समोर प्रचंड खोल दरी... नजर जिथपर्यंत भिरकावता येईल तिथपर्यंत सृष्टीचं अमाप सौंदर्य... आजुबाजुला उत्तुंग कडे... वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट... निखळ एकांत... हे सगळं अनुभवत मी प्लस-व्हॅलीच्या टोकावर उभा होतो...
त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं... झाडं, दगडगोटे, पक्षी, प्राणी, हवा आणि मी ह्यांच्यात काहीच फरक नव्हता... मी म्हणजेच हे सगळं आणि हे सगळं म्हणजेच मी असं वाटून गेलं... मग कसलं जंगल? आणि कसलं रान?, सगळच ओळखीचं झालं आणि कसलीच भिती उरली नाही... खऱ्या अर्थानं विमुक्त झालो... "The soul of the universe is one with your own soul and every other soul that exists " असं Paulo Coelho का म्हणतो ह्याचं उत्तर मिळालं...
पुण्याहून प्लस-व्हॅलीकडे जाताना मुळशीच्या पुढे पळसे नावाचं गाव लागतं... हे गाव मागे टाकून पुढचा रस्ता धरला आणि रस्त्याच्या दुतर्फा बहरलेल्या पळसाच्या झाडांनी आमचं स्वागत केलं... पळसाला इंग्रजीत "Flame of the forest" असं सुद्धा म्हणतात... पळसाच्या फुलांमधे भरपूर मध असतो आणि तो खाण्यासाठी पळसाच्या झाडावर पक्ष्यांची खूप गर्दी असते... बहरलेल्या पळसाच्या झाडा खाली पडलेला फुलांचा सडा बघून मन एकदम हरखून गेलं... फुलांचा तांबडट-केशरी रंग सकाळच्या उन्हात फारच उजळ दिसत होता... लहान मुल आईच्या कुशीत शांतपणे निजावं अगदी तशीच फुलं मातीच्या कुशीत निजली होती...
निवे गाव आणि लोणावळ्याचा फाटा मागे टाकून थोडं पुढे गेलो की घाटातून प्लस-व्हॅली दिसते... चार दऱ्या एकत्र येऊन अधिकच्या आकाराचं चिन्ह तयार झालयं म्हणून ह्या दरीला प्लस-व्हॅली असं म्हणतात...
दाट झाडीतून दरीत उतरायला साधारण एक तास लागतो...
(दरीत उतरताना डाव्या हाताला भिरा धरण दिसतं)
देवानं स्वर्गाचं दार उघडून,"जा बाबा! हवं ते पहा... हवं तसं भटक..." असं म्हंटल्या सारखं वाटलं...
(ओढ्यातलं नितळ पाणी)
(दरीतून दिसणारा देखावा)
पक्ष्यांची गाणी ऐकत, ओढ्यातल्या नितळ पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब बघत दरीच्या टोकापर्यंत पोहचलो... दरीच्या अगदी टोकावर खूपच नितळ आणि गार पाण्याचं कुंड आहे...
पावसामधे प्लस-व्हॅलीच्या चारी सोंडांमधून वाहणारं पाणी ह्या कुंडात पडतं... ह्या कुंडातूनच पाणी शेवटी खाली दरीत कोसळतं...
असं अफाट सौंदर्य पाहून निव्वळ वेड लागल्यागत झालं... कितीही वेळा पाहिलं तरी ते डोळ्यामधे सामावत नव्हतं... दरीची खोली, रानाची हिरवाई, ओढ्यातलं पाणी आणि एकांत ह्यामुळे मनाची लगाम सैल्ल होत होती... कधी ते फुलपाखरां सोबत उडत होतं तर कधी कुंडातल्या माश्यांसोबत पोहत होतं... बराच वेळ दरीच्या टोकावर बसलो... नकळतच सारखे देवाचे आभार मानत होतो... उन्हं कलल्यावर शुध्दीवर आलो आणि हे सगळं जपलं पाहिजे अशी जाणीव परत झाली...
निसर्ग न मागता सगळंच आपल्याला देत असतो, पण आपण मात्र हवरटा सारखे ‘एकदम सगळी सोन्याची अंडी मिळावी म्हणून कोंबडीच कापायच्या विचारात असतो’... हे चुकतयं ह्याची आपल्याला जाणीव आहे... कळतयं पण वळत नाही अशी अवस्था आहे... खरंच हे सगळं जपलं पाहिजे... आता आपण सर्वांनीच ह्या साठी धडपड केली पाहिजे...
Man has been endowed with reason, with the power to create, so that he can add to what he's been given. But up to now he hasn't been a creator, only a destroyer. Forests keep disappearing, rivers dry up, wild life's become extinct, the climate's ruined and the land grows poorer and uglier every day. ~ Anton Chekhov
विनंती: मित्रांनो भटकून आलो की मला त्या जागे बद्दल लिहायला, इतरांना सांगायला आवडतं, पण मग भिती देखील वाटते की ‘तिथे गर्दी होणार, कचरा होणार आणि त्या जागेचं सौंदर्य टिकून राहिल की नाही? ’. माझी एक फार नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी निसर्ग/वन्यजिवन ह्यांच्या संवर्धनासाठीची जाणीव आपल्या ओळखीच्या लोकांमधे निर्माण करावी. जाणीव निर्माण झाली तर संवर्धन देखील होईलच.
विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
विमुक्त ... काय झाले माहीत नाही पण तुझा तो पहिला फोटो बघून असे वाटते ह्या पावसाळ्यात इकडे जाणार मी... मस्तच जागा सांगितलीस. ताम्हीणी घाट आणि वरंध घाट राहिले आहेत माझे करायचे.!!!
ReplyDeletegreat yarr are kadhi tari bolavat ja aahmala pan
ReplyDeleteShruti
Vimukta, a beautiful place has been narrated in beautiful words ! The pictures - especially the close up of "PALASACHI PHULE" is simply marvellous. Ani ho ! "Pavsamadhye Plus Valleychya chari sondanmadhun he pani kahlchya kundamadhye padte" ya vakyamdhil "sond" ha shabd tya padnarya panyache samagra chitrach najaresamor ubhe karto !
ReplyDeleteTasech lekhachya shevti vyakt keleli bhiti tari niradhar kashi bari samjavi ? Kharach te ek gadad kale vastav ahe ! Khoop kahi lihit raha !
Pramod Kulkarni ...
mastch..
ReplyDeletemassta re!
ReplyDeleteअप्रतिम , जागा, फोटो , आपले लिहीणे, सर्वच.
ReplyDeleteआपण मुळशी मधल्या सुसाळे बेटावर गेला आहात काय ? पराशर मुनी व मत्सगंधा प्रकरण नक्कीच याच ठिकाणी घडले असणार येवढे हे मोहमयी स्थळ आहे.
किरण पुरंदरेंचे " सखा नागझिरा " हे पुस्तक वाचले आहात काय ?
ReplyDeleteरोहन ,
ताम्हीणीत पाली गावातुन वर जावे. रवाळजेत छान धरण आहे. पुढे भेरा पॉवर हाऊस बघुन मग ताम्हीणीत वर चढा. दे धम्माल.
mast blog ahe tuza, photos-description sarv khupach avadal... keep writing
ReplyDelete