तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं.
"गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो...
लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.
बरेचजण तोरण्यावरुन निघून घाटमाथ्यापर्यंत येतात आणि मग लिगाण्याजवळच्या शिंगापूर-नाळ किंवा बोराट्याच्या-नाळीने कोकणात उतरुन रायगड, असा ट्रेक करतात. किमान तीन दिवस तरी लागतात ह्या ट्रेकला. माझ्याजवळ एकच दिवस होता आणि लिंगाणा जवळून बघायची जाम इच्छा होती. दुचाकीवरुन हारपुड गावी पोहचायचं आणि मग चालत रायलिंग पठार गाठायचं आणि लिगाण्याचं जवळून दर्शन घ्यायचं ठरवलं.
मी, ऋशी, स्वानंद आणि अजय असे चौघेजण दोन दुचाकीवर रवीवारी पहाटे सिंहगडाच्या दिशेने निघालो. डोणजे फाट्यावर उजवीकडे वळाल्यावर अंदाजे ५-६ कि.मी. पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाबे खिंडीतून वेल्ह्याला जायच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून वेल्ह्याला पोहचतो. मस्त रस्ता आहे... फारशी रहदारी नाही... रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि शेतं आहेत... अधून-मधून लहानशी वाडी लागते... जवळच्या गवताळ टेकड्यांवर गुरं चरताना दिसतात. खिंडीच्या माथ्यावरुन राजगड आणि तोरणा सोबतच दिसतात.
खिंड उतरल्यावर पाबे आणि मग वेल्हा लागतं. साधारण एक तासात आम्ही वेल्ह्याला पोहचलो. वेल्ह्यात नाष्टा उरकला आणि कानंद खिंडीच्या रस्त्याला लागलो (केळद, कुंबळे आणि मढे-घाटला हाच रस्ता जातो). हा रस्ता तोरण्याला प्रदक्षीणा घालून जात असल्यामुळे तोरण्याचं चौफेर दर्शन घडतं. कानंद खिंड ओलांडून ७-८ कि.मी. उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आम्ही उजव्या हाताला हारपुडला जाणारी वाट धरली (ह्या फाट्यापासून केळद (मढेघाट) ५-६ कि.मी आहे).
पीकलेल्या भातशेतीचा फिकट-पीवळा रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी भासत होता. पीकलेल्या भाताचा गोड सुगंध हवेत दरवळत होता. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी शेतात उभी केलेली वेगवेगळी बुजगावणी बघत वरोती गावात पोहचलो. इथून हारपुड हाकेच्या अंतरावर आहे, पण वाट मात्र जरा बिकटच आहे. आमच्या आणि दुचाकीच्या सगळ्या अवयवांची चाचणी घेत हारपुडला पोहचलो. गावातल्या शाळेच्या आवारात दुचाकी लावल्या.
पावसामुळे खराब झालेलं अंगण दुरुस्त करण्यात एक आजोबा मग्न होते. त्यांच वय किमान ८० तरी असेलच. आम्हाला बघताच आजोबांनी विचारलं...
"लिंगाण्याला चाल्लाव काय?"
भटकण्यासाठी शहरातून लोकं आपल्या गावात येतात ह्याबद्दलचा आनंद आणि कौतुक त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर जाणवत होतं. गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...
आजोबांनी दाखवलेली वाट धरली आणि मोहरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अजून ओढ्यांमधे भरपुर पाणी होतं...
(ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दिसणारे दगडगोटे...)
पावसाळा संपला होता आणि वाढत्या उन्हामुळे गवत जरा पीवळट दिसत होतं... गवताच्या पात्यांच्या मागे कसली कुसं दिसतायत? म्हणून जरा नीट नीरखून पाहीलं तर सुरवंटं होती... ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...
एक-दोन लहान टेकड्या चढल्यावर जंगल लागलं आणि शेवटचा चढ सुरु झाला. वाट गावकऱ्यांच्या पायाखालची असल्यामुळे मस्त मळलेली होती. चढ संपला आणि अचानकच समोर लिंगाणा आला. लिंगाण्याच्या मागचा रायगड तर अधीकच भव्य भासत होता. डाव्या हाताला लिंगाणा ठेऊन थोडावेळ चालल्यावर मोहरीला पोहचलो. लहानसं गाव आहे. पावसात धो धो पाऊस कोसळतो आणि उन्हाळ्यात पाणीच नसतं. मागच्याच वर्षी श्रमदानातून कातळ खणून एक मोठ्ठ टाकं बांधलय गावकऱ्यांनी. त्यात डोकावून पाहीलं; नितळ हिरवंगार पाणी त्यात साठलं होतं.
(मोहरी गावातलं एक घर... पाऊस, वारा आणि थंडीचा जोर कमी करण्यासाठी घराचं छत अगदी खालपर्यंत आणलयं...)
मोहरीच्या जरा खाली शिंगापूर गाव वसलयं. ह्या गावातुनच शिंगापुर-नाळीने कोकणातल्या दापोलीला (रत्नागीरीच्या जवळचं दापोली नव्हे) उतरता येतं. मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर थोडावेळ पठारावर, थोडावेळ जंगलातून चालत साधारण एक तासात रायलिंग पठारावर पोहचलो. वाटेत सह्याद्रिचं विलोभनीय रुप पहायला मिळालं...
(शिंगापूर गाव...)
पठारावर कमरेपर्यंत गवत वाढलं होतं; वाऱ्यावर डुलत होतं. गवतातून वाट काढत पठाराच्या टोकाला पोहचलो. आलेल्या वाटेकडे मागे वळून पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडुने काढलेल्या रेघे प्रमाणे गवतामधे वाट उठून दिसत होती. रायलिंग पठारावरुन लिंगाण्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी गप्पा मारता येतात.
पठाराच्या अगदी काठावर पाय दरीत सोडून लिंगाण्याकडे बघत बसलो. इतक्या जवळून लिंगाणा बघण्याचं स्वप्न पुर्ण झालं... प्रत्यक्ष त्यावर चढताना येणाऱ्या रोमांचाची थोडी अनुभुती आली... एकट्या-दुकट्याचं ते काम नाही... पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...
(लिंगाणा...)

(लिंगाणा... जवळून)
पठारावर उभं राहून स्वताभोवती एक चक्कर मारली तर चौभेर केवळ अप्रतीम नजारा दिसतो...
(तळकोकणातलं दापोली गाव...)
एका झाडाखाली बसून जेवण उरकलं आणि थोडावेळ आराम केला.
पठाराच्या टोकावरुन फेकलेला दगड लिंगाण्यापर्यंत जाईल का? अशी शंका मनात आली आणि सगळेजण आपापला प्रयत्न करु लागले. मी पण दोन-चार दगड भिरकावले, पण एकही लिंगाण्यापर्यंत गेला नाही. मग माझ्या उच्च दर्जाच्या हिंदीत अजयला म्हणालो...
"वारेके बजेसे मेरा दगड लिंगाणे तक नही पहूँचा"
हे ऐकल्यावर इतरांना हसु येणं साहजीकच होतं. काय बरळलो हे ध्यानात आल्यावर मलापण जाम हसू आलं.
कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग-पठारावरुनच सुरु होते आणि मग रायलिंग-पठार आणि लिंगाणा ह्यांच्या मधल्या अतीशय चिंचोळ्या खिंडीतून लिंगणमाचीला जाते. पठावरुन बोराट्याची नाळ नक्की कुठून सुरु होते हे बघून घेतलं, म्हणजे पुढे कधी ह्या नाळीने उतरायचं झालं तर अडचण नको.
साधारण दुपारी २ वाजता लिंगाण्याचा निरोप घेतला आणि परत फिरलो. आता पठारावर उन्हाचे चटके जाणवत होते. भरभर चालत जंगल असलेल्या टप्प्यापर्यंत पोहचलो. गार सावलीत थोडावेळ विसावल्या नंतर मोहरी गाठलं. पोटभर थंड पाणी प्यायलो आणि थेट हारपुडच्या जरा आधी एका ओढ्यात उताणे झालो. ओढ्यातल्या गार पाण्याने ताजेतवाणे होऊन हारपुड गाठलं. हारपुड - वेल्हा - नसरापुर फाटा आणि मग महामार्गाने पुणे असा परतीच प्रवास दुचाकीवर सुरु केला. वेल्हा मागे टाकून पुढे निघलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली होती. तोरण्याच्या मागे तांबडं-केशरी सुर्यबिंब बुडत होतं.