्या काठावरच्या सुरेख सुर्यास्ताने भटकंतीची सांगता झाली...  
(सुर्यास्त... मुळशी)  


(मी... मुळशीला सुर्यास्ताच्या वेळी)  


३ दिवस समुद्रात मनसोक्त पोहलो आणि खूप मासे खाल्ले... हलवा, सुरमाई आणि सुंगटं... खूप दिवसांनी इतके ताजे मासे खाल्ले... घाई नव्हती, चिंता नव्हती... वेळ होता, दुचाकी होती आणि भटकायची प्रचंड आवड... फार मजा आली... केवळ आनंदी आनंद...

Friday, 8 January 2010

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं...

२-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...



ठरल्या प्रमाणे शनीवारी सकाळी सुमारे १० वाजता जुन्नरला पोहचलो... जुन्नरहून इंगळूणला जाणारी ९.४५ ची बस चुकली आणि पुढची बस १२.३० ला होती... इतकावेळ बसची वाट बघण्यापेक्षा जीपने प्रवास करुया असं ठरलं... पुरेसे प्रवासी जमा होऊन जीप सुटायला ११ वाजले... जुन्नर सोडून घाटाच्या दिशेने निघालो की भवतालचा प्रदेश फारच सुंदर आहे... लहान-लहान गावांमधून रस्ता काढत साधारण ११.४५ वाजता इंगळूणला पोहचलो... पाटपीशव्या चढवल्या आणि भिवाडे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... भिवाडे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलयं आणि गावापर्यंत डांबरी रस्ता आहे... भिवाडे गावानंतर रस्ता सोडला आणि डोंगरवाट धरली... थोडावेळ चढल्यावर दूरवर उजव्या हाताला ढाकोबा दिसला...



शेळ्या-मेंढ्यांना चरायला सोडून एक आजोबा आंब्याच्या सावलीत निवांत बसले होते... आम्हाला बघून मस्त हसले... त्यांच्याशी इकडच्या-तीकडच्या गप्पा झाल्या आणि आम्ही पुन्हा डोंगर चढू लागलो... गार हवेमुळे दुपारचं उन्ह अजीबात जाणवत नव्हतं... थोड्यावेळात चढ संपला आणि पठारावरच्या आंबे गावात पोहचलो... समोर दूरवर झाडीत लपलेला दुर्ग आता खुणावू लागला... थोडावेळ चालल्यावर हातवीज गावी जाणारा डांबरी रस्ता सोडून उजव्या हाताला वळलो आणि दुर्गवाडीत पोहचलो...

(दुर्गवाडीतून दुर्ग असा दिसतो...)



अजून २० मिनीटं चालून दुर्गच्या पुढ्यात वसलेल्या दुर्गमातेच दर्शन घेतलं... 



इंगळूणहून इथपर्यंत चालत पोहचायला साधारण ३ तास लागले... (पर्यायी रस्ता वापरुन जुन्नरहून दुर्ग पर्यंत जीपनं येता येतं... संध्याकाळी (साधारण ५ च्या सुमारास) जुन्नर - हातवीज अशी मुक्कामी बस आहे...)

अगदी वेळेत मुक्कामाच्या जागी पोहचल्यामुळे भरपुर वेळ होता... मग दुर्गच्या मागे कड्याच्या टोकावर जावून बसलो... बसलो होतो त्याच्या डावी कडून एक जरा अवघड वाट कोकणात उतरते... ह्या वाटेला खुटेदार असं म्हणतात... कोकणातून खुटेदाराने वर चढताना जबरदस्त मजा येईल ह्यात काही शंकाच नाही... 

सुर्य ढगांच्या मागे लपला होता आणि हवा पण खूप धुसर होती, त्यामुळे वातावरणात जरा आळशीपणा जाणवत होता... पाकोळ्या (Mountain Swallow) आणि काही घारी आकाशात स्वच्छंदपणे तरंगत होत्या... कड्यावरुन बिनधास्त कोकणात झेप घ्यायची, हवेतच लहान किडे पकडून खायचे आणि परत झेप घ्यायची असं पाकोळ्यांच चालू होतं... काय उडतात ह्या पाकोळ्या!!! त्यांना उडताना बघताना आपण इतके अचंबित होतो की दुसरा कोणताच विचार डोक्यात येत नाही... केवळ परफेक्शन आणि एक्सलन्स... देवाची बेजोड कारिगरी...

पाकोळ्यांना उडताना बघून आमचा आळस कमी झाला आणि आम्ही दुर्गच्या माथ्यावर जाणारी वाट धरली... दुर्गमातेच्या देवळापासून १० मिनीटातच दुर्गमाथ्यावर पोहचलो... माथ्यावर दगडांचा सडा पडलाय... कोणत्याही प्रकारच्या बांधकामाचे अवशेष नाहीत... माथ्यावरुन ढाकोबा आणि भवतालचं जंगल असा सुरेख देखावा दिसतो...

(मध्यभागीचा उंच डोंगर म्हणजे ढाकोबा...)



ढगांमुळे सुर्यास्त आणि संधीप्रकाश असं काहीच अनुभवायला नाही मिळालं... काळोख पडायच्या आत दुर्गमातेच्या देवळा जवळ उतरलो... देवळा ऎवजी देवळापासून जवळच असलेल्या समाज-मंदिरात मुक्काम करायचं पक्क केलं... थोडं बांधकाम आणि पत्र्याची शेड असं ते समाज-मंदिर आहे... मुक्कामासाठी एकदम आदर्श जागा... इथून पाण्याची विहिरपण जवळच आहे... चुल उघड्यावरच मांडली आणि लाकडं गोळा केली... ह्यावेळेस मी सोबत फ्लींट (Flint) आणला होता आणि त्यानेच ठिणगी पाडून चुल पेटवायची होती (Man vs Wild मधे Bear Grylls करतो तसंच)... वाळलेलं गवत जमा केलं आणि ठिणगी पाडायला सुरुवात केली... ठिणग्या पडत होत्या मात्र गवत काही पेट घेत नव्हतं... जरा जास्त ठिणग्या पाडल्यावर गवताने पेट घेतला... पेटलेलं गवत चुलीत टाकलं आणि आग वाढवायचा प्रयत्न केला, पण वाढायच्या ऎवजी आग विजली... हा प्रकार ३-४ वेळा केला तरी चुल पेट घेत नव्हती... जवळ-जवळ अर्धा तास ठिणग्या पाडून हात दुखायला लागले... काळोख पण वाढला... सोबत काडेपेटी आणि केरोसीन किंवा कापूर असं काहीच नव्हतं आणलं... गरम-गरम खिचडी तोंडात पडणार की नाही अशी परिस्थीती आली... मुक्कामाच्या जागे पासून दुर्गवाडी साधारण १५ मिनीटांवर होती, मग गावात काडेपेटी आणि केरोसीन मिळतयं का? हे बघायला  ऋशी गेला... अजितचा ठिणगी पाडून आग पेटवायचा प्रयत्न चालूच होता... मी अजून वाळलेली लाकडं गोळा केली, पण तरीही चुल पेटत नव्हती... शेवटी काडेपेटी आणि केरोसीन घेऊन ऋशी आला आणि एका फटक्यात चुल पेटली... आगेची संकल्पना माहिती असून सुद्धा, लहानपणा पासून आग बघत असून सुद्धा एवढ्या कष्टा नंतर पेटलेली आग बघून फार काही मिळवल्याची अनुभुती झाली... आदिमानवाने पहिल्यांदा आग पेटवल्यावर त्याला काय वाटलं असेल? असा विचार डोक्यात आला...



काळ्याकुट्ट अंधारात पेटलेली चुल बघून उत्साह प्रचंड वाढला... अजितने चुलीवर मस्त खिचडी तयार केली... मग पापड, बटाटे आणि कांदे भाजून घेतले...

मेणबत्ती पण नव्हती आणली, मग अंधारातच गरम खिचडी, पापड, रोस्टेड बटाटे आणि कांदे यांचा आस्वाद घेतला... भरपूर गप्पा झाल्या... प्रचंड शांतता, गुडूप काळोख, दाट जंगल आणि आम्हा तिंघा व्यतीरिक्त कोणीच नाही... एकदम मस्त अनुभव होता... साधारण रात्री ९.३० ला झोपी गेलो... पहाटे ढगांमुळे सुर्योदय दिसला नाही... चुल पेटवून कोरा चहा केला... त्यात लिंबू पीळून मस्त लेमन-टी प्यायलो... गरम maggy चा नाश्ता केला...





सगळं सामान आवरलं आणि ढाकोबाला जायच्या आधी दुर्गमातेच दर्शन घेण्यासाठी देवळात गेलो... देवळा जवळच्या झाडावर शेकरु (Giant Squirrel) एका फांदी वरुन दुसऱ्या फांदी वर उड्या मारत बराच वेळ खेळताना पाहिलं...

दुर्गचा निरोप घेऊन ढाकोबाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... दुर्ग ते ढाकोबा प्रवास बऱ्यापैकी फसवा आहे... जंगल आणि सारखे येणारे चढ-उतार ह्यामुळे बरोबर वाट शोधणं जरा अवघडच आहे... 



दुर्ग सोडल्यावर थोड्याच वेळात एका दरीच्या काठावर आलो... दरीत न उतरता काठानेच चालत साधारण १ तासात एका ओढ्यात पोहचलो... ओढ्यातलं पाणी खूप नितळ आणि गार होतं... संपूर्ण वर्षभर ह्या ओढ्यात पाणी असतं... पाण्यानं ओढ्यातल्या दगडांवर फार सुंदर कारिगरी केली आहे...





पाण्यात मस्त डुबून घेतलं, ताजे झालो आणि पुन्हा ढाकोबाच्या मार्गी लागलो... दाट झाडीतून चढून गेल्यावर पठारावर पोहचलो... इथून ढाकोबा अगदीच जवळ जाणवत होता...



ह्या पठारावरची उजव्या हाताची वाट ढाकोबाच्या देवळात जाते... देवळाकडे न जाता आम्ही सरळ ढाकोबा कडे जाणारी वाट धरली... अजून एका चढा नंतर ढकोबाच्या सोंडेवर पोहचलो... अतीशय उभा चढ चढून शेवटी दुपारी १ वाजता ढाकोबाच्या माथ्यावर पाय ठेवला... माथ्यावर उन्हाचे चांगलेच चटके बसत होते, पण इथून जो नजारा दिसतो त्याला तोड नाही... खाली सरळ १ कि.मी. खोल कोकणात डोकावता येतं...



उजव्या हाताला दाऱ्याघाट, जीवधन, नानाचा अंगठा आणि नानेघाट असा देखावा दिसतो... खोल कोकणात सरळ उतरणारे कातळकडे बघून वेगळाच रोमांच अंगात संचारतो...



ढाकोबाच्या माथ्यावर अनेक मधमाश्या मध गोळा करण्यात मग्न होत्या...



माथ्यावरुन दिसणारा नजारा डोळ्यात साठवला आणि उतरायला सुरुवात केली... थोडं उतरल्यावर एक ओढा लागला.. हा ओढा थेट आंबोली पर्यंत उतरतो... मागे एकदा ह्या ओढ्यातूनच उतरलो होतो, पण वाट फार काट्याकुट्यातून जाते... सोबत बरंच सामान होतं म्हणून ह्या वाटेने न जाता पर्यायी वाटेवर चालायला लागलो... ही वाट सुरुवातीला दाट कारवीच्या रानातून पुढे सरकत होती... कारवीच्या रानात दिशेचं भान राहिलं नाही तरी पण आम्ही चालत राहिलो... थोड्या वेळात पठारावर आलो आणि मस्त मळलेली पायवाट लागली... मागे वळून ढाकोबाकडे पाहिल्यावर काहीतरी चुकतयं असं वाटलं कारण मागच्या वेळेस आंबोलीहून वर चढताना ढाकोबा असा कधीच दिसला नव्हता, पण पायवाट इतकी मळलेली आहे म्हंटल्यावर गावात जाईलच असा समज करुन आम्ही डोंगर उतरतच गेलो... बरंच उतरल्यावर एका धनगराचं घर लागलं... तीथे चौकशी केल्यावर कळालं की आम्ही चांगलेच भरकटलोय... समोर दाट रान आणि दरी होती...

"हा समोर डोंगर दिसतोय ना, त्याच्या मागच्या डोंगराच्या मागे मीना नदीच्या खोऱ्यात आंबोली गाव आहे... आलात तसे परत वर जा... पठारावरुन उजव्या हाताला बरंच चालल्यावर आंबोलीला उतरणारी वाट लागेल..." अशी माहिती मिळाली...

बरेच दमलो होतो, पण वेळेत आंबोलीला पोहचणं फार आवश्यक होतं... नाहीतर आंबोलीहून जुन्नरला जाणारी बस चुकेल अशी भिती होती, मग दम न खाता परत चढायला लागलो... साधारण पाऊण तास चालल्यावर आंबोलीत उतरणारा ओढा लागला... जरा पाणी प्यायलो, दम खाल्ला आणि उतरायला लागलो... ह्या पुढची वाट ओळखीची होती... एका तासात आंबोली गावाच्या लहानश्या बसस्टँड वर पोहचलो... वाटेत कांडेसर (White-necked Stork) पक्ष्याची जोडी दिसली... ४.१५ ची जुन्नरला जाणारी शेवटची बस मिळाली... 

बस मधे बसल्यावर डोंगरातल्या त्या धनगराची आठवण झाली... इतक्या दाट रानात एकटंच कुटूंब कसं काय नांदत असेल?... वीज नाही, रात्री त्यांना भिती नसेल का वाटत?... कधी काही घडलं तर वाहतुकीचं वाहन मिळायला किमान १.५ तास तरी जंगलातून चालावं लागत असेल... का बरं हे इतक्या जंगलात राहात असतील?... त्यांची लहान मुलं कोणा बरोबर आणि काय खेळत असतील?... असे अनेक प्रश्न मनात आले... ह्या सगळ्या प्रश्नांच एकच उत्तर मिळालं आणि ते म्हणजे "हिच खरी निसर्गाची लेकरं आणि रानाची पाखरं ..."

Thursday, 10 December 2009

मी पण पळालो...

पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते...
"पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या
"हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी

पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत... सराव नाही अजिबात...".
त्याला म्हणालो... "अरे, सराव नसला तर काय झालं?... इच्छा तर आहे ना!... हळूहळू पळ... अगदीच दमलास तर थोडावेळ चालायचं आणि मग परत पळायचं... करावं वाटतयं तर काहीतरी कारणं देऊन टाळू नकोस... रेस पुर्ण केल्यावर फार भारी वाटेल तुला... चल आता, नेहरु स्टेडियमला जावून नोंदणी करुन येऊत..."

मी आणि रव्याने १० कि.मी. च्या रेस मधे भाग घेतला होता (पुरुषांसाठी हाफ मँरेथॉन नव्हती म्हणून)... मँरेथॉनच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला सकाळी ७.३० च्या सुमारास सगळी मान्यवर मंडळी आली... हाय, हँलो झालं आणि पुरुषांची फुल मँरेथॉन (४२ कि.मी.) सुरु झाली... त्यानंतर थोड्याच वेळात १० कि.मी. च्या रेसला सुरुवात झाली... वातावरणात प्रचंड उत्साह होता... त्यात we will, we will rock you ह्या गाण्यामुळे अजूनच भर पडली... पब्लिकचा भरपुर धिंगाणा चालू होता... शिवाजी महाराज, भवानी माता आणि अजून बऱ्याच जणांचा जयजयकार करत पब्लिक पळत होतं...

ठरल्या प्रमाणे आम्ही सुरुवात निवांत केली... सुरुवातीला गर्दीमुळे जोरात पळणं शक्य नव्हतच... सोबत बरेच तरुण, साठी-सत्तरीतले आजोबा, स्त्रीया, लहान मुली आणि मुलं पळत होते... आवड असली की वय, शारिरीक क्षमता आणि इतर कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत ह्याचच हे प्रतीक होतं...

साधारण २ कि.मी. नंतर गर्दी जरा कमी झाली आणि पळताना मस्त ह्रीदम सेट झाला... रस्त्याच्या दोन्ही बाजूला मँरेथॉन बघायला लोक जमले होते... पळणाऱ्यां बद्दलच कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं...

पहिले वीसएक मिनीटं मी आणि रव्या सोबतच पळत होतो... मग मी जरा जोरात पळायला लागलो... थोड्याच वेळात ५ कि.मी. पुर्ण झाल्याची खुण दिसली... "५ कि.मी. झालं पण?... अजून दमलो सुध्दा नाही... सही रे!" असा मनात विचार आला... अधे-मधे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँडच्या आवाजाने उस्ताह अजूनच वाढायचा... बऱ्याचदा दम लागणं, न लागणं हे मानसीक असतं... इच्छा असली की शरिर साथ देतच...

५ कि.मी. ते ९ कि.मी. पर्यंत पेस मेन्टेन केला... नंतर जोरात पळायला लागलो... काहीजणांना मागे टाकून मंगलदास रोडवर फिनीश लाइन पार केली... वाटलं होतं त्यापेक्षा फारच सोपं गेलं... मला रेस पुर्ण करायला ५१ मिनीटं लागली... रेस पुर्ण करुन थोडं स्ट्रेचिंग करत होतो तर रव्या सुद्धा पोहचला... रव्या पण नॉनस्टॉप पळाला... अजिबात सराव न करता...

आज एक स्वप्न पुर्ण झालं...  पुणे मँरेथॉन मधे पळायचं... आता आत्मविश्वास वाढलायं... हाफ-मँरेथॉन तर आता नक्कीच पळू शकेन...

"Ask yourself :  'Can I give more?'. The answer is usually : 'Yes'."
-Paul Tergat, Kenyan professional marathoner

(रेस नंतर एक दिवस Indian express मधलं pune newsline चाळत हो्तो... त्यावर पुणे मँरेथॉनचे फोटो आले होते आणि त्यातल्या एका फोटोत मी आणि रव्या होतो... कॉपीराईटमुळे तो फोटो इथे नाही लावला...)


Saturday, 28 November 2009

रेवदंडा... माझं गाव

मित्राच्या लग्नाला जायला नाही जमलं... तर निदान त्यानंतरच्या सत्यनारायणाच्या पुजेला तरी जायला पाहिजे असा विचार आला आणि रेवदंड्याला जायचं ठरलं...

लहानपणी रेवदंड्यात असताना किल्ल्यात, बंदरावर, सुरुच्या वनात, दत्ताच्या डोंगरावर खूप उनाडक्या केल्यात... करवंद, जांभळं, बोरं, आवळे, ताडगोळे, जाम आणि चिंचा खात दत्ताच्या डोंगरावर पडीक असायचो... रोजच बंदरावर क्रिकेट खेळायचो... मनात येईल तेव्हा समुद्रात पोहायचो; सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही वेळेच भान नव्हतच... एक नंबरचा उनाड होतो...

मी आणि रव्या दुचाकीवर सकाळी लवकर निघालो... सुमारे १०.३० वाजता चौलच्या मुखरी गणपतीच्या देवळात पोहचलो... चौलचा मुखरी गणपती आणि रेवदंड्यातला पारनाक्यावरचा मारुती हे माझे आवडते देव...

(मुखरी गणपती)


दर्शन झाल्यावर पोखरणीच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसलो... फार निवांत वाटलं...
११.३० ला मित्राच्या घरी पोहचलो तर पुजा अजून चालूच होती; बराच वेळ लागणार होता... तोपर्यंत दत्ताचं दर्शन घेऊन येतो असं सागून घरा बाहेर पडलो... दताच्या डोंगराकडे जाताना डाव्या हाताला एका टेपाडावर खूप जुनं घुमटाकार बांधकाम आहे... नक्की काय आहे हे मला नीटसं माहिती नाही...



ह्या टेपाडावरुन दताचा डोंगर छान दिसतो...

(डोंगराच्या अगदी टोकाला दत्ताचं मंदिर आहे)


डोंगराच्या पायथ्याशी फार मोठ्ठं गोरखचिंचेच झाड आहे... गोरखचिंचेच झाड फार काळ जगतं; ५००-६०० वर्ष तर आरामात आणि भारतात हे झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे... गोरखचिंच खायलापण छान लागते...

(मी आणि गोरखचिंच)


डोंगराच्या पायथ्या पासून माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत... साधारण ८०० पायऱ्या असतील... वर चढताना आजुबाजुला वड, उंबर आणि ताडगोळ्याची भरपुर झाडं लागतात...

(वडाचं फळ)


डोंगराच्या माथ्यावरचं लहानसं दत्ताचं मंदिर फार सुंदर आहे... मंदिराच्या बाहेर मस्त पेढे मिळतात... दरवर्षी दत्तजंयतीला ५ दिवस जत्रा भरते... खूप गर्दी असते तेव्हा...

दर्शन घेतलं, थोडावेळ बसलो आणि मग डोंगर उतरायला लागलो... पुन्हा मित्राच्या घरी पोहचलो तेव्हा पुजा उरकुन जेवणाला सुरुवात झाली होती... पोटभर जेवलो, मित्राशी गप्पा मारल्या, त्याचा निरोप घेतला आणि रेवदंड्याचा किल्ला बघायला निघालो...

लहानपणी किल्ल्यात खूप भटकायचो... किल्ल्याच्या भिंतीवर चढायचो... बुरुजावर बसून भरती-ओहटीचा खेळ बघायचो... बुरुजावरुन समुद्रात आणि पुळणीत उड्या मारायचो...  खूप धमाल असायची...

पुर्वी रेवदंडा गाव किल्याच्या आतच वसलं होतं, आता जरा पसरलयं... १५५८ मधे पोर्तुगीजांनी रेवदंडा कोट बांधला... १६८४ मधे संभाजीराजांनी हा किल्ला जिंकण्याचा असफल प्रयत्न केला होता... नंतर १७४० मधे मराठ्यांनी हा किल्ला मिळवला, पण १८०६ मधे इंग्रजांनी तो काबीज केला... १८१७ मधे आंग्रेंनी किल्ला परत जिंकला, पण एकच वर्षात परत तो इंग्रजांकडे गेला...

(रेवदंडा कोट)








(किल्ल्यात माडांची वाडी आहे...)


(रेवदंडा किल्ल्याचे अवशेष)


रेवदंडा गाव फार सुंदर आहे... शनीवारी आणि रवीवारी मुंबईकडच्या पर्यटकांची खूप गर्दी असते सध्या... त्यामुळे गावातल्या लोकांना उत्पंनाचा अजून एक मार्ग मोकळा झालायं ह्याचा आनंदच आहे... पण "प्लास्टीकच्या पीशव्या, खोके वगेरे उघड्यावर टाकून इथलं निसर्ग सौंदर्य खराब करु नका" अशी पर्यटकांना विनंती आहे... आता अशा सुंदर, निवांत आणि निर्मळ जागा फारच कमी राहिल्या आहेत... त्यांच संरक्षण आपण केलं पाहिजे...
"I am myself and what is around me, and if I do not save it, it shall not save me" अशी भावना बाळगली पहिजे...

Thursday, 19 November 2009

बाळा जो-जो रे... एक रेखाटन

मस्त निवांत झोपलं आहे...

तळ्यात दगड मारल्यावर पाण्यावर जसे तरंग उठतात, अगदी तसेच विचारांचे तरंग  डोक्यात निरंतर चालू असतात... एका मुळे दुसरी तरंग आणि मग तीसरी असं चालूच असतं, पण इतक्या लहानशा जीवाला असं निवांत झोपलेलं पाहिलं की ते तरंग नाहीसे होतात; मन शांत आणि स्थीर होतं... फार फार समाधान मिळतं...

Saturday, 7 November 2009

लिंगाणा...

तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं.
"गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो...
लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.

बरेचजण तोरण्यावरुन निघून घाटमाथ्यापर्यंत येतात आणि मग लिगाण्याजवळच्या शिंगापूर-नाळ किंवा बोराट्याच्या-नाळीने कोकणात उतरुन रायगड, असा ट्रेक करतात. किमान तीन दिवस तरी लागतात ह्या ट्रेकला. माझ्याजवळ एकच दिवस होता आणि लिंगाणा जवळून बघायची जाम इच्छा होती. दुचाकीवरुन हारपुड गावी पोहचायचं आणि मग चालत रायलिंग पठार गाठायचं आणि लिगाण्याचं जवळून दर्शन घ्यायचं ठरवलं.

मी, ‌ऋशी, स्वानंद आणि अजय असे चौघेजण दोन दुचाकीवर रवीवारी पहाटे सिंहगडाच्या दिशेने निघालो. डोणजे फाट्यावर उजवीकडे वळाल्यावर अंदाजे ५-६ कि.मी. पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाबे खिंडीतून वेल्ह्याला जायच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून वेल्ह्याला पोहचतो. मस्त रस्ता आहे... फारशी रहदारी नाही... रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि शेतं आहेत... अधून-मधून लहानशी वाडी लागते... जवळच्या गवताळ टेकड्यांवर गुरं चरताना दिसतात. खिंडीच्या माथ्यावरुन राजगड आणि तोरणा सोबतच दिसतात.

खिंड उतरल्यावर पाबे आणि मग वेल्हा लागतं. साधारण एक तासात आम्ही वेल्ह्याला पोहचलो. वेल्ह्यात नाष्टा उरकला आणि कानंद खिंडीच्या रस्त्याला लागलो (केळद, कुंबळे आणि मढे-घाटला हाच रस्ता जातो). हा रस्ता तोरण्याला प्रदक्षीणा घालून जात असल्यामुळे तोरण्याचं चौफेर दर्शन घडतं. कानंद खिंड ओलांडून ७-८ कि.मी. उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आम्ही उजव्या हाताला हारपुडला जाणारी वाट धरली (ह्या फाट्यापासून केळद (मढेघाट) ५-६ कि.मी आहे).

पीकलेल्या भातशेतीचा फिकट-पीवळा रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी भासत होता. पीकलेल्या भाताचा गोड सुगंध हवेत दरवळत होता. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी शेतात उभी केलेली वेगवेगळी बुजगावणी बघत वरोती गावात पोहचलो. इथून हारपुड हाकेच्या अंतरावर आहे, पण वाट मात्र जरा बिकटच आहे. आमच्या आणि दुचाकीच्या सगळ्या अवयवांची चाचणी घेत हारपुडला पोहचलो. गावातल्या शाळेच्या आवारात दुचाकी लावल्या.

पावसामुळे खराब झालेलं अंगण दुरुस्त करण्यात एक आजोबा मग्न होते. त्यांच वय किमान ८० तरी असेलच. आम्हाला बघताच आजोबांनी विचारलं...
"लिंगाण्याला चाल्लाव काय?"
भटकण्यासाठी शहरातून लोकं आपल्या गावात येतात ह्याबद्दलचा आनंद आणि कौतुक त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर जाणवत होतं. गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...

आजोबांनी दाखवलेली वाट धरली आणि मोहरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अजून ओढ्यांमधे भरपुर पाणी होतं...

(ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दिसणारे दगडगोटे...)


पावसाळा संपला होता आणि वाढत्या उन्हामुळे गवत जरा पीवळट दिसत होतं... गवताच्या पात्यांच्या मागे कसली कुसं दिसतायत? म्हणून जरा नीट नीरखून पाहीलं तर सुरवंटं होती... ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...
  
एक-दोन लहान टेकड्या चढल्यावर जंगल लागलं आणि शेवटचा चढ सुरु झाला. वाट गावकऱ्यांच्या पायाखालची असल्यामुळे मस्त मळलेली होती. चढ संपला आणि अचानकच समोर लिंगाणा आला. लिंगाण्याच्या मागचा रायगड तर अधीकच भव्य भासत होता. डाव्या हाताला लिंगाणा ठेऊन थोडावेळ चालल्यावर मोहरीला पोहचलो. लहानसं गाव आहे. पावसात धो धो पाऊस कोसळतो आणि उन्हाळ्यात पाणीच नसतं. मागच्याच वर्षी श्रमदानातून कातळ खणून एक मोठ्ठ टाकं बांधलय गावकऱ्यांनी. त्यात डोकावून पाहीलं; नितळ हिरवंगार पाणी त्यात साठलं होतं.

(मोहरी गावातलं एक घर... पाऊस, वारा आणि थंडीचा जोर कमी करण्यासाठी घराचं छत अगदी खालपर्यंत आणलयं...)


मोहरीच्या जरा खाली शिंगापूर गाव वसलयं. ह्या गावातुनच शिंगापुर-नाळीने कोकणातल्या दापोलीला (रत्नागीरीच्या जवळचं दापोली नव्हे) उतरता येतं. मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर थोडावेळ पठारावर, थोडावेळ जंगलातून चालत साधारण एक तासात रायलिंग पठारावर पोहचलो. वाटेत सह्याद्रिचं विलोभनीय रुप पहायला मिळालं...

(शिंगापूर गाव...)






पठारावर कमरेपर्यंत गवत वाढलं होतं; वाऱ्यावर डुलत होतं. गवतातून वाट काढत पठाराच्या टोकाला पोहचलो. आलेल्या वाटेकडे मागे वळून पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडुने काढलेल्या रेघे प्रमाणे गवतामधे वाट उठून दिसत होती. रायलिंग पठारावरुन लिंगाण्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी गप्पा मारता येतात.

पठाराच्या अगदी काठावर पाय दरीत सोडून लिंगाण्याकडे बघत बसलो. इतक्या जवळून लिंगाणा बघण्याचं स्वप्न पुर्ण झालं... प्रत्यक्ष त्यावर चढताना येणाऱ्या रोमांचाची थोडी अनुभुती आली... एकट्या-दुकट्याचं ते काम नाही... पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...

(लिंगाणा...)

(लिंगाणा... जवळून)


पठारावर उभं राहून स्वताभोवती एक चक्कर मारली तर चौभेर केवळ अप्रतीम नजारा दिसतो...







(तळकोकणातलं दापोली गाव...)


एका झाडाखाली बसून जेवण उरकलं आणि थोडावेळ आराम केला.
पठाराच्या टोकावरुन फेकलेला दगड लिंगाण्यापर्यंत जाईल का? अशी शंका मनात आली आणि सगळेजण आपापला प्रयत्न करु लागले. मी पण दोन-चार दगड भिरकावले, पण एकही लिंगाण्यापर्यंत गेला नाही. मग माझ्या उच्च दर्जाच्या हिंदीत अजयला म्हणालो...
"वारेके बजेसे मेरा दगड लिंगाणे तक नही पहूँचा"
हे ऐकल्यावर इतरांना हसु येणं साहजीकच होतं. काय बरळलो हे ध्यानात आल्यावर मलापण जाम हसू आलं.

कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग-पठारावरुनच सुरु होते आणि मग रायलिंग-पठार आणि लिंगाणा ह्यांच्या मधल्या अतीशय चिंचोळ्या खिंडीतून लिंगणमाचीला जाते. पठावरुन बोराट्याची नाळ नक्की कुठून सुरु होते हे बघून घेतलं, म्हणजे पुढे कधी ह्या नाळीने उतरायचं झालं तर अडचण नको.

साधारण दुपारी २ वाजता लिंगाण्याचा निरोप घेतला आणि परत फिरलो. आता पठारावर उन्हाचे चटके जाणवत होते. भरभर चालत जंगल असलेल्या टप्प्यापर्यंत पोहचलो. गार सावलीत थोडावेळ विसावल्या नंतर मोहरी गाठलं. पोटभर थंड पाणी प्यायलो आणि थेट हारपुडच्या जरा आधी एका ओढ्यात उताणे झालो. ओढ्यातल्या गार पाण्याने ताजेतवाणे होऊन हारपुड गाठलं. हारपुड - वेल्हा - नसरापुर फाटा आणि मग महामार्गाने पुणे असा परतीच प्रवास दुचाकीवर सुरु केला. वेल्हा मागे टाकून पुढे निघलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली होती. तोरण्याच्या मागे तांबडं-केशरी सुर्यबिंब बुडत होतं.